marathi blog vishwa

Tuesday 5 March 2024

देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी....

मना सज्जना... भाग 19 : देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी....
- सुधांशु नाईक
05/03/24
आज समर्थ रामदास यांची पुण्यतिथी. त्यांना मनापासून वंदन.
निर्भय, नि:स्पृह, नि:स्वार्थी विचारशील आणि लोकांच्या अंगातील रक्त सळसळते राहावे यासाठी आयुष्यभर धडपड केलेले कार्यमग्न व्यक्तिमत्व होते हे. ते सदैव आचार्याच्या भूमिकेतून वावरले असे मला वाटते. अन्याय सहन करावे लागू नयेत यासाठी, लोकांनी स्वतःची आणि समाजाची ताकद वाढवण्यासाठी सदैव खटपट करावी असे ते कायम सांगत राहिले.
त्यांचे आयुष्य किती खडतर असेल हे आता त्यांच्या आयुष्याचा अभ्यास करू जाता वारंवार जाणवते. वयाच्या १२ व्या वर्षी घरातून पळून ते नाशिक /टाकळी परिसरात आले. तिथे माधुकरी मागून एकवेळचे पोट भरले. शारीरिक आणि मानसिक ताकद वाढवण्यासाठी अपार मेहनत घेतली. नाशिक मध्ये त्या काळी किती ग्रंथालये होती, तिथे कोणते ग्रंथ अभ्यासासाठी उपलब्ध होते याची इतिहासात नीटशी नोंद नाही. मात्र समर्थांच्या हातून लिहिले गेलेले साहित्य वाचले की त्यांनी विविध विषयांचा किती अभ्यास केला होता हे त्वरित जाणवते. आज वयाच्या १२-14 व्या वर्षात असणारे एखादे मूल आपल्या आईकडे कितीवेळा “भूक लागली..खायला दे...”असे म्हणत हट्ट करते हे आपण पाहतोच, अशावेळी त्या काळी या १२ वर्षाच्या मुलाने कसे दिवस काढले असतील याची कल्पनादेखील कासावीस करते.
नाशिकमध्ये आल्यावर जेंव्हा विद्याभ्यास पूर्ण झाला असे वाटले तेंव्हा समर्थ भारतभ्रमणासाठी बाहेर पडले. त्यावेळी आसपास अनन्वित अत्याचार चालू असताना ते सर्वत्र हिंडले. नवीन लोक जोडले. आजही केवळ करमणुकीसाठी म्हणून गाडीतून भारत फिरायचा म्हटलं तरी लोकांच्या जीवावर येते मग त्याकाळी लोकसंग्रह आणि बलोपासना यासाठी समर्थ रामदासांनी कसे पदभ्रमण केले असेल याची कल्पना करायला हवी. त्यावेळी मोठी जंगले होती, वन्य श्वापदे होती, शत्रूचे सैनिक होते, चोर –दरोडेखोर होते... या सगळ्यांना तोंड देत त्यांनी केलेले काम जाणवून मन थक्क होते. समाजशास्त्र, मानसशास्त्र, नीतीशास्त्र, राजकारण यासाठी समर्थांनी लिहून ठेवेलेले साहित्य इतके चपखल ठरते की त्यांच्या लेखनातील अवतरणे ४०० वर्षानंतर आजही सहज वापरली जातात. त्याचे मुख्य कारण म्हणजे ते फक्त लेखन नव्हते तर प्रचितीचे बोलणे होते.

समाजाची मानसिकता समजून घेत त्यांना प्रेमाने समजावत उपदेश करण्यासाठी दासबोधासारखा ग्रंथ तर समर्थांनी लिहिलाच पण त्यासोबत सामान्य माणसाला सहज उमगतील असे मनाचे श्लोक लिहिले. सुरेख अशा विविध आरत्या लिहिल्या. गावोगावी कीर्तने, प्रवचने दिली. अंगचे कलागुण विकसित करतांनाच लोकांनी शक्तीची उपासना करावी आणि स्वतः देशासाठी कार्यरत व्हावे यासाठी सदैव प्रोत्साहित केले. आयुष्यभर इतके सारे काम करताना लोकांकडून स्वतःसाठी कोणतीही गोष्ट घेतली नाही. डोंगरात, गुहेत, मंदिरात राहून आयुष्यभर फक्त जनकल्याणाचा विचार केला. समर्थांचा सर्वात विशेष गुण म्हणजे ते पोकळ तत्त्वज्ञान न सांगता अनुभवसिद्ध असे मत कळकळीने सांगत राहतात. त्यामुळे ते मनावर ठसते. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, “हे तो प्रचितीचे बोलणे । आधीं केलें मग सांगितले।!
माणसाला नरजन्म वारंवार मिळत नाही या जन्मी असे काही भव्य दिव्य काम करावे ही प्रेरणा इतरांना देताना ते तसेच जगून दाखवतात.
आज देशातच नव्हे तर परदेशात देखील समर्थांचे साहित्य अभ्यासले जाते. लोक त्यातून प्रेरणा घेतात. माणसाने कर्तृत्ववान व्हावे कारण माणसे देहरुपाने नष्ट झाली तरी आपल्या कार्यामुळे अजरामर होतात. त्यापासून स्फूर्ती घेत नवनवीन माणसे उभी रहातात. देश पुढे जात राहतो.
आपल्या जगण्यातून हेच सिद्ध केलेल्या समर्थांची “देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी....” ही ओळ म्हणूनच फार महत्वाची ठरते. प्रेरणास्त्रोत बनून राहते.
-सुधांशु नाईक (९८३३२९९७९१)🌿

No comments:

Post a Comment