मना सज्जना... भाग २१ : नको रे मना क्रोध हा अंगिकारू...
- सुधांशु नाईक
शनिवार ०९/०३/२४
जन्माला आल्यापासून आपण लहानाचे मोठे होत जातो. अनेक गोष्टी नव्याने शिकतो. उठतो, बसतो, चालतो, धावतो... अभ्यास करतो, कामे करतो. कित्येकदा आपण यशस्वी होतो तर कित्येकदा अयशस्वी. ज्या ज्या वेळी आपल्या मनाप्रमाणे काही घडत नाही त्या त्या वेळी मनावर सर्वाधिक पगडा असतो तो क्रोध आणि निराशा यापैकी एका भावनेचा किंवा दोन्ही भावनांचा. काम, क्रोध, मोह, मत्सर आदि गोष्टींचा अतिरेक झाला तर ते मानवाचे सहा शत्रू होऊन जातात असे आपले ग्रंथ सांगतात. मनाचे श्लोक लिहिताना क्रोधाला सर्वात वर ठेवत समर्थ म्हणतात;
नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नाना विकारी॥
नको रे मदा सर्वदा अंगिकारू।
नको रे मना मत्सरु दंभ भारु॥
का बरे त्यांनी क्रोधावर जास्त लक्ष केंद्रित केले असेल ? रागाच्या भरात काहीही करणाऱ्या व्यक्तीला आपण “ तो म्हणजे ना, जमदग्नीचा अवतारच आहे..” असे गमतीने जरी म्हणत असलो तरी जमदग्नी ऋषीसारख्या ज्ञानी व्यक्तीने रागाच्या भरात काय केले हेही आपल्याला ठाऊक असते. क्रोध ही गोष्टच अशी की त्यामुळे आपला सारासार विचारच खुंटतो. एका क्रोधापायी माणूस इतकी चुकीची पाऊले उचलतो की नंतर पश्चात्ताप करून काहीच फायदा नसतो.
छत्रपती संभाजीराजे जेंव्हा सिंहासनावर बसले तेंव्हा कारभाऱ्यांच्या कारस्थानाने उद्विग्न आणि क्रोधित होऊन गेले. प्रसंगी अनेकांना शिक्षा दिल्या. मात्र यातून पुढे जायला हवे, पुन्हा सगळी घडी नीट बसवायला हवी हे सांगण्यासाठी समर्थांनी त्यांना पत्र लिहिले. त्यातील उपदेश हा केवळ राजासाठीच नव्हे तर एखाद्या नेत्यासाठी, कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यासाठी, कुटुंबातील प्रमुख व्यक्तीसाठी अत्यंत उपयुक्त असाच आहे;
कांहीं उग्र स्थिति सांडावी । कांहीं सौम्यता धरावी।
चिंता लागावी परावी । अंतर्यामीं ॥
मागील अपराध क्षमावे । कारभारी हातीं धरावे।
सुखी करूनि सोडावे । कामाकडे ॥
ऐसें सहसा करूं नये । दोघे भांडतां तिसर्यासी जय।
धीर धरोण महत्कार्य । समजून करावें ॥
समय प्रसंग ओळखावा । राग निपटून काढावा।
आला तरी कळों न द्यावा । जनांमध्यें ॥
या ओळी आजदेखील किती समर्पक आहेत ना..!
क्रोध किंवा राग येणे ही नैसर्गिक उर्मी असते. सर्व प्राणिमात्रांच्यात असलेली. त्याच्या मुळाशी मुख्यतः अपेक्षाभंग, अपयश किंवा फसवणूक या घटना असतात. घडलेली वाईट घटना आपण बदलू शकत नाही. ज्यामुळे घडली त्याला प्रसंगी शिक्षादेखील करतो मात्र तरीही माणसे क्रोधाने धगधगत राहतात. हा क्रोध इतरांना त्रास देतोच पण त्या व्यक्तीला देखील हानिकारक असतो असे आता सिद्ध झाले आहे. ज्या गोष्टीमुळे आपल्याला राग येतो त्या गोष्टीकडे अधिक बारकाईने पाहायला हवे. ज्या व्यक्ती किंवा प्रसंग आपल्याला सतत चिडवतात त्या गोष्टी टाळायला हव्यात. अनेकदा एखाद्या दुर्वर्तनी व्यक्तीशी थेट भिडणे किंवा अंगावर घेणे यापेक्षा त्याला पूर्ण टाळणे, संवाद न साधणे किंवा त्याला वळसा घालून आपल्या वाटेने पुढे चालत राहणे जास्त इष्टकारक.
ज्या गोष्टीमुळे आपल्याला उत्कट आनंद, सुख, शांतता, कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळते तिथे आपण लक्ष केंद्रित केले तर आपोआप मन अधिक प्रफुल्लित होऊन जाते. आयुष्यात राग येणारे क्षण आपण टाळू शकत नाही मात्र ते क्षण आल्यावर कमीत कमी राग येईल किंवा आपल्या रागावर आपण नियंत्रण मिळवणे इतके तर नक्कीच करू शकतो ना?
-सुधांशु नाईक (९८३३२९९७९१)
No comments:
Post a Comment