मना सज्जना... भाग 22 : भय इथले...
- सुधांशु नाईक,
शुक्रवार १५/०३/२४
प्राण्यांच्या आयुष्यातील ज्या मूलभूत जाणीवा आहेत त्यात आहार,निद्रा आणि मैथुन यासोबत असणारी महत्वाची जाणीव म्हणजे भय. जन्माला येण्यापूर्वी गर्भावस्थेत असलेले मूल देखील भीतीच्या प्रभावाखाली असते. विशिष्ट आवाज त्याला घाबरवत राहतात. जन्माला आल्यापासून तर भीतीची छाया सतत असतेच. परक्या व्यक्तीकडे मूल जात नाही. आईवाचून दूर राहायला तयार नसते. वय वाढेल तसं भीतीची जाणीव कमी न होता वाढतच राहते. एखाद्याला विशिष्ट माणसांची भीती असते तर कुणाला एखाद्या ठिकाणाची भीती. कुणाला वाहन चालवण्याची भीती वाटते तर कुणाला बसच्या प्रवासात उलटी होईल याची भीती वाटते. कुणाला उंच डोंगरावर उभे राहण्याची भीती तर कुणाला लिफ्ट मधून जाण्याची भीती वाटते. असे भीतीचे कितीतरी प्रकार. त्याला मानसशास्त्रीय भाषेत फोबिया असे म्हणतात. भीतीचे काही प्रकार हे जन्मजात असतात तर काही प्रकार हे विशिष्ट घटनेचा परिणाम म्हणून सुरु होतात.
प्रणव हा एक कॉलेजला जाणारा मुलगा. यंदा बारावीला असलेला. कॉलेजमध्ये काहीतरी घडले. त्याचा त्याने इतका धसका घेतला की “यापुढे कॉलेजला अजिबात जाणार नाही..” असेच घरी जाहीर केले. काय घडले असे कित्येकदा सर्वांनी विचारून देखील त्याने अजिबात उत्तरे दिली नाहीत. मग त्याला घेऊन आई बाबा मानसोपचार तज्ञाकडे गेले. कित्येक दिवस त्याच्याशी बोलून त्याची भीती कमी करण्याचे प्रयत्न केले गेले. आज प्रणव थोडासा सावरला आहे, आता परीक्षा देतो आहे तरी काही गोष्टींच्या भीतीचा पगडा आजही तो झुगारून देऊ शकत नाहीये.
भीती
फक्त लहान किंवा मोठ्या मुलांना वाटते असे नाही तर मोठ्या व्यक्तीलादेखील वाटते.
ज्या गोष्टीमुळे भीती वाटते त्या गोष्टी सुरुवातीला टाळण्याकडे आपला कल असतो. पण
अशी चालढकल केल्याने काहीच साध्य होत नाही. “भय इथले संपत नाही...” ही गोष्ट
कितीही खरी असली तरी त्या भीतीच्या जाणीवेला आपल्याला भिडावेच लागते. तरच भीतीच्या
जाणीवेवर मात करणे शक्य होते.
भित्यापाठी ब्रह्मराक्षस अशी
तर आपल्याकडे म्हण आहे.त्यामुळे घाबरत राहणे हे समस्येवरील उपाय असू शकत नाही.
प्राचीन साहित्य असो वा सध्याच्या आधुनिक मानसोपचार पद्धती असोत, सगळे काही भीतीवर
मात करून पुढे जाण्यासाठीच उद्युक्त करतात. आपल्या पाठीशी प्रसंगी आप्तेष्ट, मित्रमंडळी,
गुरुसमान व्यक्ती असतातच,म्हणूनच समर्थ म्हणतात...
भवाच्या भये काय भीतोस लंडी। धरीं
रे मना धीर धाकासि सांडी॥
रघूनायकासारिखा स्वामि शीरीं। नुपेक्षी
कदा कोपल्या दंडधारी॥
भीतीच्या जाणीवेवर मात केली की
पुढे आत्मविश्वासपूर्ण वाटचाल आणि यश असणार हे नक्की.
-सुधांशु नाईक(९८३३१२९९७९१)
No comments:
Post a Comment