marathi blog vishwa

Friday, 1 March 2024

सातत्य

मना सज्जना...भाग : 18 : सातत्य
- सुधांशु नाईक
शुक्रवार ०१/०३/२४
शिवाजी पार्कचे ते मैदान. तीन स्टंप रोवलेले. त्यावर एक नाणे ठेवलेले. एक मुलगा फलंदाजीचा सराव करतोय. कितीतरी वेळ ते सुरु असतं. जेंव्हा सत्र संपते, तोवर ते नाणे तसेच असते. एकदाही त्याने आपले स्टंप पडू दिलेले नसतात. एकदाही त्याला चुकवून बॉल स्टंपवर आदळत नाही. सराव संपतो. त्याचे गुरु समाधानाने पुढे येतात, स्टंपवरचे ते नाणे उचलतात आणि त्या मुलाला बक्षीस देतात. अनेकदा असा सराव होत राहतो आणि त्या मुलाकडे नाणी जमा होत राहतात. त्या गुरुचे नाव असते रमाकांत आचरेकर आणि तो मुलगा म्हणजे अर्थातच तुमचा आमचा आवडता खेळाडू सचिन तेंडुलकर. आपल्या आयुष्यातील अनेक क्षण आजही जपणाऱ्या सचिनने ती नाणी जपून ठेवली आहेत...! सचिन खेळताना एखादा फटका असा काही मारायचा की अवघे स्टेडियम टाळ्यांच्या कडकडाटात दुमदुमून जात असे. असे सिद्धहस्त होण्यासाठी अचूक प्रयत्न तर लागतातच पण त्यापेक्षा महत्वाचे ठरते ते सातत्य.
तुम्ही जंगलात फिरायला जाताना किंवा अगदी घराच्या आसपास सुद्धा परिसर निरखून पहाता ना? लहानसहान प्राणी पक्षी नित्यनेमाने काहीतरी करत असतात. अगदी क्षुल्लक भासणारा एखादा कोळी आपले जाळे विणत असतो. त्यावेळी तुम्ही कधी त्याचे निरीक्षण केले आहे का? कित्येकदा त्याचा धागा तुटतो, कधी त्यात काही अडथळे येतात मात्र तो हार मानत नाही. नेटाने आपले जाळे पूर्ण करतो. कोळ्याने बनवलेले ते जाळे नुसते पाहत राहायला देखील किती सुंदर भासते कारण त्याला त्याच्या श्रमाचा, सातत्याचा परीसस्पर्श झालेला असतो.
कित्येक शास्त्रज्ञ संशोधन करत असतात. कुणी एखादे उपकरण बनवायचा प्रयत्न करत असतो तर कुणी एखादे औषध. त्यांना हवे तसे निष्कर्ष मिळायला कित्येकदा काही आठवडे जातात तर कधी कित्येक वर्षे. मात्र ते सातत्याने प्रयत्न करतच राहतात. त्यानंतर जेंव्हा यश मिळते त्या यशाची चव अवर्णनीय असते. आपण कोणतेही काम करू गेलो की अडथळे येतात, आळस येतो, औदासिन्य येते, आणि ठरवलेल्या गोष्टीतील सातत्य खंडित होते. अभ्यास, खेळ, कलेची साधना या सगळ्यात असा खंड पडला की आपण पुन्हा शून्यावर येऊन पोचतो. तिथून पुन्हा उठून पुढे जाता यायला हवे.
आपले ध्येय गाठण्यासाठी पुन्हा भरारी घेता यायला हवी. आपल्याच मनाला आलेली मरगळ झुगारून देता यायला हवी. जेंव्हा सातत्याने आपण असे स्वतःला नव्याने बळ देत राहू तेंव्हा प्रगतीची नवनवीन क्षितिजे आपल्याला नव्याने जाणवू लागतील हे नक्की.
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

No comments:

Post a Comment