मना सज्जना...भाग २३ : स्वार्थ
- सुधांशु नाईक
शुक्रवार २२/०३/२४
लहानपणापासून आपण शिकतो की दुसऱ्याचा विचार करावा, इतरांना त्रास देऊ नये आणि तरीही आपण प्रत्यक्षात जगात वावरताना खूप स्वार्थीपणे वावरत राहतो. तहान, भूक अशा आदिम नैसर्गिक जाणिवांच्या बाबत आपले स्वार्थीपण एकवेळ समजू शकते मात्र त्या व्यतिरिक्त अनेक लहान मोठ्या गोष्टींबाबत आपण स्वार्थी होताना दिसतो. एखाद्या घरात सगळे कुटुंबीय जेवायला एकत्र बसलेले असतात. समोरचे पदार्थ संपता संपता लक्षात येते की एखादी भाकरी शिल्लक आहे. मग आई किंवा बाबा ती भाकरी स्वतः न घेता मुलांना देऊ पाहतात. त्याचवेळी दोन मुलातील एखादे मूल मात्र ती भाकरी फक्त स्वतःलाच हवी यासाठी चपळाईने ती भाकरी घेऊन टाकते. नि:स्वार्थी आणि स्वार्थी वृत्ती दोन्हीचे एकाचवेळी आपल्याला दर्शन घडते.
हे तर खूपच क्षुल्लक उदाहरण आहे. अनेक घरात पैसा, प्रॉपर्टी, घर किंवा अन्य स्थावर मालमत्ता यासाठी सख्खे जवळचे नातेवाईक सुद्धा एकमेकांच्या जीवावर उठतात हे आपण प्रत्यक्षात अनेकदा पाहतो. मुळात कष्ट न करता स्वतःला सगळे काही मिळावे, इतरांपेक्षा जास्त मिळावे यासाठी अनेकजण हपापलेपणा दाखवतात. हा हव्यास, ही स्वार्थबुद्धी मग आपल्याच विनाशाला कारणीभूत ठरते. कित्येक कर्तबगार व्यक्ती केवळ स्वार्थी वृत्तीपायी विविध समस्यांमध्ये अडकून जातात. इतिहास पाहू गेले तर पृथ्वीराज चौहान पासून छत्रपती शंभूराजांच्या पर्यंत अनेक थोर माणसांना जवळच्या व्यक्तींच्या स्वार्थी वृत्तीमुळे मोठे नुकसान सोसावे लागले, प्रसंगी जीव गमावण्याची वेळ आली.
म्हणूनच समर्थ रामदास म्हणतात,
नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे,
अति स्वार्थबुद्धी नुरे पाप साचे
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे,
न होता मनासारिखे दु:ख मोठे ||
एखादी चांगली व्यक्ती स्वार्थी मनोवृत्तीमुळे संपून जाते. ही प्रसंगी कुटुंबाची हानी असतेच पण समाजाची, देशाचीही यामुळे हानी होतेच.
हे सगळे घडू नये म्हणून लहानपणापासून मुलांवर नि:स्वार्थी वृत्तीचे संस्कार व्हायला हवेत. मी, माझे यातून बाहेर पडून व्यक्तीने आपले, आपल्या परिवाराचे, देशाचे भले होईल याचा विचार करायला हवा. दुसऱ्याला ज्यामुळे आनंद होतो अशी कृती करता आली, असे देणे आपल्याला देता आले तर त्यासारखे दुसरे समाधान नाही हेच खरे. सर्वांच्या मनातील स्वार्थी वृत्ती हळूहळू लोप पावून नि:स्वार्थी वृत्तीचा सर्वत्र उदय होईल ही भ्रामक कल्पना किंवा पोकळ आशावाद आहे हे खरे. मात्र अधिकाधिक लोकांच्या मनात निस्वार्थी वृत्ती जागवण्यासाठी आपण प्रयत्न करत राहणे सहज शक्य आहे असे मला वाटते.
-सुधांशु नाईक (९८३३२९९७९१)🌿
No comments:
Post a Comment