marathi blog vishwa

Saturday 19 August 2023

क्षेमालागी जीव उतावीळ माझा...

#सुधा_म्हणे: 114       
क्षेमालागी जीव उतावीळ माझा...
19 ऑगस्ट 23
किती दिवस ती एक गोपिका बनून त्याची वाट पाहत आहे. तो घननीळ, तो सावळा सुंदरू, तो नटखट मुरलीवाला भेटावा यासाठी तनमन आतुरले आहे. दिवसरात्र, महिनोंमहीने वाट पाहण्यात गेलेत. आणि शेवटी तो आला. त्याला कवेत घ्यायला तिचा जीव आसुसला. त्याच्या प्रेमाचा, सगुण भेटीचा तो दिव्य अनुभव सांगताना ज्ञानोबांची शब्दकळा एकदम मधुरतम होऊन जाते. कसे त्याच्यात सामावून गेले ते सांगणारा हा सुरेख अनुभव.   
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती ।
रत्‍नकीळ फांकती प्रभा ।
अगणित लावण्य तेजःपुंजाळले ।
न वर्णवे तेथींची शोभा ॥१॥
कृष्ण, विठ्ठल.. विष्णू.. सर्व संताना सगळे देव कायम एकच दिसत असतात. त्यांच्या मनात कोणतेच भेदाभेद उरलेले नसतात. मनापासून ते जरी निर्गुण निराकाराची उपासना करत असले तरी त्यांच्या भावगर्भ लेखनातून सगुण रुपाचे जे देखणे चित्र दिसते ते अतिशय मनमोहक आहे. भक्तीच्या वाटेवर पाऊल ठेऊ पाहणाऱ्या सामान्य भोळ्या समाजाला हे लोभस चित्र भक्तिमार्गाकडे सहजतेने नेणारे असते. ज्ञानेश्वराना दिसलेले ते दिव्य तेजस्वी रूप आशाबाईनी आपल्या स्वरांमधून अगदी जिवंत केले आहे असे आवर्जून सांगावेसे वाटते. पांडुरंगाचे ते लावण्य मोजता न येणारे, सांगता न येणारे आहे, तेजाने भरलेले आहे हे सांगताना त्यांनी वापरलेला “तेजःपुंजाळले” हा शब्दच किती सुरेख.
कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु ।
तेणें मज लावियला वेधु ।
खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी ।
आळविल्या नेदी सादु ॥२॥

शब्देंविण संवादु दुजेंवीण अनुवादु ।
हें तंव कैसेंनि गमे ।
परेहि परतें बोलणें खुंटलें ।
वैखरी कैसेंनि सांगें ॥३॥
हा विठ्ठल दिसतो तसा नाही. तो तर पक्का नाटकी आहे. वरवर भासतो साधासुधा आणि अंतर्बाह्य मात्र खूप वेगळाच आहे. साद दिली तरी तो पटकन प्रतिसाद देत नाही. मुद्दाम छळतो मला. मला त्याची आस लागली आहे ही ठाऊक असते त्याला आणि म्हणून परीक्षा पाहत राहतो. बघावे तेंव्हा मनात त्याचेच विचार सुरू असतात. तरीही त्याच्याशी असणारा माझा संवाद देखील आता शब्दांच्या पलीकडे गेला आहे, काही सांगावेच लागत नाही.  
इथं ज्ञानोबा चारी वाणींचा संदर्भ घेतात. वैखरी (आपण बोलतो ती वाणी), मध्यमा (आपण गुणगुणतो ती वाणी), पश्यन्ति ( मनातील स्वतःचे बोलणे, ध्यानावस्थेतील इंद्रियांपार असलेले बोलणे) यानंतर येते ती परा वाणी. जिथे ईश्वरी शक्तिसोबत संवाद असतो असं परमार्थात मानले जाते. 
ज्ञानदेवांची ती विरहिणी म्हणते की परावाणी पर्यन्त गेलेला हा शब्देवीण असा संवाद, तो कसा व्यक्त करू? त्याच्याशी होणारा संवाद हा सगळ्यापार आहे. इथं माझी अवस्था तर अशी झालीये की, त्याला शोधत असताना तो दिसत नाही. पाया पडू गेले तर पाऊल गायब होऊन जाते. तो खरेच आलाय की मला भास होत आहेत ते उमगत नाही आणि मग तो समोर सगुण साकार उभा दिसतो.  “पाया पडूं गेलें तंव पाउलचि न दिसे । उभाचि स्वयंभु असे।“ किती नेमके शब्द..! 
असा समोर आल्यावर त्याला थेट आलिंगन द्यायला जीव उतावीळ होऊन गेला आहे. आणि तो दिसताच आलिंगन देऊ गेले तर तिथे पुन्हा फक्त मीच एकटी उरले. पुन्हा तो निसटून दूर जातोय. किती नाटके करतोय तो..! त्याला भेटण्यासाठी असलेली तिची आतुरता क्षेमालागी जीव उतावीळ माझा असं सांगताना ज्ञानोबा एकदम हळुवार होऊन जातात.
क्षेमालागी जीव उतावीळ माझा ।
म्हणवूनि स्फुरताती बाहो ।
क्षेम देऊं गेलें तंव मीचि मी एकली ।
आसावला जीव राहो ॥५॥
बाप रखुमादेविवरु हृदयींचा जाणुनी ।
अनुभवु सौरसु केला ।
दृष्टीचां डोळां पाहों गेलें तंव ।
भीतरीं पालटु झाला ॥६॥
त्याच्या या नाटकांमुळे आता मात्र जीव अगदी अगदी व्याकुळ झाला. एका क्षणी सगळे समजून घेत मग मात्र त्याने अंत पाहिला नाही. माझ्या मनातील भावना त्याला कळली नसती तरच नवल होते. त्याला ते बरोबर उमगले त्याने हृदयाशी धरले आणि मग अवघी आसक्ती निमाली. मी शांत तृप्त झाले. त्याची झाले. 
त्या विरहिणीचे अंतर्बाह्य बदलून जाणे जेंव्हा ज्ञानोबा “भीतरी पालटू झाला” या अवघ्या तीन शब्दात सांगतात तेंव्हा एका अतीव समाधानाने आपणही थरारून जातो. या पलीकडे सांगण्यासाठी मग काहीच उरत नाही.
- सुधांशु नाईक (9833299791)🌿

3 comments:

  1. १९७०साली मी एका मराठी गाणी सादर करणार्‍या "आपली आवड" या कार्यक्रमात व्हायोलीन वाजविणार्‍यां चौकडीतला एक व्हायोलीन वादक होतो. त्यावेळी आम्ही हे गाणं सादर करत होतो. तुम्ही केलेले हे वर्णन वाचताना हे गाणं गाणारी आमची गायिका कु. मीना हसबनीस डोळ्यासमोर उभी राहीली.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद 🙏🏻 आपला परिचय सांगाल का? Anonymous म्हणून कमेंट केल्यामुळे मला लक्षात येत नाहीये. तुमचा अनुभव सविस्तर ऐकायला आवडेल. 😊👍🏼

      Delete
  2. ज्ञानेश्वरांचे शब्दसौंदर्य तुमच्यासारख्या अभ्यासु साहित्य रसिकाकडून आम्हा वाचकांसमोर उलगडणे ह्या सारखी पर्वणी नाही!

    ReplyDelete