marathi blog vishwa

Sunday, 31 December 2023

जरा विसावू या वळणावर...

#सुधा_म्हणे: जरा विसावू या वळणावर...
31 डिसेंबर 23
काही सुहृदांच्या प्रेमळ आग्रहाखातर गेले वर्षभर ‘सुधा म्हणे..’ लिहीत होतो. मित्रांच्या सहकार्याने मग ‘दै.नवशक्ती’मधून त्याची ही लेखमाला रविवार वगळता रोज प्रसिद्ध होत राहिली. मुक्त मनोगत लिहायचं ज्यामुळे वाचकांना आपल्या स्वतःच्या आठवणी आठवतील,वाचलेली पुस्तकं, ऐकलेली गाणी आठवतील आणि रोजच्या दगदग आणि धावपळीने भरलेल्या आयुष्यात 5 मिनिटं आनंद निर्माण करू शकतील असा हा विचार. त्यासाठी माझ्यापरीने केलेला एक छोटासा प्रयत्न होता. तुम्हाला तुमच्याच आयुष्यातील सुखाचे क्षण आठवले असतील तर माझं छोटंसं लेखन सफल झालं असं म्हणूया. त्याचाच अधिक आनंद आहे. आज या लेखमालेतील हा शेवटचा लेख. नवीन वर्षात नवं काही घेऊन ‘नवशक्ती’ मधून पुन्हा भेटत राहूया..
मित्रहो, बालपण,तारुण्य आणि वृद्धत्व या तीन टप्प्यातून पुढे पुढे जाताना शेकडो भले-बुरे अनुभव आपण गाठीशी बांधत राहतो. आणि एक दिवस अशा टप्प्यावर पोचतो की यापुढे आपल्या जिवलग माणसाविना कुणी सोबत नसले तरी आयुष्यभर एक शांतता भरून राहते. कधी आयुष्यात ऊन असते तर कधी सावली, कधी दुःख असते तर कधी ओसंडून वाहणारे सुख. उन्हाच्या तापत्या झळा जसे जगणे असह्य करतात तसेच चंद्राचे चांदणे अवघी दुःखे विसरायला भाग पाडते. आयुष्यात कोणतीच गोष्ट कायम नसते, कायम असते फक्त जिवलगाची साथ. ती सर्वाना आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत मिळत राहायला हवी.

एक टप्पा गाठला की आपले हव्यास, अपेक्षा सगळे सगळे किती क्षणिक आहे याची जाणीव होते तरीही ते ते क्षण आपण अतीव उत्कटतेने जगणे महत्वाचेच. आयुष्याचा उत्तरार्ध, तो टप्पा, ते वळण अपरिहार्य असते. तिथून पुढील प्रवास शांत,सुखी होण्यासाठी या वळणावर क्षणभर स्थिरावणे गरजेचे. आपल्या एका अतिशय आशयघन कवितेत सुधीर मोघे हेच तर सांगत राहतात..

भले बुरे जे घडून गेले,
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर..
कसे कोठुनी येतो आपण
कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो उगाच रुसतो
क्षणात आतुर क्षणात कातर...

कधी ऊन तर कधी सावली
कधी चांदणे कधी काहिली
गोड करूनिया घेतो सारे
लावुनिया प्रीतिची झालर...

खेळ जुना हा युगायुगांचा
रोज नव्याने खेळायाचा
डाव रंगता मनासारखा
कुठली हुरहुर कसले काहूर....
एकेकाळी आलेला “तुझ्या वाचून करमेना..” हा चित्रपट अनेकांच्या लक्षात देखील नसेल पण सुहासचंद्र कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेली आणि अनुराधा पौडवाल यांनी अतिशय सुरेल गायलेली ही कविता म्हणजे आपल्यासाठी कायमच असणारे एक हवेहवेसे वळण आहे.
आपल्या जिवलगाच्या सोबत बसून, हाती हात घेऊन जेंव्हा दोन थकलेले जीव उर्वरित आयुष्य एकत्र घालवू पाहतात तेंव्हा त्यांचे ते एकमेकांत बुडून जाणे किती सुंदर भासू लागते ना?
-सुधांशु नाईक (9833299791)🌿
सर्वांना नवीन वर्षं उत्कट आनंदाचे, सुखदायी असावे हीच मनःपूर्वक शुभेच्छा. 🌹🌹🌿

No comments:

Post a Comment