marathi blog vishwa

Saturday, 24 February 2024

अहंकार

मना सज्जना...भाग : 17 : अहंकार
सुधांशु नाईक
शनिवार 24/02/24
आपल्या प्रगतीच्या आड ज्या अनेक गोष्टी येतात त्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे अहंकार. आपले रूप, आपले अक्षर, आपली संपत्ती, आपली बुद्धी, आपले एखादे कौशल्य अशा कोणत्याही गोष्टीचा जेंव्हा अहंकार निर्माण होतो तेंव्हा त्या माणसाची अधोगती होण्याची ती सुरुवात असते असे खुशाल समजावे.
प्राचीन पुराणकथा घेतल्या तरी रावण, हिरण्यकश्यपू, गजेंद्र हा हत्ती अशा कित्येकांच्या अहंकाराच्या कहाण्या आपण आजवर ऐकत आलो आहोत. तुम्ही कोणत्या जातीत-कोणत्या धर्मात जन्म घेतलाय याचा अहंकारांशी काही संबंध नसतो. मात्र जेंव्हा अहंकार निर्माण होतो तेंव्हा आपल्या अंगी असलेले ते कौशल्य, ते गुण पूर्ण झाकोळून जातात हे मात्र खरे. एकदा का अहंकार निर्माण झाला की आपल्याच विचारांवर त्याचा पडदा तयार होतो. आपल्या चुका, आपले अज्ञान आपल्याला उमगेनासे होते. कुणी जाणतेपणाने काही सुचवले, उपदेश केला तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. सगळे काही मला समजते या अहंकारामुळे मग नवीन गोष्टी शिकणे तर दूरच राहते मात्र जे कलागुण आपल्या अंगी होते त्याचीही माती होऊन जाते.
अहंकार अमुक एका वयात निर्माण होतो असे नाही. अगदी चौथी पाचवीतील एखादा लहान मुलगा सुद्धा माझे पेन, माझा डबा किंवा माझी वही सगळ्यात भारी असा अहंकार उराशी घेऊन फिरताना दिसू शकतो. केवळ वस्तूच नव्हे तर आपले रूप, आपली भाषा, आपले मत याबद्दल देखील माणसांना अहंकार उत्पन्न होतो. पुढे त्याचे रूपांतर गर्वात होते. अहंकार आणि गर्व या दोन गोष्टी पुढे जाऊन मग आपल्याच नाशाला करणीभूत ठरतात. रावणाचेच उदाहरण घेऊया ना. ब्राह्मण घरातील, विद्यावान आणि पराक्रमी असा रावण. मात्र त्याला झालेल्या अहंकारामुळे त्याने सर्व देवांना बंदी बनवले. ऋषि-मुनिना त्रास देऊ लागला. सीतेला जबरदस्तीने उचलून नेण्याइतका तो अध:पतित झाला आणि शेवटी मारला गेला. मनाच्या श्लोकात समर्थ किती सहजपणे हे सांगून जातात;
मना सांग पा रावणा काय झाले,
अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले,
म्हणोनि कुडी वासना सांडी वेगी,
बळे लागला काळ हा पाठीलागी....
आपल्याला कधीच अहंकाराचा वारा लागू नये म्हणून तर तुकाराम महाराज “लहानपण दे गा देवा” असे म्हणतात. सर्वांशी नम्रतेने वागायला फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. मात्र त्यासाठी अहंकार त्यागावा लागतो हे मात्र खरे.
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

Friday, 23 February 2024

शिकवण

मना सज्जना...भाग 16: शिकवण 
- सुधांशु नाईक
शुक्रवार 23/02/24
अवघे आयुष्यभर आपल्याला सदैव सोबत करणारी एक गोष्ट म्हणजे शिक्षण. असे म्हणतात की आपण जन्मभर विद्यार्थीच असतो. लहानपणापासून भाषा शिकतो, रीतीरिवाज शिकतो, बोलावे कसे, चालावे कसे, लिहावे कसे, वागावे कसे हे सारे शिकतच असतो. आपले वय जसे वाढते तसे आजूबाजूचे जग देखील बदलते. तंत्रज्ञान बदलते. हे सारे पुनःपुन्हा आपल्याला आत्मसात करत राहावे लागते. शाळा,कॉलेज यामधून उपजीविकेसाठी घेतले जाणारे शिक्षण तर अपरिहार्य असते. शिकावे कसे आणि शिकवावे कसे हे सांगणारे देखील अभ्यासक्रम आपल्याला शिकावे लागतात हे किती गमतीशीर आहे ना ?
मानवी मन हे मुळात चंचल असते. त्याला एखादी गोष्ट शिकवण्यासाठी किती यातायात करावी लागते हे अनेक अभ्यासक्रमातून आपल्याला पाहायला मिळते. अक्षरश: प्रसंगी आमिष दाखवून, प्रसंगी दरडावून आपल्याला एखादी गोष्ट स्वतःच्याच मनाला शिकवावी लागते. तीच तऱ्हा दुसऱ्याला शिकवण्याची. इथे तर समोरच्याच्या मनाचा कल आधी अजमावा लागतो. विद्यार्थ्याना हवीशी गोष्ट त्यांच्या गळी उतरवणे प्रसंगी सोपे असते मात्र कठीण किंवा नीरस वाटणाऱ्या गोष्टी ज्याना सहजपणे शिकता आणि शिकवता येतात त्यांना शिक्षण प्रक्रिया उमगली आहे असे म्हणावेसे वाटते.
एखाद्या शाळेतील वर्गात आपण गेलो तरी किती प्रकारची मुलं आपल्याला दिसतात. शांत,दंगा करणारी, लाजाळू, आगावू, भांडकुदळ, भित्री अशा मुलांना आधी ओळखण्यातच आपले कित्येक दिवस जातात. मग त्यांना शिकवावे लागते.

एकाच पध्दतीने सर्वाना शिकवता येत नाही. त्यातही वाईट सवयी जितक्या चटकन मुलांना लागतात तितक्या प्रमाणात चांगल्या सवयी लागत नाहीत. त्यामुळे लहान असो वा मोठी व्यक्ती, त्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी नेटाने प्रयत्न करणे अत्यावश्यक ठरते.
शाळा-कॉलेजमधील अभ्यास तर बऱ्यापैकी घडत राहतो मात्र उत्तम नागरिक कसे बनावे यासाठी पालक आणि शिक्षक यांनी विशिष्ट मुद्दे घेऊन जर शिकवण दिली तर समाजात उत्तम नागरिक घडू शकतात. एखाद्या मुलाला किंवा व्यक्तीला शिकवणे तुलनेने सोपे असते मात्र समूहाला शिकवणे अवघड असते.
म्हणून तर समर्थ म्हणतात,
मुलाचे चालीने चालावे,
मुलाच्या मनोगते बोलावे,
तैसे जनास सिकवावे, हळूहळू ||
जेंव्हा अशी उत्तम शिकवण मिळालेले नागरिक सर्वत्र वाढतील तेंव्हा आपले जगणे अधिक सुंदर होईल असे मला वाटते.
-सुधांशु नाईक(9833299791)🌿

Saturday, 17 February 2024

यू टर्न

मना सज्जना...भाग 14: यू टर्न
सुधांशु नाईक
शनिवार 17/02/24
आपल्या मनाची जडणघडण विविध प्रकारे होत असते. आई वडील, गुरुजन आदि ज्येष्ठ व्यक्तींनी केलेले मार्गदर्शन, आपल्या लहानपणापासून घेतलेले अनुभव, आपले शिक्षण, आसपासच्या लोकांचे, समाजाचे आपण केलेलं निरीक्षण आदि गोष्टीमुळे आपली एक धारणा बनलेली असते. अमुक एक गोष्ट घडली तर आपण कसे वागावे, कसे बोलावे याबाबत आपल्या मनाचे कंडीशनिंग झालेलं असते. त्यामुळे कित्येकदा असे घडते की कुणी कितीही काही सांगितले तरी आपल्याकडून पुन्हा पुन्हा तेच आणि तसेच घडत राहते. एखादे काम करायला मोठ्या उत्साहात सरसावून जाणारी माणसे काही वेळातच पुन्हा माघारी येतात. किंवा त्याच त्याच चौकटीत गोलगोल फिरत राहतात. “अरुन फिरून गंगावेस...”, “फिरून फिरून भोपळे चौक...” “ये रे माझ्या मागल्या..” असे वाक्प्रचार लोकांच्या या वागण्यामुळे निर्माण झाले आहेत. असे का घडते? त्याचे मुख्य कारण म्हणजे असुरक्षित वाटणे.
आपण आपले कम्फर्ट झोन सोडायला अनेकदा तयार नसतो. त्यामुळे एखाद्या क्षणी भारावून जाऊन आपण काहीतरी कृती करायला जरूर तयार होतो मात्र अर्ध्या वाटेवर जाताना ज्या क्षणी आपल्याला भीती वाटते, असुरक्षित वाटते, स्वतःचा आत्मविश्वास डळमळीत झाल्यासारखे वाटते तेंव्हा आपण पटकन यू टर्न मारून आहोत तिथे परत येतो. अशा वेळी स्वतःचे पूर्ण निरीक्षण आणि परीक्षण करणे गरजेचे असते.
आपण जी कृती करायची ठरवली त्यातील खाचखळगे, त्यातील अडचणी, त्यातील बऱ्यावाईट गोष्टी यांचा नीट अभ्यास जर आपण केला असेल तर असे यू टर्न मारायची वेळ शक्यतो येत नाही. आपल्या मनात अनेक विचार येत असतात. नवनव्या कल्पना आपल्याला भुरळ घालत असतात. अशावेळी त्या कल्पना किंवा स्वप्नांना सत्यात आणायचे असेल तर प्राक्टिकल विचार अमलात आणावे लागतात. मग ते अभ्यास करणे असो, एखादा व्यवसाय उभा करणे असो किंवा नोकरीतील कामे. इतकच नव्हे तर नातेसंबंध, घराचे व्यवस्थापन, आर्थिक नियोजन अशा सगळ्या गोष्टीबाबत “यू टर्न” घ्यावा लागणे जितके टाळता येईल तितके बरे असते. त्यासाठी त्या वाटेवर चालायला सुरुवात करण्यापूर्वी अधिकाधिक बारकाईने नियोजन करणे, येणाऱ्या अडचणींचा अंदाज घेऊन आपले risk management नियोजन तयार ठेवणे क्रमप्राप्त ठरते.
जेंव्हा एखाद्या ध्येयाने प्रेरित होऊन आपण वाटचाल करतो तेंव्हा त्यात शक्यतो माघार घ्यायला लागू नये. मात्र तरीही कधीतरी एखादी वाईट वेळ येतेच.

प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या आयुष्यात देखील पुरंदरच्या तहासारखी वेळ आली होती. जिथे बहुतांश स्वराज्य शत्रूला द्यावे लागणार होते. त्याही वेळी महाराजांनी अधिक चतुराईने हालचाली केल्या आणि ती माघार अशा प्रकारे घेतली की पुन्हा नव्याने भरारी घेण्यासाठी कधीही सज्ज होता येईल. आपल्यालाही आपल्या लहानमोठ्या कामात तसेच वागण्याचा प्रयत्न करायला हवा म्हणजे अपयश, पराभव यांच्यासारखे क्षण येऊन यू टर्न घ्यावा लागणार नाही.
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

Friday, 16 February 2024

द्विधा मनस्थिती

मना सज्जना...भाग 13: द्विधा मनस्थिती ...
- सुधांशु नाईक
शुक्रवार 16/02/24
आपल्या मनाशी ठरवलेले कार्य आपण करायचे ठरवले की त्यात स्वतःच आपण विविध अडचणी तयार करतो. आपल्या वर्तणुकीमुळे कित्येकदा ठरवलेले नियोजन फिसकटते. त्यासाठी कधी आळस कारणीभूत असतो तर कधी आपली मनस्थिती. कोणतेही महत्वाचे काम करण्यासाठी पूरेपर नियोजन आणि एकाग्रता जशी महत्वाची असते तसेच महत्वाचे आहे ते म्हणजे आपली मनस्थिती द्विधा नसणे. आपल्या आसपास वावरणाऱ्या व्यक्तीमधील एखादी व्यक्ती तरी अशीच द्विधा मनस्थिती असणारी असते.
माझे एक जवळचे नातेवाईक असेच होते. कोणत्याही गोष्टीत त्यांची द्विधा मनस्थिती असायची. जेवायला बसले तरी पोळी आधी खायची की भात आधी खायचा, अशा अनेक छोट्या मोठ्या प्रश्नात ते गुंतून जात. कामाच्या ठिकाणी पण हाच गोंधळ सुरु असे. त्यामुळे लहान मोठे निर्णय घेण्यात उशीर होत असे. कित्येकदा योग्य निर्णय खूप उशिरा घेतला जाई त्यामुळे त्याचा फायदा दिसत नसे. अशी कितीतरी माणसे आपण आसपास पाहतो. आपली द्विधा मनस्थिती का होते यावर खरच गांभीर्याने विचार करायला हवा.
द्विधा मनस्थितीची मुख्य कारणे बरीच आहेत. लहानपणी पाहिलेले, अनुभवलेले काहीतरी हा सगळ्यात महत्वाचा भाग. त्यामुळे माणूस बुजरा होऊ शकतो आणि आक्रमकदेखील. आपण नीट काम करू शकत नाही असे स्वतःला वाटत असेल किंवा मग इतरानी सतत तसे ऐकवले असेल तर मग सतत आपण निवडलेला पर्याय चूक तर नाही यासाठी अधिक विचार केला जातो. आणि मोक्याच्या क्षणी चुकीचा पर्याय निवडला जाऊ शकतो. कित्येकदा अतिविचार करणारी माणसे द्विधा मनोवृत्तीत सापडलेली दिसतात. नुसत्या विचार करत बसण्याच्या नादात कृती करायची वेळ निघून जाते.
कित्येकदा परिस्थिती स्वीकारायची तयारी नसली तरीही माणसे द्विधा मनस्थितीत सापडतात. नेमके काय करायला हवे हे माहिती असूनही इतर पर्याय शोधत बसतात. वेळेवर निर्णय न घेतल्याने मग खर्च जास्त करावा लागणे, वेळेत काम पूर्ण करता न येणे, प्रसंगी अपयशी ठरणे आदि गोष्टीना सामोरे जावे लागते. द्विधा मनस्थिती ही सर्व वयोगटातील माणसांना सतावते. अगदी पारमार्थिक कार्यात, योगविद्या, तपाचरण करणाऱ्या लोकांना देखील याचा त्रास होतो. नेमके भजन कसे करावे, कोणत्या पद्धतीने करावे, कुणाचे ऐकावे हे सगळं उमगेनासे होते. मन गोंधळून जाते. आणि जेंव्हा मन गोंधळते तेंव्हा हमखास चुका करते.
आपण तर सामान्य माणसे. समर्थ रामदासांसारखा विरागी योगीसुद्धा म्हणतो,
सुख सुख म्हणतां हे दुःख ठाकूनी आले ।
भजन सकळ गेले चित्त दुश्चित जाले ।
भ्रमित मन कळेना हीत ते आकळेना ।
परम कठिण देही देहबुद्धी वळेना ॥
द्विधा मनस्थिती म्हणजे चित्त दुश्चित झाले की आपण मूळ विचारापासून, ध्येयापासून भरकटत जाणे सहज घडते. एखाद्या योग्यासाठी, एखाद्या व्यवसायासाठी असे भरकटत जाणे म्हणजे जणू पुन्हा शून्यवत होणे असते. त्यामुळे ज्याला आयुष्यात खूप काही करून दाखवायचे असते त्याने या मनोवृत्तीवर विजय मिळवणे अपरिहार्य ठरते.
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

Saturday, 10 February 2024

परोपकार

मना सज्जना...भाग : 11: परोपकार..
सुधांशु नाईक
शनिवार 10/02/24
आपण माणसे बहुतेकवेळा स्वतःचा जास्त विचार करतो. मात्र दुसऱ्याच्या हिताचा विचार करणे, त्यासाठी प्रसंगी आपला वेळ, आपली शक्ती खर्च करणे हे आपल्यातील माणुसकी जिवंत असल्याचे लक्षण आहे. परोपकार किंवा दुसऱ्याला सहकार्य करत राहण्याची सवय ही लहानपणापासून अंगी बाणवायला हवी. परोपकार करण्याविषयी समर्थ म्हणतात,
शरीर परोपकारी लावावे,
बहुतांच्या कार्यास यावे,
उणे पडो नेदावे,
कोणीएकाचे !
परोपकार करण्यासाठी खूप मोठी धनसंपत्ती सोबत असायला हवी असे नाही. समोरच्या व्यक्तीची गरज ओळखून त्याला सहकार्य करणे, त्या व्यक्तीला त्याचा इच्छित मार्ग मिळावा यासाठी कृतीशील वर्तणूक ठेवणे हा देखील परोपकारच आहे.
आपले शरीर, आपल्या इच्छा, आपली स्वप्ने, आपले कुटुंबीय यांच्यासाठी सगळेच येनकेन प्रकारे प्रयत्न करत असतात. पण आपल्या सामान्य परिघाबाहेर असणाऱ्या व्यक्ती, प्राणी-पक्षी-वृक्षराजी यांनी भरलेले विश्व या सगळ्याचा विचार आपल्याला करता यायला हवा. मुळात असा विचार करण्याचे संस्कार हे पालकातून मुलांच्यात आपोआप येतात ही जाणीव निर्माण व्हायला हवी.
लहानपणी घरी आई स्वयंपाक करत असताना, भर दुपारी दाराशी एखादा बैरागी, एखादा गरीब माणूस येतो. आई पटकन एक भाकरी आणि त्यासोबत थोडी भाजी, एखादी चटणी एका पानावर घेते. लहान मुलाला सांगते, “बाळ, जरा त्या बुवाला हे एवढे खायला दे रे..” लहान मूल त्याला खायला देते. त्या व्यक्तीच्या चेहेऱ्यावर लगेच एक समाधान विलसू लागते. भुकेलेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी द्यावे हा विचार त्याच्या कृतीत भिनतो.
शाळेत, कॉलेजमध्ये शिकत असताना, नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी आपल्या आसपास काहीजण असे दिसतात की ते बिकट परिस्थितीतून वाटचाल करत आहेत. अंगी असलेल्या स्वाभिमानामुळे कदाचित ते मदत मागणार नाहीत, पण ते ओळखून आपल्याला सहकार्याचा हात पुढे करता यायला हवा. एखादी उपयुक्त वस्तू, वह्या-पुस्तके, हॉस्टेलची फी अशी लहानमोठी मदत न मागता आपल्याला करता यायला हवी. एखाद्याला एखादी गोष्ट जमत नसेल तर ती शिकवता यायला हवी.
एखाद्याला शारीरिक दुर्बलतेमुळे काही काम करणे नीट जमत नसेल तर कित्येकदा लोक त्याची टिंगल करतात. त्याऐवजी त्याला हातभार लावायला हवा. एखाद्या कलाकाराला प्रसंगी स्टेज मिळवून द्यावे, एखाद्या गरजावंत व्यक्तीला नोकरी मिळवून द्यावी अशी जी जी लहानमोठी कृती आपण करतो यामुळे माणूस माणसाशी जोडला जातो. नातेसंबंध हृद्य बनतात. "पुण्य परउपकार... पाप ते परपीडा.. " असं म्हणूनच तर तुकोबा सांगून गेले आहेत. परोपकार करणाऱ्या व्यक्ती उत्तमगुणी मानल्या जातात. आपण उत्तमगुणी व्हावे असे कुणालाही वाटतेच. बरोबर ना?
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

Friday, 9 February 2024

नियोजन!

मना सज्जना...भाग 12: नियोजन 
सुधांशु नाईक
शुक्रवार 09/02/24
आपल्या मनाला स्वस्थता जर हवी असेल तर ज्या महत्वाच्या गोष्टी आपल्या जगण्याचा भाग बनायला हव्यात त्यातील नियोजन ही एक अग्रगण्य गोष्ट. ध्येय आणि ते साध्य करण्यासाठीची कृती यातील महत्वाचा दुवा म्हणजे नियोजन. नियोजन आणि दूरदृष्टीसाठी समर्थ रामदास दीर्घसूचना असा शब्द दासबोधात वापरतात. एके ठिकाणी ते म्हणतात;
म्हणौन असावी दीर्घ सूचना | अखंड करावी चाळणा |
पुढील होणार अनुमाना | आणून सोडावें ||
भविष्यात काय घडेल याचा अंदाज घेऊन योग्य ते नियोजन करावे, विविध कामाची आखणी करावी, अनेक लोक जोडून घ्यावेत, त्यांच्या कुवतीनुसार काम द्यावे असे सगळे केले तर त्यानुसार कार्य सिद्धीस जाते असे समर्थांना वाटते.
 ज्या व्यक्तीना योग्य नियोजन करता येते ते कायमच त्यांच्या बहुतेकशा कामात यशस्वी होतात. प्रत्येकवेळी यश मिळेलच असे नव्हे पण योग्य नियोजन केले तर आपल्याला विविध चुका टाळता येतात. प्रसंगी ज्यातून नुकसान होत आहे असे जाणवते ते निर्णय बदलण्यासाठी आपण आधीच नियोजन केलेले असल्याचा फायदा मिळतो. नियोजन आणि दूरदृष्टी या जणू हातात हात घालून येणाऱ्या गोष्टी. भविष्यातील कामाकडे असे पाहता यायला हवे. आजच्या काळात ज्याला risk mitigating planning म्हणतात ते करता यायला हवे. आणि हे सर्व क्षेत्रात जरुरीचे आहे. ज्यांना हे सारे जमते त्यांच्या कृती यशस्वी होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून समर्थ दुसऱ्या ठिकाणी लिहितात;
दीर्घ सूचना आधी कळे । सावधपणे तर्क प्रबळे । 
जाणजाणोनि निवळे । यथायोग्य ।।
ते किंवा सध्याच्या काळातील विविध लहानमोठे मानेजमेंट गुरु हे प्लानिंग किंवा नियोजनासाठी कायमच प्राधान्य देताना दिसतात. मुळात प्लानिंग किंवा नियोजनाची सवय लहानपणापासून लावावी लागते तर ती पुढे आयुष्यभर अंगी टिकून राहते.
 शाळेत जायचं असेल तर आपले दप्तर, पाण्याची बाटली, वेलापत्रकानुसार वह्या पुस्तके घेणे हे सगळे लहान मुलांना त्या वयात शिकवले पाहिजे. तिथपासून मोठ्या माणसांची घरची आणि कार्यालयीन कामे या सगळ्यासाठी अशा सवयी अंगी बाणवणे गरजेचेच. परगावी जायचे असेल तर किती वाजता उठावे, किती वाजता जावे हे सारे आपण कसे करतो, रोजच्या कामाचे आपण कसे नियोजन करतो, आपण ऐनवेळी धावपळ करतो का, आपण आपली कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी नेमके काय करतो इत्यादी इत्यादी गोष्टी मुले पाहत असतात. त्यांना हे असे अप्रत्यक्ष शिक्षण आपल्याकडून मिळायला हवे.
 तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असला तरी नियोजनबद्ध केलेले काम हे यशस्वी होण्याची शक्यता अधिकाधिक असते हेच खरे. 
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

Saturday, 3 February 2024

मृदुवचने बोलत जावे...

मना सज्जना...भाग : 10
मृदुवचने बोलत जावे..
सुधांशु नाईक
शनिवार 03/02/24
जन्म झाल्यापासून काही दिवसात माणसाचे बोलणे सुरू होते. प्रत्येक प्राणी त्याच्या विशिष्ट भाषेत बोलत असला तरी माणसाला जे बोलता येते ती देणगी फारच मोलाची आहे असे मला वाटते. आपल्या मनातील भावना, आपले विचार, एखाद्या गोष्टीला दिलेले उत्तर, हे सारे आपल्याला व्यक्त करता येते हे किती आश्वासक आहे. माणसाला बोलता यायला लागल्यावर विविध भाषा तयार झाल्या. त्याच्या लिपी तयार झाल्या. फक्त मौखिक अशा भाषा आणि लिपीबद्ध झालेल्या भाषा यांच्यात फरक असला तरी हजारो भाषा आज जगभर बोलल्या जातात. त्या त्या भाषेत अफाट असे शब्दभांडार आपणच हजारो वर्षात निर्माण करून ठेवले आहे. संवादाची भाषा, लिखित प्रमाणित भाषा असे भाषेचे वर्गीकरण असले तरी “मनापासून साधलेला संवाद” सर्वश्रेष्ठ ठरेल हे नक्की.
प्रेमाची भाषा बोलायला लिपी लागत नाही. ते सारे हृदयापासून त्या हृदयापर्यन्त पोचणारे बोलणे असते.
एका शब्दाखातर दोन माणसे, दोन समूह जोडले जातात तर एखाद्या वाक्यासाठी प्रसंगी मोठमोठी युद्धे घडतात. क्रोध, मोह, मत्सर यांच्यापायी आपण कित्येकदा कठोर बोलतो. समोरच्याला त्यामुळे किती वेदना झाली असेल याचा विचार भावनेच्या भरात बोलताना लक्षात येत नाही.
प्रसंगी एखाद्याची चूक दाखवून देतानादेखील आपल्याला शांत आणि प्रेमाने बोलता यायला हवे. “पेरिले ते उगवते.. बोलण्यासारखे उत्तर येते..” हे आपल्याला माहिती असते तरी आपण का कठोर बोलतो याचा विचार व्हायला हवा. आपले कठोर बोलणे, शिव्या देणे, दुसऱ्यावर संशय घेऊन त्याला दूषणे देणे हे सारे प्रयत्नपूर्वक टाळायला हवे. कमी करत न्यायला हवे.
एकाने कटू शब्द उच्चारले की आपण तसे वागणे हे साहजिकच. मात्र त्यामुळे आपण सुसंस्कारित असल्याचे वेगळेपण ते मग काय उरले हे आपल्याला जाणवले पाहिजे. आपल्याला एखाद्याने शिव्या दिल्या, दूषणे दिली, आपल्यावर आरडाओरडा केला की आपण दुःखी होतो मग आपण असे वागणे टाळायला हवे. अगदी हेच समर्थ दासबोधात सांगताना दिसतात, ते म्हणतात,
कठीण शाब्दे वाईट वाटते, हे तो प्रत्ययास येते
तरी मग वाईट बोलावे ते, काय निमित्त्ये..
आपणास चिमोटा घेतला, तेणे कासावीस झाला
आपणावरून दुसऱ्याला, राखीत जावे..
म्हणूनच कटू न बोलता यापुढे आपण अधिकाधिक मृदुवचने बोलत जाऊ असे आता ठरवायला हवे. तुम्हाला काय वाटते?
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

Friday, 2 February 2024

उत्तम श्रोते होऊया...

मना सज्जना...भाग : 09
उत्तम श्रोते होऊया..
- सुधांशु नाईक
शुक्रवार 02/02/24
रोजच्या व्यावहारिक आयुष्यात आपण खूप गोष्टी करत राहतो. त्यासाठी समाजात वावरावे लागते. आपली इच्छा असो वा नसो, अनेकांशी चर्चा करावी लागते. काम करावे लागते, काम करवून घ्यावे लागते. प्रत्येक वेळी होणारे संभाषण हे आपल्याला रुचेल, हवे असेल तसेच असेल असे घडत नाही. कित्येकदा असे घडते की समोरची व्यक्ती आपल्याला काय नेमकं सांगायचे आहे ते समजून न घेताच बोलत राहते. आपल्या मनाने ती व्यक्ती विविध अर्थ काढत राहते आणि मग आपलेच मन अस्वस्थ होऊन जाते. कित्येकदा पूर्ण अभ्यास न करताही माणसे बोलत राहतात. त्यामुळे मॅनेजमेंटच्या क्षेत्रात, शिक्षणक्षेत्रात आणि समुपदेशन क्षेत्रात श्रोता होणे फार गरजेचे ठरते.
उत्तम श्रोता होणे हे फार मोठे कौशल्य आहे. A Good listener gains half of the knowledge by careful listening while other half can be gained by deep thinking process असे म्हणतात. आपल्या संस्कृतीतदेखील उत्तम श्रवण, मनन आणि चिंतन या गोष्टीना अतिशय महत्व दिले आहे. डॉक्टर, वकील, समुपदेशक, मानसोपचार तज्ञ आदि सर्वाना समोरच्या माणसाचे सारे काही नीट ऐकून घ्यावे लागते. कोणतीही गोष्ट समजून घेण्यासाठी शांतचित्ताने श्रवण करणे गरजेचे असते.
एकदा का आपण श्रोत्याची भूमिका स्वीकारली की समोरच्या व्यक्तीची भाषा, शब्द संग्रह, देहबोली, त्या विषयातील त्याचा अभ्यास हे सारे आपल्याला अधिक बारकाईने न्याहाळता येते, ऐकता येते. आपल्या मनातील शंका नष्ट होतात. नव्या ज्ञानाकडे मन चटकन वळते.
एखाद्या क्षणी ऐकलेला एक उत्तम विचार आपले आयुष्य बदलायला कारणीभूत ठरतो. कधी तो विचार एखाद्या मित्राने सांगितलेला असतो, कधी शिक्षकानी सांगितलेला असतो तर कधी आई वडीलानी सांगितलेला असतो. अनेकदा लहानपणी ऐकलेली एखादी गोष्ट मनात कायमची ठसून जाते. कधी ती दानशूर शिबी राजाची असते, कधी राम-कृष्णाच्या पराक्रमाची असते, कधी एकमेकाना मदत करणाऱ्या मित्रांची असते. मन लावून आपण जे ऐकतो त्याचा मनावर खोलवर ठसा उमटतो आणि आपल्या आयुष्यावर त्याचा बरा वाईट परिणाम होतो.
अनेक ज्येष्ठ व्यक्तींची चरित्रे, मनोगते, भाषणे जेंव्हा आपण ऐकतो तेंव्हा लहानपणी ऐकलेली एखादी गोष्ट,एखाद्या व्यक्तीचे बोलणे याची आठवण सांगितलेली आहे हे लक्षात येते. उत्तम श्रोता झाल्याने आपलेच भले होते त्याची शेकडो उदाहरणे देता येतील. म्हणूनच समर्थ म्हणतात,
श्रवणे आशंका फिटे, श्रवणे संशय तुटे
श्रवण होता पालटे, पूर्वगुण आपुला .. ||7-8-5
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जे काही गुण अंगी बाणवावे लागतात त्यात “उत्तम श्रोता होणे” हा गुण नक्कीच समाविष्ट करायला हवा असे मला वाटते.
- सुधांशु नाईक(9833299791)🌿