सुधांशु नाईक
शनिवार 17/02/24
आपल्या मनाची जडणघडण विविध प्रकारे होत असते. आई वडील, गुरुजन आदि ज्येष्ठ व्यक्तींनी केलेले मार्गदर्शन, आपल्या लहानपणापासून घेतलेले अनुभव, आपले शिक्षण, आसपासच्या लोकांचे, समाजाचे आपण केलेलं निरीक्षण आदि गोष्टीमुळे आपली एक धारणा बनलेली असते. अमुक एक गोष्ट घडली तर आपण कसे वागावे, कसे बोलावे याबाबत आपल्या मनाचे कंडीशनिंग झालेलं असते. त्यामुळे कित्येकदा असे घडते की कुणी कितीही काही सांगितले तरी आपल्याकडून पुन्हा पुन्हा तेच आणि तसेच घडत राहते. एखादे काम करायला मोठ्या उत्साहात सरसावून जाणारी माणसे काही वेळातच पुन्हा माघारी येतात. किंवा त्याच त्याच चौकटीत गोलगोल फिरत राहतात. “अरुन फिरून गंगावेस...”, “फिरून फिरून भोपळे चौक...” “ये रे माझ्या मागल्या..” असे वाक्प्रचार लोकांच्या या वागण्यामुळे निर्माण झाले आहेत. असे का घडते? त्याचे मुख्य कारण म्हणजे असुरक्षित वाटणे.
आपण आपले कम्फर्ट झोन सोडायला अनेकदा तयार नसतो. त्यामुळे एखाद्या क्षणी भारावून जाऊन आपण काहीतरी कृती करायला जरूर तयार होतो मात्र अर्ध्या वाटेवर जाताना ज्या क्षणी आपल्याला भीती वाटते, असुरक्षित वाटते, स्वतःचा आत्मविश्वास डळमळीत झाल्यासारखे वाटते तेंव्हा आपण पटकन यू टर्न मारून आहोत तिथे परत येतो. अशा वेळी स्वतःचे पूर्ण निरीक्षण आणि परीक्षण करणे गरजेचे असते.
आपण जी कृती करायची ठरवली त्यातील खाचखळगे, त्यातील अडचणी, त्यातील बऱ्यावाईट गोष्टी यांचा नीट अभ्यास जर आपण केला असेल तर असे यू टर्न मारायची वेळ शक्यतो येत नाही. आपल्या मनात अनेक विचार येत असतात. नवनव्या कल्पना आपल्याला भुरळ घालत असतात. अशावेळी त्या कल्पना किंवा स्वप्नांना सत्यात आणायचे असेल तर प्राक्टिकल विचार अमलात आणावे लागतात. मग ते अभ्यास करणे असो, एखादा व्यवसाय उभा करणे असो किंवा नोकरीतील कामे. इतकच नव्हे तर नातेसंबंध, घराचे व्यवस्थापन, आर्थिक नियोजन अशा सगळ्या गोष्टीबाबत “यू टर्न” घ्यावा लागणे जितके टाळता येईल तितके बरे असते. त्यासाठी त्या वाटेवर चालायला सुरुवात करण्यापूर्वी अधिकाधिक बारकाईने नियोजन करणे, येणाऱ्या अडचणींचा अंदाज घेऊन आपले risk management नियोजन तयार ठेवणे क्रमप्राप्त ठरते.
जेंव्हा एखाद्या ध्येयाने प्रेरित होऊन आपण वाटचाल करतो तेंव्हा त्यात शक्यतो माघार घ्यायला लागू नये. मात्र तरीही कधीतरी एखादी वाईट वेळ येतेच.
प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या आयुष्यात देखील पुरंदरच्या तहासारखी वेळ आली होती. जिथे बहुतांश स्वराज्य शत्रूला द्यावे लागणार होते. त्याही वेळी महाराजांनी अधिक चतुराईने हालचाली केल्या आणि ती माघार अशा प्रकारे घेतली की पुन्हा नव्याने भरारी घेण्यासाठी कधीही सज्ज होता येईल. आपल्यालाही आपल्या लहानमोठ्या कामात तसेच वागण्याचा प्रयत्न करायला हवा म्हणजे अपयश, पराभव यांच्यासारखे क्षण येऊन यू टर्न घ्यावा लागणार नाही.
- सुधांशु नाईक(9833299791)🌿
No comments:
Post a Comment