मृदुवचने बोलत जावे..
सुधांशु नाईक
शनिवार 03/02/24
जन्म झाल्यापासून काही दिवसात माणसाचे बोलणे सुरू होते. प्रत्येक प्राणी त्याच्या विशिष्ट भाषेत बोलत असला तरी माणसाला जे बोलता येते ती देणगी फारच मोलाची आहे असे मला वाटते. आपल्या मनातील भावना, आपले विचार, एखाद्या गोष्टीला दिलेले उत्तर, हे सारे आपल्याला व्यक्त करता येते हे किती आश्वासक आहे. माणसाला बोलता यायला लागल्यावर विविध भाषा तयार झाल्या. त्याच्या लिपी तयार झाल्या. फक्त मौखिक अशा भाषा आणि लिपीबद्ध झालेल्या भाषा यांच्यात फरक असला तरी हजारो भाषा आज जगभर बोलल्या जातात. त्या त्या भाषेत अफाट असे शब्दभांडार आपणच हजारो वर्षात निर्माण करून ठेवले आहे. संवादाची भाषा, लिखित प्रमाणित भाषा असे भाषेचे वर्गीकरण असले तरी “मनापासून साधलेला संवाद” सर्वश्रेष्ठ ठरेल हे नक्की.
प्रेमाची भाषा बोलायला लिपी लागत नाही. ते सारे हृदयापासून त्या हृदयापर्यन्त पोचणारे बोलणे असते.
एका शब्दाखातर दोन माणसे, दोन समूह जोडले जातात तर एखाद्या वाक्यासाठी प्रसंगी मोठमोठी युद्धे घडतात. क्रोध, मोह, मत्सर यांच्यापायी आपण कित्येकदा कठोर बोलतो. समोरच्याला त्यामुळे किती वेदना झाली असेल याचा विचार भावनेच्या भरात बोलताना लक्षात येत नाही.
प्रसंगी एखाद्याची चूक दाखवून देतानादेखील आपल्याला शांत आणि प्रेमाने बोलता यायला हवे. “पेरिले ते उगवते.. बोलण्यासारखे उत्तर येते..” हे आपल्याला माहिती असते तरी आपण का कठोर बोलतो याचा विचार व्हायला हवा. आपले कठोर बोलणे, शिव्या देणे, दुसऱ्यावर संशय घेऊन त्याला दूषणे देणे हे सारे प्रयत्नपूर्वक टाळायला हवे. कमी करत न्यायला हवे.
एकाने कटू शब्द उच्चारले की आपण तसे वागणे हे साहजिकच. मात्र त्यामुळे आपण सुसंस्कारित असल्याचे वेगळेपण ते मग काय उरले हे आपल्याला जाणवले पाहिजे. आपल्याला एखाद्याने शिव्या दिल्या, दूषणे दिली, आपल्यावर आरडाओरडा केला की आपण दुःखी होतो मग आपण असे वागणे टाळायला हवे. अगदी हेच समर्थ दासबोधात सांगताना दिसतात, ते म्हणतात,
कठीण शाब्दे वाईट वाटते, हे तो प्रत्ययास येते
तरी मग वाईट बोलावे ते, काय निमित्त्ये..
आपणास चिमोटा घेतला, तेणे कासावीस झाला
आपणावरून दुसऱ्याला, राखीत जावे..
म्हणूनच कटू न बोलता यापुढे आपण अधिकाधिक मृदुवचने बोलत जाऊ असे आता ठरवायला हवे. तुम्हाला काय वाटते?
- सुधांशु नाईक(9833299791)🌿
No comments:
Post a Comment