- सुधांशु नाईक
शुक्रवार 16/02/24
आपल्या मनाशी ठरवलेले कार्य आपण करायचे ठरवले की त्यात स्वतःच आपण विविध अडचणी तयार करतो. आपल्या वर्तणुकीमुळे कित्येकदा ठरवलेले नियोजन फिसकटते. त्यासाठी कधी आळस कारणीभूत असतो तर कधी आपली मनस्थिती. कोणतेही महत्वाचे काम करण्यासाठी पूरेपर नियोजन आणि एकाग्रता जशी महत्वाची असते तसेच महत्वाचे आहे ते म्हणजे आपली मनस्थिती द्विधा नसणे. आपल्या आसपास वावरणाऱ्या व्यक्तीमधील एखादी व्यक्ती तरी अशीच द्विधा मनस्थिती असणारी असते.
माझे एक जवळचे नातेवाईक असेच होते. कोणत्याही गोष्टीत त्यांची द्विधा मनस्थिती असायची. जेवायला बसले तरी पोळी आधी खायची की भात आधी खायचा, अशा अनेक छोट्या मोठ्या प्रश्नात ते गुंतून जात. कामाच्या ठिकाणी पण हाच गोंधळ सुरु असे. त्यामुळे लहान मोठे निर्णय घेण्यात उशीर होत असे. कित्येकदा योग्य निर्णय खूप उशिरा घेतला जाई त्यामुळे त्याचा फायदा दिसत नसे. अशी कितीतरी माणसे आपण आसपास पाहतो. आपली द्विधा मनस्थिती का होते यावर खरच गांभीर्याने विचार करायला हवा.
द्विधा मनस्थितीची मुख्य कारणे बरीच आहेत. लहानपणी पाहिलेले, अनुभवलेले काहीतरी हा सगळ्यात महत्वाचा भाग. त्यामुळे माणूस बुजरा होऊ शकतो आणि आक्रमकदेखील. आपण नीट काम करू शकत नाही असे स्वतःला वाटत असेल किंवा मग इतरानी सतत तसे ऐकवले असेल तर मग सतत आपण निवडलेला पर्याय चूक तर नाही यासाठी अधिक विचार केला जातो. आणि मोक्याच्या क्षणी चुकीचा पर्याय निवडला जाऊ शकतो. कित्येकदा अतिविचार करणारी माणसे द्विधा मनोवृत्तीत सापडलेली दिसतात. नुसत्या विचार करत बसण्याच्या नादात कृती करायची वेळ निघून जाते.
कित्येकदा परिस्थिती स्वीकारायची तयारी नसली तरीही माणसे द्विधा मनस्थितीत सापडतात. नेमके काय करायला हवे हे माहिती असूनही इतर पर्याय शोधत बसतात. वेळेवर निर्णय न घेतल्याने मग खर्च जास्त करावा लागणे, वेळेत काम पूर्ण करता न येणे, प्रसंगी अपयशी ठरणे आदि गोष्टीना सामोरे जावे लागते. द्विधा मनस्थिती ही सर्व वयोगटातील माणसांना सतावते. अगदी पारमार्थिक कार्यात, योगविद्या, तपाचरण करणाऱ्या लोकांना देखील याचा त्रास होतो. नेमके भजन कसे करावे, कोणत्या पद्धतीने करावे, कुणाचे ऐकावे हे सगळं उमगेनासे होते. मन गोंधळून जाते. आणि जेंव्हा मन गोंधळते तेंव्हा हमखास चुका करते.
सुख सुख म्हणतां हे दुःख ठाकूनी आले ।
भजन सकळ गेले चित्त दुश्चित जाले ।
भ्रमित मन कळेना हीत ते आकळेना ।
परम कठिण देही देहबुद्धी वळेना ॥
द्विधा मनस्थिती म्हणजे चित्त दुश्चित झाले की आपण मूळ विचारापासून, ध्येयापासून भरकटत जाणे सहज घडते. एखाद्या योग्यासाठी, एखाद्या व्यवसायासाठी असे भरकटत जाणे म्हणजे जणू पुन्हा शून्यवत होणे असते. त्यामुळे ज्याला आयुष्यात खूप काही करून दाखवायचे असते त्याने या मनोवृत्तीवर विजय मिळवणे अपरिहार्य ठरते.
- सुधांशु नाईक(9833299791)🌿
No comments:
Post a Comment