मना सज्जना...भाग 12: नियोजन
सुधांशु नाईक
शुक्रवार 09/02/24
आपल्या मनाला स्वस्थता जर हवी असेल तर ज्या महत्वाच्या गोष्टी आपल्या जगण्याचा भाग बनायला हव्यात त्यातील नियोजन ही एक अग्रगण्य गोष्ट. ध्येय आणि ते साध्य करण्यासाठीची कृती यातील महत्वाचा दुवा म्हणजे नियोजन. नियोजन आणि दूरदृष्टीसाठी समर्थ रामदास दीर्घसूचना असा शब्द दासबोधात वापरतात. एके ठिकाणी ते म्हणतात;
म्हणौन असावी दीर्घ सूचना | अखंड करावी चाळणा |
पुढील होणार अनुमाना | आणून सोडावें ||
भविष्यात काय घडेल याचा अंदाज घेऊन योग्य ते नियोजन करावे, विविध कामाची आखणी करावी, अनेक लोक जोडून घ्यावेत, त्यांच्या कुवतीनुसार काम द्यावे असे सगळे केले तर त्यानुसार कार्य सिद्धीस जाते असे समर्थांना वाटते.
ज्या व्यक्तीना योग्य नियोजन करता येते ते कायमच त्यांच्या बहुतेकशा कामात यशस्वी होतात. प्रत्येकवेळी यश मिळेलच असे नव्हे पण योग्य नियोजन केले तर आपल्याला विविध चुका टाळता येतात. प्रसंगी ज्यातून नुकसान होत आहे असे जाणवते ते निर्णय बदलण्यासाठी आपण आधीच नियोजन केलेले असल्याचा फायदा मिळतो. नियोजन आणि दूरदृष्टी या जणू हातात हात घालून येणाऱ्या गोष्टी. भविष्यातील कामाकडे असे पाहता यायला हवे. आजच्या काळात ज्याला risk mitigating planning म्हणतात ते करता यायला हवे. आणि हे सर्व क्षेत्रात जरुरीचे आहे. ज्यांना हे सारे जमते त्यांच्या कृती यशस्वी होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून समर्थ दुसऱ्या ठिकाणी लिहितात;
दीर्घ सूचना आधी कळे । सावधपणे तर्क प्रबळे ।
जाणजाणोनि निवळे । यथायोग्य ।।
ते किंवा सध्याच्या काळातील विविध लहानमोठे मानेजमेंट गुरु हे प्लानिंग किंवा नियोजनासाठी कायमच प्राधान्य देताना दिसतात. मुळात प्लानिंग किंवा नियोजनाची सवय लहानपणापासून लावावी लागते तर ती पुढे आयुष्यभर अंगी टिकून राहते.
शाळेत जायचं असेल तर आपले दप्तर, पाण्याची बाटली, वेलापत्रकानुसार वह्या पुस्तके घेणे हे सगळे लहान मुलांना त्या वयात शिकवले पाहिजे. तिथपासून मोठ्या माणसांची घरची आणि कार्यालयीन कामे या सगळ्यासाठी अशा सवयी अंगी बाणवणे गरजेचेच. परगावी जायचे असेल तर किती वाजता उठावे, किती वाजता जावे हे सारे आपण कसे करतो, रोजच्या कामाचे आपण कसे नियोजन करतो, आपण ऐनवेळी धावपळ करतो का, आपण आपली कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी नेमके काय करतो इत्यादी इत्यादी गोष्टी मुले पाहत असतात. त्यांना हे असे अप्रत्यक्ष शिक्षण आपल्याकडून मिळायला हवे.
तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असला तरी नियोजनबद्ध केलेले काम हे यशस्वी होण्याची शक्यता अधिकाधिक असते हेच खरे.
- सुधांशु नाईक(9833299791)🌿
No comments:
Post a Comment