सुधांशु नाईक
शनिवार 10/02/24
आपण माणसे बहुतेकवेळा स्वतःचा जास्त विचार करतो. मात्र दुसऱ्याच्या हिताचा विचार करणे, त्यासाठी प्रसंगी आपला वेळ, आपली शक्ती खर्च करणे हे आपल्यातील माणुसकी जिवंत असल्याचे लक्षण आहे. परोपकार किंवा दुसऱ्याला सहकार्य करत राहण्याची सवय ही लहानपणापासून अंगी बाणवायला हवी. परोपकार करण्याविषयी समर्थ म्हणतात,
शरीर परोपकारी लावावे,
बहुतांच्या कार्यास यावे,
उणे पडो नेदावे,
कोणीएकाचे !
परोपकार करण्यासाठी खूप मोठी धनसंपत्ती सोबत असायला हवी असे नाही. समोरच्या व्यक्तीची गरज ओळखून त्याला सहकार्य करणे, त्या व्यक्तीला त्याचा इच्छित मार्ग मिळावा यासाठी कृतीशील वर्तणूक ठेवणे हा देखील परोपकारच आहे.
आपले शरीर, आपल्या इच्छा, आपली स्वप्ने, आपले कुटुंबीय यांच्यासाठी सगळेच येनकेन प्रकारे प्रयत्न करत असतात. पण आपल्या सामान्य परिघाबाहेर असणाऱ्या व्यक्ती, प्राणी-पक्षी-वृक्षराजी यांनी भरलेले विश्व या सगळ्याचा विचार आपल्याला करता यायला हवा. मुळात असा विचार करण्याचे संस्कार हे पालकातून मुलांच्यात आपोआप येतात ही जाणीव निर्माण व्हायला हवी.
लहानपणी घरी आई स्वयंपाक करत असताना, भर दुपारी दाराशी एखादा बैरागी, एखादा गरीब माणूस येतो. आई पटकन एक भाकरी आणि त्यासोबत थोडी भाजी, एखादी चटणी एका पानावर घेते. लहान मुलाला सांगते, “बाळ, जरा त्या बुवाला हे एवढे खायला दे रे..” लहान मूल त्याला खायला देते. त्या व्यक्तीच्या चेहेऱ्यावर लगेच एक समाधान विलसू लागते. भुकेलेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी द्यावे हा विचार त्याच्या कृतीत भिनतो.
शाळेत, कॉलेजमध्ये शिकत असताना, नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी आपल्या आसपास काहीजण असे दिसतात की ते बिकट परिस्थितीतून वाटचाल करत आहेत. अंगी असलेल्या स्वाभिमानामुळे कदाचित ते मदत मागणार नाहीत, पण ते ओळखून आपल्याला सहकार्याचा हात पुढे करता यायला हवा. एखादी उपयुक्त वस्तू, वह्या-पुस्तके, हॉस्टेलची फी अशी लहानमोठी मदत न मागता आपल्याला करता यायला हवी. एखाद्याला एखादी गोष्ट जमत नसेल तर ती शिकवता यायला हवी.
एखाद्याला शारीरिक दुर्बलतेमुळे काही काम करणे नीट जमत नसेल तर कित्येकदा लोक त्याची टिंगल करतात. त्याऐवजी त्याला हातभार लावायला हवा. एखाद्या कलाकाराला प्रसंगी स्टेज मिळवून द्यावे, एखाद्या गरजावंत व्यक्तीला नोकरी मिळवून द्यावी अशी जी जी लहानमोठी कृती आपण करतो यामुळे माणूस माणसाशी जोडला जातो. नातेसंबंध हृद्य बनतात. "पुण्य परउपकार... पाप ते परपीडा.. " असं म्हणूनच तर तुकोबा सांगून गेले आहेत. परोपकार करणाऱ्या व्यक्ती उत्तमगुणी मानल्या जातात. आपण उत्तमगुणी व्हावे असे कुणालाही वाटतेच. बरोबर ना?
- सुधांशु नाईक(9833299791)🌿
No comments:
Post a Comment