पुस्तक परिचय या मालिकेत हा परिचयात्मक लेख माझ्या एका अतिशय आवडत पुस्तकाविषयी...
गोनिदांची निखालस, निर्मळ आणि भावोत्कट “ मृण्मयी ”
- सुधांशु नाईक.
गो. नी. दाण्डेकर. मराठी सारस्वतातलं एक अग्रगण्य नाव. उदंड भ्रमंती केलेल्या गोनीदांनी महाराष्ट्र अक्षरशः पायी फिरून पालथा घातलेला. वेगवेगळ्या भागातलं लोकजीवन, भाषा, निसर्ग, राहणीमान हे सारं उत्कटतेने न्याहाळलं. ज्ञानोबा, तुकोबा, रामदास, एकनाथ यांच्यासह अनेक संतांचं लेखन भक्तिभावाने मुखोद्गत केलं. इथला भूगोल, इतिहास, बोलीभाषा आणि अध्यात्मिक परंपरा त्यांच्यात मुरत गेल्या. हे सारं त्यांच्या नसानसात भिनलं आणि त्यांच्या लेखणीवाटे निर्माण झालेल्या प्रत्येक साहित्यकृतीतून तरल, मुलायमपणे झरत राहिलं आनंदाचे मळे फुलवत. एखादा झरा जसा आसपासच्या हिरवाईचा रंग आणि रूप सोबत घेऊन लोकांना मोहवत राहतो तसं मग त्यांचं लेखन साहित्यप्रेमींना सतत आनंद देत राहिलं.
अनेक बोलीभाषांवर समर्थ प्रभुत्व असलेला हा एक थोर साहित्यिक. त्यामुळे विविध प्रांतातल्या बोलीभाषा त्यातील सामर्थ्य, गोडवा आणि लहेजा घेऊन येतात त्या त्यांच्याच साहित्यात. परत प्रत्येक कादंबरीतला प्रांत वेगळा. तिथली भाषा वेगळी.
वऱ्हाडी, वैदर्भी, कोकणी, खानदेशी, मावळी, आदिवासी अशा अनेक बोलीभाषांचा सुयोग्य वापर गोनीदांच्याच साहित्यात अतिशय ताकदीने सामोरा येतो.
“शितू”, पडघवली”, “कुणा एकाची भ्रमणगाथा”, “माचीवरला बुधा”, “पवनाकाठचा धोंडी”, “ तुका आकाशाएवढा”, “दास डोंगरी राहतो”, “ मोगरा फुलला”, “जैत रे जैत”, “आम्ही भगीरथाचे पुत्र”, “ तांबडफुटी”, “ पूर्णामायची लेकरं” अशा त्यांच्या कादंबऱ्यानी रसिकांना वेड लावलं. त्यांनी उभ्या केलेल्या कादंबरीमय शिवकालानं लोकांना तत्कालीन समाजजीवनाचं प्रत्ययकारी दर्शन घडवलं. विपुल लेखन केलेल्या गोनिदांची स्वतःची अत्यंत आवडती कादंबरी होती “मृण्मयी”.
आज त्याच मृण्मयीबद्दल!
पुस्तक – मृण्मयी
लेखक गो. नी. दाण्डेकर
प्रथम आवृत्ती- सप्टेंबर १९७०. मॅजेस्टिक प्रकाशन.
(सध्या गोनिदांच्या कन्या वीणा देव यांनी मृण्मयी प्रकाशनाअंतर्गत गोनिंदांची यासह विविध पुस्तकं पुनर्प्रकाशित केली आहेत)
असं म्हणावंसं वाटतं की ही जणू गोनीदांच्या हृदयात वास करून राहिलेल्या त्यांच्या स्त्रीरुपाचीच कथा. या भवतालावर उदंड प्रेम करणारी ती निसर्गप्रेमी आहे. ती राधा आहे, ती मीरा आहे आणि तीच ज्ञानेश्वरांची विराणी देखील आहे. तिचं सुंदरतेवरचं प्रेम फार फार हळवं आहे. हळव्या मनोवृत्तीच्या लोकांचं जगणं वेगळंच असतं. त्यांची आव्हानही वेगळीच असतात. त्या आव्हानांना भिडण्याची त्यांची ताकदही वेगळीच असते. आपल्याला थक्क करणारी. हे असं बरंच काही एका संथ प्रवासातून हळुवार सामोरं येत राहतं या कादंबरीतून.
प्रस्तावनेत गोनीदा मृण्मयीच्या तोंडून म्हणतात, “तात्यांची मी अतिशय ऋणी आहे. धरतीवर निरातिशय प्रेम करणं त्यांनी शिकवलं. ओंजळ भरभरून काव्य दिलं. मज दुबळीला ज्ञानोबा-तुकोबांच्या हाती दिलं. विरागिनी मीरेच्या ओटीत घातलं. जनीच्या चंदनी वेदनांचा परिचय करून दिला. हे पदरी नसतं तर कशाच्या आश्रयानं उभी राहू शकल्ये असत्ये मी? तात्यांची शब्दकळा मजपाशी नाही. तरीही जमेल तसं लिहायचा प्रयत्न करत्ये. मृण्मयी हे नाव तात्यांनी योजलं होतं. ते मी बदललं नाही. करंगळीनं पाण्यावर काढलेलं हे रेखाचित्र आहे...!”
कादंबरी सुरु होते दाभोळ खाडीच्या निसर्गरम्य परिसरातून. ते वर्णनच आपल्याला वेढून टाकतं.
गोनीदा लिहितात, “ दो बाजूंच्या डोंगरातून वाहणाऱ्या पर्ह्याच्या दोन्ही बाजवांवर हिरव्या कच्च बागांची दाटी. माडांचे झुम्बाडे स्वस्थपणे डुलत असलेले. आकाशात उंच बसलेल्या देवावर धरती जणू चवऱ्या वारत्ये आहे.! या बागांतून अलगद डोकी वर काढणारी कौलारू घरं. क्वचित कुण्या घरांतून वर उठणारा धूर. हेलकावे खात, विरळ होत आकाशी विरून जाणारा. पहात बसावंसं वाटे. दृष्टी ढळवू नये, पापणी मिटू नये. त्याच्यात हरपून जावं...”
हे सगळं असं शांतपणे शब्द न शब्द वाचत, तो मनात हळूवार मुरवत, त्या चित्रमय वर्णनाचा आनंद घेत गोनीदांचे साहित्य वाचावे लागते तरच त्यातली गोडी कळते. आपलं विश्व भरून टाकते. ५ मिनिटात उरकलेल्या जेवणासारखं हे उरकता येत नाही. उरकू नयेच.
मृण्मयीचे वडील पोटासाठी भटकत मग हे निसर्गरम्य कोकण सोडून कुठं कुठं जातात. शेवटी विदर्भात स्थिर होतात. त्यांच्या मनातलं जपलेलं कोकण मग मुलीच्या मनात पाझरते. तिला जणू आपला मुलगाच मानून ते खूप काही शिकवत राहतात. त्यांच्याकडच्या पुस्तकातून जग दाखवत राहतात. लहानगी मनू लहानपणी मोठी होत जाते. समजूतदार होते. जीवघेण्या उन्हाच्या कहारात एकदा शेवटी तिचं पितृछत्र हरपतं. कोकणात पुन्हा जायची, तिथलं घर पुन्हा नांदते करायची त्या बागा पुन्हा निगुतीनं फळत्या-फुलत्या करायची त्यांची इच्छा अपुरीच राहते. आणि तीच इच्छा पूर्ण करायचं स्वप्न मृण्मयी उराशी बाळगते. मग सुरु होतो एक वेगळा प्रवास.
अति कठीण असा.
ज्या मोठ्या घराच्या आश्रयाने ते कुटुंब राहत असतं तिथं दुपारच्या पोळ्या करायचं काम तिच्या आईला करायची वेळ आली तर मनूने तिथल्या बायकांना दुपारी ज्ञानेश्वरी वाचून दाखवावी असं ठरलं. त्यातून त्यांना काही पैसे मिळायची सोय झाली. जेंव्हा इतर मुलं शाळेत शिकत असतात तेंव्हा मनावर दगड ठेऊन घर सांभाळताना लहानग्या मनूला वाटेत अनेक माणसे भेटत राहतात. त्यांचे राग-लोभ सारं काही सोसत ती पुढं जात राहते.
आणि मग ठाई ठाई तिचे वडील- तात्या तिला आठवत राहतात. गोनीदांनी लिहिलेला असंच एक उत्कट प्रसंग. मनू तिच्या दुर्गा या मैत्रिणीशी बोलताना म्हणतेय;
“ अर्धमुर्ध आकाश मेघांनी भरलेलं. पलीकडे लांबवर पाऊस उतरला होता. तिकडून वारा सुटला होता. मऊ मृद्गंध चहू दिशांनी भरून उरला होता. किती घेऊ न किती नको. अचानक तात्यांचं स्मरण झालं. कितीदा हा मृद्गंध माझ्या मनात भरवत ते रानांतून भटकले होते. त्यांनी माझ्यासाठी फार केलं होतं दुर्गे. एकदा ते बाहेरगावी गेलेले. तिथून परतत असताना गारांचा पाऊस सुरु झाला. मला गारा आवडत. मग तात्यांनी धोतरात ओचा भरून गारा गोळ्या केल्या. एकेक अशी मोठाल्या बोराएवढी गार. आणि मग धावत, धापा टाकत घरी परतलेले.. मला गारा खाऊ घालण्यासाठी...”
हे असे अनेक अलवार कोमल संवाद अक्षरशः पुस्तकभर विखुरले आहेत. मनाला खोलवर स्पर्शून जाणारे.
गरिबाला अब्रू नसते असं म्हणत एकेकाळी. लहानग्या मनूलाही काय काय सोसावं लागलं. केवळ कोकणात जायला मिळणार म्हणून अत्यंत वाईट अशा मुलाशी, मालकीणबाईनी जुळवलेली तिची सोयरिक ती स्वीकारते आणि लग्न करून कोकणात जाते. नवऱ्याचे- सासूचे अत्याचार मन घट्ट करून सोसत राहते. लहानशा बागेत काम करत, त्या माडा-पोफळीत, केळीच्या बागेत स्वतःच्या वेदना विसरू पहाते. वाईट चालीच्या नवऱ्याला शेवटी शासन होतं आणि उघडी पडलेली मनू अधिकच मनानं घट्ट होते. ज्ञानेश्वरीचे संस्कार जणू जगू लागते. जे काही शेवटी ती करते ते केवळ अविश्वसनीय असंच. मीरेसारखं...! तो शेवट शेवटचा प्रसंग अंगावर काटा आणतो. आपण दिङमूढ होऊन राहतो!
पुस्तकाच्या मलपृष्ठावर जे मनोगत गोनीदांनी लिहिलंय ते इथं सांगायला हवंच. त्याविना सारं काही उणे आहे.
ते लिहितात, “ मृण्मयी हे केवळ मात्र शब्दकृत्य नव्हतं, तो एक अध्यात्मिक अनुभव होता. अश्या तश्या कुणाचा नव्हे, तो मीरेचा होता. मीरा जीवनाच्या उत्तरार्धात द्वारकेला जाऊन राहिली. तिच्या इथं जो येई त्यांना इच्छाभोजन मिळे. एक दिवस एक तरणा देखणा जोगी येऊन उभा राहिला. त्यानं मीरेकडे इच्छाभोजन म्हणून तिचं शरीर मागितलं.
इवलं हासून ती म्हणाली, “ बस? हेच मागितलंत? ते तरी कुठं माझं उरलंय ? ते तर हरीनिर्माल्य आहे. हे माझे सखे-सहोदर भवताली बसले आहेत. त्यांच्या समक्षच घ्या. विस्कटून टाका. इथंच अंथरूण मागवत्ये..”
या मृण्मयीनं- मनुनं ही जोश्याला असंच काहीसं म्हंटलं, “ हा तर आहे श्रीहरीच्या रूपावरून उतरलेला उतारा. माझी तिळमात्र सत्ता नाही याच्यावर. घ्या, विस्कटून टाका.. जे कराल ते या माझ्यांच्या साक्षीनं होऊ द्या. या माडांच्या झावळ्या डोलत असोत, राताम्ब्यांची पालवी हलत असो....
हे ज्याला कळलं त्याला मृण्मयी कळली. तो यत्नपूर्वक समजून घ्यायचा विषय आहे. केवळ पाने उलटायचा ग्रंथ नव्हे...”
आपण मृण्मयीचे शेवटचे पान उलटतो.. पुस्तक संपतं. तरी मनभर उठलेलं काहूर भावविभोर करून टाकतं. आपण आपले उरत नाही. पुढचे अनेक दिवस मृण्मयी मनात किणकिणत राहते.. मंदिरातील नाजूक घंटेसारखी. निर्मळ भावनांनी वेढत राहते...!
सुधांशु नाईक, कोल्हापूर ( ९८३३२९९७९१) 🌿
No comments:
Post a Comment