marathi blog vishwa

Sunday, 15 November 2020

पुस्तक परिचय # वेध महामानवाचा:- डाॅ. श्रीनिवास सामंत

पुस्तक परिचय या लेखमालेतील  पुढील ग्रंथाविषयी अनेकांशी यापूर्वी गप्पांमध्ये, माझ्या शिवचरित्रावरील व्याख्यानातून सांगितले आहे, आज लिहितो. 
- सुधांशु नाईक
छत्रपती शिवाजी महाराज हा मराठी माणसाचा अत्यंत आवडता विषय. आजवर विविध शिवचरित्रे, शिवरायांच्या कार्याचा मागोवा घेणारी विविध पुस्तके, कथा- कादंब-या सर्वांनी वाचल्या असतीलच. मात्र ज्या विविध युध्दांतील पराक्रमांमुळे शिवरायांना देवत्व मिळालंय त्या युध्दांविषयी तसेच एकंदर शिवरायांची कार्यपध्दती, राजकारण, अर्थकारण याचा समग्र व वेगळ्या पध्दतीनं आढावा घेणारं माझे दोन अत्यंत आवडतं असे ग्रंथ म्हणजे विजयराव देशमुख यांनी लिहिलेलं शककर्ते शिवराय अन् दुसरा अधिक महत्वाचा ग्रंथ म्हणजे वेध महामानवाचा... आज या विषयी...
ग्रंथ : वेध महामानवाचा
लेखक : डाॅ. श्रीनिवास सामंत
प्रकाशन : देशमुख आणि कंपनी
प्रथमावृत्ती 1996, 1998. 
( सध्या कितवी आवृत्ती बाजारात आहे हे माहिती नाही.)
माझ्याकडील द्वितीय आवृत्तीचे मूल्य : 500 रु.

डाॅ. श्रीनिवास सामंत हे मुंबई विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक. तसेच भारत व फ्रान्सच्या एका संयुक्त संशोधनप्रकल्पातही कार्यरत. सतत सह्याद्रीत भटकंती करायचे वेड. त्यातूनच इथला भूगोल व इतिहासाची सांगड घालत त्यांनी हा ग्रंथ सिध्द केलाय.
सह्याद्रीत शिवचरित्रातील महत्वाच्या घटना घडल्या त्यांबाबत चरित्रमय लेखन झालं. मात्र विविध युध्दांत प्रसंगानुरुप स्वीकारलेली युध्दनीती, इथल्या भूगोलाचा केलेला सुयोग्य वापर, त्यानुसार आखलेली रणनीती, या सगळ्याबाबत या ग्रंथापूर्वी खूपच कमी असं लेखन झालं होतं. 'वेध महामानवाचा' या ग्रंथामुळे मात्र या सर्व कालखंडातील घटनांचा युध्दनीतीच्या अनषंगानं सखोल असा इतिहास व त्यावरील विवेचन हे सारं प्राप्त झालं. त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे सामंत सरांनी या ग्रंथात बनवून समाविष्ट केलेले उत्तम असे विविध नकाशे.

 या नकाशांसाठी तरी प्रत्येकानं हा ग्रंथ जरुर पहायला हवा.
साधं एकच प्रतापगडच्या युध्दाचं उदाहरण घेऊ. अफजलखान विजापूर निघाल्यापासून कुठल्या मार्गे आला, प्रतापगडचं भौगोलिक महत्व काय, या परिसरात सैन्याची जमवाजमव कुठे व कशी केली गेली हे सर्व नकाशांचा आधार देऊन इतकं सुरेख पध्दतीनं मांडण्यात आलंय की आपल्याला जणू वाटतं हा सगळा प्रसंग आपण समोर प्रत्यक्ष पाहत आहोत.
सामंत सरांचं वैशिष्ट्य म्हणजे ते नुसता इतिहास व भूगोल मांडत नाहीत तर राजनीती, युध्दनीती कशी असावी याबाबत चाणक्यानी प्राचीन काळी लिहिलेल्या ' अर्थनीती' या ग्रंथातील संदर्भ देत हे सारं शिवाजीमहाराजांनीही किती योग्य प्रकारे हाताळलं हे साधार दाखवून देतात. एक माणूस म्हणून शून्यातून सुरुवात करताना शिवराय अन् त्यांच्या सर्व सहका-यांनी विविध नीतींचा अभ्यास करुन प्रसंगानुरुप त्यांचा कसा सुयोग्य वापर केला हे दाखवून देतात. शिवचरित्रातील बहुतेक सर्व लढाया त्यांनी या ग्रंथात कव्हर केल्या आहेतच मात्र ते करताना शिवरायांचं दैवतीकरण न करता एक बुध्दिमान राजा व त्यांचे हुषार सहकारी राजनीती, युध्दनीतीचा अभ्यास करुन त्यात किती पारंगत झाले व कसे यशस्वी झाले हे दर्शवत राहतात.
गेली 20 वर्षं शिवचरित्रावर व्याख्यानं देताना, स्लाईड शोज् दाखवताना मला व अन्य अनेक अभ्यासकांना या ग्रंथाचा फार उपयोग झाला आहे. इतकंच नव्हे तर हा ग्रंथ तुम्ही कशा प्रकारे इतिहासाकडे पाहिलं पाहिजे हेच जणू दाखवून देतो. आपणा भारतीयांना महामानवांचं दैवतीकरण करायची फार वाईट खोड आहे. त्या महामानवांचे विचाऱ, आचार, जगण्याची वृत्ती, सज्जनांचं पालन व दुर्जनांचं निर्दालन करायची त्यांची धमक हे सारं आपल्यात यावं यासाठी प्रयत्न करायचे नसतात हे कटू सत्य जाणवते. 

आपली मजल कुठवर तर या महामानवांची मंदिरं बांधून त्यांची पूजा करणे, रस्ते, चौक, शहरांना त्यांची नावं देणे इथवरच. या देशात राम-कृष्णापासून चाणक्य, चंद्रगुप्त, सम्राट हर्ष, विक्रमादित्य, सातवाहन, चालुक्य आदि अनेक मोठी माणसं होऊन गेली मात्र त्यांच्यापासून दुर्दैवानं आपण काही फारसं शिकलो नाही असं खेदानं सांगावंसं वाटतं. छत्रपती शिवरायांसारखा एक तेजस्वी पुरुष याच पंक्तीतला. या माणसांच्या मोठेपणाचा अापण अभ्यास करायला हवा अन् त्यांच्याप्रमाणे आचरण केलं तरच त्यांचं नाव घेण्याची आपली लायकी आहे असं म्हणता येईल.
वेध महामानव हा शिवरायांवरचा जसा ग्रंथ आहे तसेच अभ्यासात्मक ग्रंथ इतरांविषयी लिहिले गेले पाहिजेत तर समाजाला एक दृष्टी मिळू शकेल. शिवरायांच्या जगण्याविषयी, विचारांविषयी जाणून घ्यायची इच्छा असणा-यांना या ग्रंथाला कधीच टाळता येणार नाही असे मला वाटते. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी हा ग्रंथ अवश्य अभ्यासायला हवा हे पुन:पुन्हा मला सांगावेसे वाटते.
- सुधांशु नाईक, कोल्हापूर(9833299791)🌿

No comments:

Post a Comment