marathi blog vishwa

Sunday, 15 November 2020

पुस्तक परिचय # विश्वस्त :- वसंत वसंत लिमये

मित्रहो, पुस्तक परिचय या उपक्रमात कृष्णा दिवटे यांच्यामुळे सामील झालो. सलग आठवडाभर एका पुस्तकाचा परिचय, त्याविषयीचं मनोगत लिहायची ही साखळी. त्यातला आजचा हा पुस्तक परिचय. 

आजचं पुस्तक खूप खास असं. हे पुस्तक म्हणजे एक महाकादंबरी आहे एका अवलियानं लिहिलेली. त्या अवलिया वल्लीचं नाव आहे वसंत वसंत लिमये. नावापासून आजवरच्या आयुष्यापर्यंत ज्यांचं सारंच जगणं वेगळेपण दर्शवणारं अन् विलक्षण असं आहे. या ग्रेट व्यक्तीची ओळख झाली, त्यांनी मला आपला मित्र मानलं, त्यांच्या मुलाखती घ्यायची संधी मिळाली, त्यांच्यासोबत जरासा प्रवास करता आला हा माझा भाग्ययोग आहे!
- सुधांशु नाईक
वसंत लिमये यांना त्यांचे बहुतेक स्नेही अन् अगदी मुलंसुध्दा बाळ्या या नावानंच हाक मारतात. आपण बाळासाहेब म्हणूया. 

तर मंडळी, हे बाळासाहेब आयआयटीतून इंजिनियर झाले. घरात विद्वान व विविध भाषांवर प्रभुत्व असणारे वडील. त्यामुळे वाचन वगैरे कलांची ओढ होतीच. काॅलेजशिक्षणादरम्यान गिर्यारोहणाचा छंद लागला. थेट मग आजवर कुणीही जे धाडस केलं नव्हतं ते यांच्या टीमनं केलं... हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा सर केला. पुढील आयुष्यात कांचनजंगा सारख्या शिखरांच्या प्रथम मोहिमा. शिक्षणासाठी वगैरे घेतलेलं कर्ज फेडायला मग नोकरीला सौदी अरेबियात. तिथून पुरेसं कमवल्यावर मग साहसी पलायन. तिथून युरोपात. गिर्यारोहणातच करियर करायचं हे ठरवून काही तंत्रशिक्षण. पर्वतरोहणाचं व्यसन जडलेल्या समव्यसनी मित्रांसह मग संस्थेची स्थापना. अनेक मोहिमा. पुढे सह्याद्रीतील ताम्हिणी घाटाजवळ गरुडमाची या अडव्हेंचर व मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटर ची स्थापना. ( इथेच विराट कोहली व टीमला प्रशिक्षक अनिल कुंबळे घेऊन आल्याची बातमी व फोटोज् कदाचित तुम्ही पाहिले असतील.)
हे सर्व सांभाळून हा माणूस सह्याद्री व हिमालयात भटकंती करत राहतो व त्यासोबत उत्तम असं लेखनही!
हा परिचय वाचून जशी छाती दडपली जाते तसंच त्यांच्या महाकादंबरीचा आवाका पाहूनही! आज ज्या महाकादंबरीविषयी मी थोडसं बोलणार ती कादंबरी आहे विश्वस्त.
पुस्तक : विश्वस्त
प्रकाशन : राजहंस तिसरी आवृत्ती : 2018
मूल्य : 500 रु.
विश्वस्त ही कादंबरी म्हणजे गेल्या चार हजार वर्षातील इतिहासाचा फेरफटका आहे अन् सोबत आहे एका खजिन्याच्या शोधाची अद्भुतरम्य अशी थरारकथा. कल्पनेतील विश्वाला इतिहास व वास्तवाशी जोडत ही कादंबरी सुरुवातीपासूनच असे रंग भरत जाते की वाचणारा आजच्या रोजच्या जगण्याचं भान विसरतोच. खजिन्याविषयीच्या लहानमोठ्या शोधकथा, गूढकथा वाचणं वेगळं अन् सुमारे चार हजार वर्षातील घटनांचा ताळमेळ घालत एक भली मोठी विस्मयकारक कथा मांडणं वेगळं. यात बाळासाहेब अगदी यशस्वी झाले आहेत.  मुरलीधर खैरनार यांची सुरतेच्या लुटीतील खजिन्याविषयीची शोध ही कादंबरीही अशीच वाचकांना खिळवून ठेवणारी होती पण तिचा आवाका खूप लहान होता. विश्वस्त ची सुरुवातच मुळी होते ती भगवान कृष्णाच्या शेवटच्या दिवसांपासून..
द्वारकेत यादवी माजलीये. सगळे भाऊ भाऊ एकमेकांवर तुटून पडलेत. आपल्या संपूर्ण कुलाचा विनाश होणार हे भविष्य माहिती असलेला भगवान कृष्ण उध्दव या त्याच्या जिवलगासह मात्र शांतपणे अावराआवर करत आहे. स्थितप्रज्ञ आहे. 

त्याला सगळ्यात मोठी चिंता आहे ती द्वारकेतील अफाट मोठ्या खजिन्याची. हा खजिना यापुढील भविष्यात योग्य हाती पडावा व त्याचा जनकल्याणासाठी वापर व्हावा ही त्याची तळमळ आहे त्यातूनच मग एक योजना तयार होते खजिना गुप्त जागी पाठवायची अन् सोबत संदेश देणारा ताम्रपट.
कादंबरीतील कृष्णाच्या तोंडची ही वाक्यं फार समर्पक आहेत. तो  म्हणतो, " सारे पाश निखळून पडत असताना कसलीछ आसक्ती उरली नाही. दीर्घ आयुष्यात घडून गेलेल्या घटनांचा विषाद आहे वैफल्य आहे पण पश्चात्ताप नाही. स्वत:चे कर्म ओळखून कर्तव्यभावनेनं मी सारं करत आलो. अपार माया, प्रेम, वैभव प्राप्त झाले पण कोठल्याही मोहाला बळी न पडता मी अस्पर्श, अनासक्त राहिलो. आयुष्याची अखेर जवळ आली आहे, मिळवलेले सारे वैभव भविष्याच्या हाती हवाली करत असताना ते निर्मोही, सत्पात्री वारसदाराच्या हाती पडावे ही प्रबळ इच्छा आहे. त्याचा विनियोग जनकल्यार्थ व्हावा अशी भविष्याकडून अपेक्षा आहे. तोदेखील एक मोह आहे हे कळतंय पण आयुष्याच्या अंतिम क्षणी मात्र तो मोह सुटत नाहीये...." हे वाचूनच आपण सरसावून बसतो..

कृष्णानं उध्दवाला आपला विश्वस्त नेमून योग्य वारदारांपर्यंत ही ठेव पोचवण्याचे ठरवले. द्वारकेतील खजिना अनेक मोठ्या बोटीतून त्या वादळी रात्री रवाना झाला. एवढं प्रचंड वादळ की या बोटी मुक्कामी पोचतील की नाही हेही काळालाच ठाऊक. तसेच काही निवडलेले यादव वीर गांधार देशापलीकडे जाण्यास सिध्द झाले. उध्दव ही द्वारकाधीशानं सांगितल्यानुसार बद्रीनाथला जाऊन उध्दवनारायण संप्रदाय स्थापन करायला निघाला. या खजिन्याचा उत्तराधिकारी नेमण्याची जबाबदारी त्याच्यावरच होती यापुढे!

चार हजार वर्षांपूर्वी घडलेलं ज्यांना अजिबात माहिती नव्हतं अशा पाच मित्रांचं टोळकं 2013 मध्ये ट्रेकिंगसाठी नाशिकजवळ त्र्यंबकेश्वरच्या परिसरात दुर्गभांडार या गडावर निघालेलं असतं. मॅक उर्फ मकरंद, शॅबी उर्फ शब्बीर, प्रसाद, अनिरुध्द व ज्योअॅन ही पाचही जण फेसबुकमुळे एकमेकांच्या संपर्कात आली व दोस्त बनली. आपल्या टीमचं सहज असं नामकरण त्यांनी केलं जेएफके( just for kicks) 
दुर्गभांडार गडावरच्या मुक्कामात त्यांना एक ब्राम्ही लिपीतला ताम्रपट सापडतो अन् इतिहासाचा शोध घेण्यात रस असणारी ही मंडळी एका वेगळ्याच मोहिमेचा भाग बनतात किंबहुना त्यांच्याकडूनच नकळत मोहिम सुरु झालेली असते खजिन्याचा शोध घेण्याची! ताम्रपट तर सापडला पण त्याचं वाचन कसं करायचं हे त्यांना माहिती नसतं. 
ब-याच प्रयत्नांती ताम्रपटावरील श्लोकांचा उलगडा त्यांना होतो अन् कळतं की हा ताम्रपट चाणक्याचा काळातील आहे.

 मात्र त्यात द्वारकाधीश, उध्दवनारायण संप्रदाय, खजिना, विश्वस्त व योग्य वारसदाराची निवड आदि उल्लेख आहेत. निर्मोही, सत्पात्र साधक व्यक्तीला द्वारकेची संपत्ती लोककल्याणार्थ मिळेल अन् अन् चाणक्य हेही सांगतोय की या वैभवाचा एक अंश जनकल्याणासाठी वापरायला मिळाल्याबद्दल विष्णुगुप्त त्या जनार्दनाला प्रणाम करत आहे.
जेएफके टीम हे वाचून थक्क होते. अन् सुरु होते द्वारकेच्या खजिन्याची शोधमोहिम!
मुंबई, गुजरात, खंबायतचं आखात, युरोप, ओमान अशा विविध देशात पुढे कोणत्या थरारक घटना घडत रहातात हे वाचायलाच हवं. 

उध्दवनारायण संप्रदायातील एक भाग असा अवधूत संप्रदायाचा गट मुख्य विचारधारेशी फारकत घेऊन असतो. त्यांचाही खजिन्यावर डोळा असतो. तर खंबायतच्या आखातातील तेलसाठ्यांचा शोध घेत त्यावर मालकी हक्क प्रस्थापित करण्यात एका विदेशी कंपनीला रस असतो. जेएफके टीमचा या सर्वांशी पंगा पडत रहातो. या सर्वांतून त्यांची खजिना शोधमोहिम सुरु असते. देशातील 'वाघा' सारखा धडाडीचा नेता, एका प्रचंड मोठ्या संघटनेचे सदस्य/ पदाधिकारी अशा सर्वांसोबत जेएफके टीम भेटत/ भिडत राहते. या शोधमोहिमेत त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो अन् त्यांच्या मदतीसाठीही काही हात पुढे येतात. 

द्वारकेचा तो खजिना त्यांना सापडतो का, त्यांना आपला जीव वाचवता येतो का, त्या खजिन्याचा सध्याचा वारसदार कोणाला ठरवलं जातं या व अशा थक्क करणा-या रहस्यभेदासाठी ही कादंबरी तुम्ही वाचायलाच हवी.

सुमारे चार हजार वर्षांच्या इतिहासात कृष्ण असतोच, मग चाणक्य येतो, मग गझनीचा महमूद येतो मग विविध मोहिमा, इ.स. 2010 नंतरचं भारतातील बदलतं राजकारण, उध्दवनारायण संप्रदाय, देशातील एक मोठी संघटना असा विस्तृत पट उलगडून दाखवत असताना वसंत लिमये आपल्याला खिळवून ठेवतात. गिर्यारोहणात जसं प्रत्येक पावलात 'पुढे काय?' ही उत्सुकता वाटत रहाते तशीच उत्सुकता कादंबरीचं प्रत्येक पान उलटताना वाटत रहाते. आपण इतक्या वर्षांचा कालखंड कधी चालत रहातो हेच कळत नाही. 

परवाच मी लिहिलेलं की इंग्रजी साहित्यात जसा मोठा कॅनव्हास घेऊन कादंबरी रंगवली जाते तसं मराचीत क्वचितच पहायला मिळतं. वसंत लिमये उर्फ आमच्या बाळासाहेबांची ही कादंबरी अनेक थरारक इंग्रजी कादंब-यांच्या अगदी तोडीस तोड ठरली आहे यात शंकाच नाही. त्यातही वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे हा प्रचंड मोठा पट उलगडताना त्यांचं काळाचं भान सुटत नाही. कृष्णाचा कालखंड, चाणक्य, मेहमूद अन् सद्यस्थिती यातले सूक्ष्म भेद ते काळजीपूर्वक जपतात व कुठेही संदर्भांची- भाषेची सरमिसळ करत नाहीत हे लेखक म्हणून त्यांचं मोठं यश आहे असं मला वाटतं. 

कादंबरीची भाषाही सहज सोपी व आजच्या तरुणाईला सहज आवडेल अशीच. त्यामुळे हल्लीची पिढी वाचत नाही वगैरे जर कुणाला म्हणावंसं वाटत असेल ( मुळात हल्लीची पिढीही खूप वाचतेच अन् विविध साधांच्या आधारे वाचते  असं माझं मत आहेच) तर ही कादंबरी त्या व्यक्तीनं नक्की तरुण मुलामुलींना वाचायला द्यावी, त्यांना आवडेलच असे मला वाटते.

वसंत वसंत लिमये यांच्याशी मैत्र जुळलं म्हणून मी असं म्हणत नाही तर एक वाचक म्हणून हे असं उत्कंठावर्धक रसरशीत साहित्य अधिकाधिक  निर्माण व्हावं आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावं ज्यायोगे लोकांचं वाचनवेडही अधिकाधिक वाढत राहील असं मला वाटतं. जाताजाता एक गोष्ट मात्र नमूद कराविशी वाटते की थोडसं अधिक कठोर संपादन करुन जर कादंबरीची 50/ 60 पानं कमी करता आली तर कादंबरी अधिक क्रिस्प वाटेल व रहस्य उलगडलेलं वाचण्याची उत्कंठा अधिक तीव्र होईल असं मला वाटतं जे मी आधी बाळासाहेबांना बोललो आहेच.

सध्या बाळासाहेब नव्या काही कामात गुंतले आहेत व अशीच एक अजून भन्नाट कादंबरी लवकरच आपल्याला वाचायला मिळणार आहे ही आशा मोठी सुखद आहे.
- सुधांशु नाईक, कोल्हापूर( 9833299791)🌿

2 comments:

  1. खूप छान परिचय.मी हे पुस्तक थोड्या दिवसांपूर्वी वाचलेले आहे.त्यातील मुंबईच्या फोर्ट भागात असलेल्या इमारतींमधे जे वर्णन आहे,ते खूप भावले.कारण बॅंक त्याच भागात असल्यामुळे तिथे बरीच वर्षे वावर होता.👌👌

    ReplyDelete
  2. विश्वस्तचा परिचय आवडला.मी हे पुस्तक एकदोन वर्षांपूर्वी वाचले आहे.यात मुंबईच्या फोर्ट भागातील जे वर्णन आहे,ते विशेष आवडले.आमची बॅंक त्याच परिसरात असल्यामुळे तो परिसर ओळखीचा आहे.

    ReplyDelete