पुस्तक परिचय या उपक्रमांतर्गत ज्या पुस्तकाविषयी आवर्जून लिहावंसं वाटतंय ते पुढचं पुस्तक आहे युध्द जीवांचे.
" माणसाच्या प्रगतीचा इतिहास हा माणसं मारायच्या नवनवीन साधनांच्या प्रगतीचा इतिहास आहे" अशा परखड ओळीनं यातलं दुसरं प्रकरण सुरु होतं. कडवट अशा सत्याची पानोपानी प्रचिती देणारं हे पुस्तक. सध्या कोरोना विषाणूच्या हाहाकारानं आपण सगळेच विविध प्रकारे त्रस्त झालो आहोत. हे चायनानं निर्माण केलेलं बायो वाॅर असंही काहीजण म्हणतायत. मात्र गेली जवळपास 100 वर्षे सर्व बलशाली देशांकडून जगभर विषाणू/ जीवाणू निर्माण करुन बायो वाॅर खेळलं जात आहे, दुर्दैवानं ते आपल्याला ठाऊक नाही. या भयानक जीवघेण्या प्रक्रिया अन् त्याचे भीषण परिणाम मांडणारं पुस्तक आहे हे.
पुस्तक : युध्द जीवांचे
लेखक : गिरीश कुबेर
प्रकाशन : राजहंस
मूल्य : 275 रु. फक्त.
जागतिक राजकारण अन् अर्थकारण याबाबत ब-याचदा आपण मराठी वाचक काहीप्रमाणात अनभिज्ञ असतो कारण त्याबाबतची अनेक विदेशी पुस्तके, अनेक परदेशी वृत्तपत्रे, शोधपत्रकारिता याबाबत आपला तुलनेनं कमी अभ्यास असतो. त्यात हा देश आपला, तो परका वगैरे ठोकताळेही सर्वांचे असतातच. हे आपल्याच बाबतीत नव्हे तर अनेकांच्या बाबतीत जगभर घडतं. त्यामुळेच जागतिक इतिहासावर खळबळजनक असं काही वाचलं की ' डोळे उघडल्याची' भावना होते. जगभरच्या विविध पुस्तकांचा वगैरे जो संदर्भ गिरीश कुबेर यांनी पुस्तकाच्या शेवटी जोडला आहे ते पाहून अशा वाचनाची जशी त्यांना गोडी लागलीये तशीच सर्वसामान्याना गोडी लागावी असे वाटते.
जागतिक राजकारण अन् अर्थकारण हा गिरीश कुबेर यांचा हातखंडा विषय. त्यांचं परदेशी संदर्भग्रंथांचं वाचनही भरपूर आहे. त्यातून मिळत असलेल्या अनेक महत्वाच्या गोष्टी त्यांनी मराठी वाचकांना नेहमीच दिल्या आहेत. 'तेल नावाचा इतिहास", " एका तेलियाने", " अधर्मयुध्द" ही त्यांची या पुस्तकाच्या पूर्वीची पुस्तकंही सर्वांनी आवर्जून वाचावीत अशीच.
युध्द जीवांचे हे पुस्तक म्हणजे जागतिक राजकारणात, अर्थकारणात आपल्या फायद्यासाठी जी युध्दं घडवली गेली, अनेक विषाणू प्रयोगशाळेत कसे निर्माण केले, त्यांचा क्रूरपणे लोकांवर कसा वापर केला गेला त्याचाच विदारक इतिहास आहे.
आपल्याला हिटलरने केलेला ज्यूंचा नरसंहार माहिती असतो मात्र ब्रिटनने केलेला, जपाननं चीनमध्ये केलेला, अमेरिकेनं व्हिएतनाम वगैरे देशात केलेला, आखाती देशातील क्रूर बादशहांनी केलेला अघोरी नरसंहार ठाऊकच नसतो. या नरसंहाराला जैविक वा रासायनिक अस्त्रांची जोड दिली गेली त्यामुळे त्याची भयानकता अधिक वाढली आहे.
कुबेर एका ठिकाणी म्हणतात , " जपानचा विषय निघाला की दोन प्रतिक्रिया हमखास येतात एक म्हणजे किती सोसलंय या देशानं अन् दुसरं म्हणजे इतकं होऊनही तो देश कसा फिनिक्स पक्षा सारखा उभा राहिलाय वगैरे. मात्र गेल्या शतकात जपाननं जे उद्योग केलेत ते सहृदयी सोडाच पण कोणताच साधाहृदयी माणूसही करु शकणार नाही. माणसाच्या क्रौर्याला मर्यादा असतात या विधानाच व्यत्यास म्हणजे जपान...!"
काय केलं होतं जपाननं ते बारकाईनं या पुस्तकात वाचायला मिळतंच. फक्त एक उल्लेख सांगतो.
चीनमधल्या एका प्रांतात युनिट 731 ची स्थापना झाली. जपानच्या ताब्यातील चिनी कैद्यांवर इथं प्रयोग केले जात. पटकी, काॅलरा, टायफाॅईड, प्लेग असे विविध रोगांचे विषाणू त्यांच्या शरीरात सोडले जात व हे विषाणू नक्की आत काय करतात हे पहाण्यासाठी जिवंतपणीच कैद्यांची शरीर फाडली जात. जवळपास 300 किलो प्लेग, 900 कि टायफाॅईड अशा प्रकारे हजारो किलोंची औषधं बाॅम्बमध्ये भरुन जपाननं तयार केली. मग काही चिनी गावांवर विमानातून बाॅम्बफेक व्हायची. लोकांना दिसायचं तर काही नाही पण काही दिवसानंतर कुत्री, कोंबड्या, गुरं व माणसं विशिष्ट साथीच्या रोगानं मरायची. हिटलरनं ज्यूंचा जो विनाश केला त्याच्या कितीतरी पट अधिक विनाश जपाननं घडवला. हे इतकं भयानक होतं की हिटलरसुध्दा दयाळू वाटण्याची शक्यता आहे.
जपान प्रमाणेच वागलेत अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, चीन, रशिया अन् आखाती देश.
ब्रिटन हा देश नेहमीच मानवतावाद, सर्वोत्तम लोकशाहीवादी असल्याचे ढिंढोरे पिटत आलाय. ज्या चर्चिल यांचा युध्दकालीन नेतृत्वाबद्दल उदोउदो होतो त्या चर्चिल यांनीही जैविक अस्त्रांच्या वापराला अनुमती दिली होती. इतकंच नव्हे तर मध्यपूर्व किंवा आशियातील असंस्कृत अशा लोकांच्या विरोधात ही रसायनास्त्रं वापरायला माझा पूर्ण पाठिंबा आहे असं त्यांनी 1920 मध्ये एका लष्करी अधिका-याला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.
जगभरचं राजकारण अर्थकारण ज्यांच्या ताब्यात एकवटलंय त्या रशिया व अमेरिका या देशांमध्ये अधिकाधिक हानीकारक जैव/ रसायनास्त्र आपल्याकडे असावीत यासाठी प्रचंड चढाओढ निर्माण झाली होती. आजही आहे.
जेव्हा प्रचंड प्रमाणात निर्माण केल्या गेलेल्या रसायनास्त्रांवर टीका केली गेली तेव्हा मग काही प्रमाणात काही गोष्टी नष्ट केल्याचं दाखवण्यात आलं. म्हणजे काय तर चक्क समुद्रात टाकली गेली ही अस्त्रं. प्रचंड विनाशकारी प्रदूषण निर्माण करत. समुद्रात टाकला गेलेला कचरा म्हणजे 375 टन अश्रूधूर, 190 टन लेविसाईट, लाखभर फाॅस्जेन बाॅम्ब, 4 लाख पौंडापेक्षा जास्त किरणोत्सारी कचरा...इत्यादी. त्यातही ही फक्त अमेरिकेची यादी. 2006 मध्ये अमेरिकन संरक्षण खात्यानंच सांगितलं की हा कचरा साफ करायचा असेल तर किमान 3400 कोटी डाॅलर्स खर्च करावे लागतील... अर्थातच हे बजेट बजेटच राहिलं आहे. सूज्ञास अधिक सांगणे न लगे.
आजही घातक जैविक व रासायनिक अस्त्रं बनवण्याचं काम अनेक देशांतून जोरात सुरु आहे. आगामी युध्दं ही विषाणू व जीवाणूंच्या जोरावर लढली जातील असा बहुतेक सर्व संरक्षण तज्ज्ञ मंडळींना वाटते.
त्यामुळे विविध देशांत यावरील संशोधन व निर्मितीला वेग आला आहे.
आर्थिक फायद्याची गणितं घालून हे घातक तंत्रज्ञान आता जगभरच्या अनेक लहानमोठ्या आतंकी देशांच्या हाती पोचलं आहे.
यापुढचा काळ कसा असणार हे कोरोना साथीनं आपल्याला उमगलं आहेच. मात्र यातून सर्वांनी शहाणं होण्याची गरज आहे. जगभर वाढत असलेली स्वार्थी वृत्ती, सत्ताकांक्षा, हपापलेपण, लोभी वृत्ती पहाता पुढचे दिवस अधिकाधिक जैविक युध्दांचे असण्याचीच शक्यता. ते युध्द कसं असं शकतं यांचं रुप या पुस्तकातून नक्कीच विदारकपणे समोर येतं.
भविष्यात असं काही घडूच नये अन् माणसामाणसात द्वेषापेक्षा प्रेमाची भावना वाढावी, सर्वांनी माणूस म्हणून माणसाची व अवघ्या सृष्टीची काळजी घ्यावी या प्रार्थनेशिवाय आपल्या हाती मात्र काहीच उरत नाही.
- सुधांशु नाईक, कोल्हापूर ( 9833299791)🌿
No comments:
Post a Comment