marathi blog vishwa

Sunday 29 November 2020

लायबेरियातून #१ - ट्रॅफिक व बाजारहाट

नमस्कार मंडळी, 18 नोवेहेंबरला उत्तर पश्चिम आफ्रेकतील लायबेरिया या देशात दाखल झालोय. 1848 मध्ये स्वतंत्र राष्ट्र म्हणून लायबेरिया हा आफ्रिकेतील  पहिला लोकशाही व्यवस्था असलेला देश होता. 1944-45 मध्ये दुस-या महायुध्दात जर्मनीविरुध्द लढाईत मदत केल्यामुळे अमेरिकेनं बरीच मदत केलेली. मुळात इथले अनेक जण हे अमेरिकेतील गुलामीतून मुक्तता झाल्यानं इथं आणून रुजवले गेलेले.
जवळपास 100 वर्षं सगळं सुशेगाद असताना 1980 पासून सुमारे 10,15 वर्षं इथं मोठं यादवी युध्द होत राहिलं. त्यामुळे देश अत्यंत गरीबीत ढकलला गेला. 2005 नंतर हळूहळू पुन्हा सुधारणा होताहेत. 
" Light up Monrovia" हा आमचाही प्रोजेक्ट असाच. देशभरातील 25 टक्के लोकांना नियमित वीजपुरवठा होतो. बाकी सगळे जनरेटर वर अवलंबून. त्यामुळे नियमित वीजपुरवठा, वीजवितरण या क्षेत्रातील कामासाठी युरोपियन युनियन, वर्ल्ड बॅन्क यांच्या मदतीनं हा प्रोजेक्ट उभा होत आहे. त्यासाठी प्रत्यक्ष काम करायला आम्ही...! मुनरोविया या राजधानीच्या गावात हे काम सुरु आहे. तसेच आसपासच्या काही गावातही.
इथं रोजचं काम करताना सर्वात मोठा अडथळा वाटतो तो ट्रॅफिकचा. या टोकापासून त्या टोकापर्यंत एकच रस्ता. बाकी लहान लहान गल्ल्या. सकाळपासून रस्त्याच्या या किंवा त्या बाजूला ट्रॅफिक जाम झालेलं असतंच. माणसं तासनतास निवांत गाडीत बसून रहातात. उगीच कर्णकर्कश हाॅर्नबाजी न करता! 
हे पहा काही फोटोज् 
ट्रॅफिक जॅम झालं की लहानसहान छत्र्या उभारुन रस्त्याच्या कडेला काही न काही विकत उभे राहिलेले लोक मग डोक्यावर टोपल्या, हातात पिशव्या घेऊन गाड्यांभोवती हिंडत रहातात.
 कॅडबरी, पेप्सी, हेडफोन्स, फळं, बियरचे कॅन्स, केक, कुकीज्, पेन, स्टेशनरी असं काहीही सगळं आजूबाजूला दिसत रहातं.
इथं मोजकी शाॅपिंग सेंटर्स आहेत आपल्या डी मार्ट सारखी. दुबईत ज्या च्योईतराम यांची लहान स्टोअर्स आहेत, त्यांचं इथेही एक स्टोअर आहे. तिथं डाळ, तांदूळ, मसाले, हल्दीरामची प्राॅडक्ट्स वगैरे भारतीय काहीतरी मिळत राहतं. बाकी अन्यत्र सर्व लोकल वस्तू. 

मुळात लायबेरियात बहुसंख्य लोक रस्त्यावरच बाजारहाट करतात. आम्हालाही आमच्या मेस साठी भाजी आणायला एका लोकल मार्केटला जावं लागतं. एका रस्त्यावर आजूबाजूला लोक भाजी घेऊन बसलेले असतात. साधारण 200 ते 300 लायबेरियन डाॅलरला 1 पौंड भाजी मिळते. 

ही दृश्यं त्या भाजीवाल्या रस्त्यावरची..
वांगी, कोबी, ढबू मिरची, वालाच्या शेंगा, भेंडीची लहानशी अशी वेगळी जात, भोपळा, काकडी, दुधी भोपळा, पडवळ, टोमॅटो, मिरची इतक्या भाज्या मिळतात. कोथिंबीर व पुदिना फारच महाग आहे.
या मार्केटपर्यंत जायलाच जवळपास दीड तास जातो. इतकं ट्रॅफिक असतं. जर ट्रॅफिक नसेल तर 25 मिनिटं लागतात त्या विशिष्ट रस्त्यावर जायला. अन्यत्र लहान सहान दुकानातूनही भाज्या मिळतात. पण त्या इथल्यापेक्षा जवळपास दुप्पट महाग.

रस्त्यावरच्या ट्रॅफिकमध्ये जास्त करुन विविध प्रकारच्या कार्स आहेत. युरोप, अमेरिका, अरबी देशांतून 3,4 वर्षं वापरलेल्या/ स्क्रॅप केलेल्या कार्स मग विकल्या जातात. त्या कुठूनतरी इथं पोचतात. तुलनेनं खूप स्वस्तात विकल्या जातात. त्यामुळे टोयोटा, निसान, स्कोडा, किया मोटर्स, फाॅक्सवॅगन सारख्या मोठ्या कंपन्यांच्या मोठ्या गाड्या रस्त्यावर जीगा अडवून उभ्या असतात. त्याशिवाय जुनाट व्हॅन, पिकअप यांच्यातून शेयर बसच्या स्टाईलनं माणसं जातच असतात. इथं रिक्षाही आहेत बरं का..
इथल्या लोकांसाठी भारत सरकारनं टाटांच्या मदतीने जवळपास 50 बस लायबेरियाला दान केल्याहेत. त्यामुळेही लायबेरियात जी काही बस वाहतूक दिसते ती याच बसच्या माध्यमांतून.
गर्दी, ट्रॅफिक असलं तरी इथली माणसं अकांडतांडव करताना दिसत नाहीत. मिळेल तशी वाट काढत पुढे जायचे प्रयत्न करताना दिसतात. नाहीच वाट मिळाली तर शांतपणे गाडी बसून रहातात. पहातापहाता कुणीतरी एकजण ट
गाडीतल्या सीडीप्लेयरवर गाणी लावतो. मग पटापट माणसं खाली उतरतात. त्या गर्दीत पाच- दहा मिनिटं झकास नाचतात.. पुन्हा गाडी सुरु करुन पुढे जाऊ लागतात.
वन्यप्राणी जसे आजचा दिवस आनंदानं जगायचा, मिळेल ते खायचं, नाहीतर नुसतं निवांत बसून रहायचं असं वागतात ना... तस्संच वाटतं मला या मंडळींना पाहून.. गेल्या दिवसांचं दु:ख नाही अन् उद्याच्या चिंतेनं डोकं धरुन बसणं नाही. आजचा दिवस आपला, तो छान घालवूया ही यांची विचारसरणी पहायला छान वाटते. उत्तम समुद्रकिनारा आहे, आंबा, नारळ, फणस यांपासून विविध जंगली झाडं असलेला हिरवागार निसर्ग आहे अन् सोबतीला दारिद्र्यही! सगळं जणू एकमेकात पूर्ण मिसळून गेलंय. या लोकांना आवडणा-या रंगीबिरंगी कपड्यांसारखं!
- सुधांशु नाईक, मुक्काम मुनरोविया, लायबेरिया🌿
( nsudha19@gmail.com)

25 comments:

 1. सुधांशू जी तुम्ही खुप समसरसतेने आणि रसिकपणे आयुष्य जगता आहात.तुमचे लेख वाचून छान वाटत. तुमच्या लायबेरियातील कामाला शुभेच्छा आणि अजूनही या देशाबद्दल वाचायला नक्कीच आवडेल. - मोनल नाईक, वाचक-कट्टा मेंबर.

  ReplyDelete
  Replies
  1. छान वर्णन केलय सर तुम्ही।
   सुंदर लेखन आणि निरीक्षण।

   Delete
 2. सुंदर, इथल्या रहदारीचं आणि एकंदरीत माणसांच्या निवांतपणाचं कौतुक वाटलं. शेवटी एक गोष्ट खरी आहे...... कल किसने देखा है? त्यामुळे जे जगायचंय ते आजच जगून घ्या.
  पुढील भागांच्या प्रतिक्षेत

  ReplyDelete
  Replies
  1. खूप छान माहिती सर पण भाषा कोणती बोलली जाते

   Delete
 3. खूप सुरेख सर...लिखते रहा...

  ReplyDelete
 4. मस्त सुरवात. पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे.

  ReplyDelete
 5. Very interesting...Let more come ! By the way how large is the resident Indian population ?

  ReplyDelete
 6. भारतीय सगळे मिळून जास्तीत जास्त 2,3 हजार असावेत. मजूर पासून विविध गटातले. अजून नीट माहिती नाही मलाही.15 दिवस झालेत फक्त इथं येऊन.

  ReplyDelete
 7. Nice description with pics, as if we are there to visualize...

  ReplyDelete
 8. मस्त Sudhanshu
  Very positive thoughts
  Enjoy life

  ReplyDelete
 9. अपरिचित देशाची माहिती वाचताना छान वाटल . एवढे निवांतपणे जगणारे लोक मग यादवी कशी काय निर्माण झाली . एखादा लेख त्यावरही लिही .

  ReplyDelete
 10. सर खूप छान लिहल आहे,तुमच्या निमित्ताने सबेरिया मधील जीवन पद्धती कशी,माणसांची वागणूक कशी हे कळतय,अपरिचित देशातील लोकांची जीवनपद्धती कळत आहे,अजून वाचायला आवडेल आम्हाला
  आणि आपली सुद्धा काळजी घ्या..

  ReplyDelete
 11. मस्त लेखन... मजा आली

  ReplyDelete
 12. प्रमूख भाषा कोणती बोलली जाते?

  ReplyDelete