✍🏼
कोल्हापूरच्या कृष्णा दिवटे सरांनी पुस्तकप्रेमी समूहाच्या ' पुस्तक परिचय' या उपक्रमात सहभागी होऊन मी वाचलेल्या पुस्तकांविषयी रोज एक लेख लिहावा, एकेका पुस्तकाविषयी आठवडाभर मनोगत मांडावं असं सुचवलं. या उपक्रमात आजवर अनेक दिग्गजांनी आपल्या आवडत्या पुस्तकांविषयी लिहिल्याचे समजले. त्यांच्या तुलनेत वयानं, अनुभवानं, वाचनानं मी खूपच लहान माणूस आहे. तसंच आजवर या उपक्रमात कोणती पुस्तकं येऊन गेली हे ही मला माहिती नाही. मात्र पुस्तकं ही माझी सुहृद आहेत. लहानपणी तिस-या चौथ्या वर्षी प्रथम पुस्तक हाती आलं अन् अन् मी वाचत सुटलो. अगदी माझाही जणू सखाराम गटणे झालाय... तो आजवर तसाच आहे. पुस्तक हाती मिळालं की मी तहानभूक विसरुन जातो त्यामुळे पुस्तकांविषयी लिहिणं म्हणजे जिवलगाविषयी लिहिणं. किती न् काय लिहू असंच होऊन जातं मला...
त्यामुळे या उपक्रमात आधी ज्यांनी सहभाग नोंदवला त्यांना सादर प्रणाम करुन, अधिक काही न बोलता मला आवडलेल्या पुस्तकांविषयी लिहिण्याची सुरुवात करतो. ही पुस्तकं तुम्ही वाचली असतीलच, नसल्याच तुम्हाला ही पुस्तकं वाचाविशी वाटू देत ही अपेक्षा.
आजचं पुस्तक आहे एका नदीवेड्या माणसाविषयीचं.
पुस्तकाचं नाव : नदीष्ट.
लेखक : मनोज बोरगांवकर
प्रकाशन : ग्रंथाली.
मूल्य : रु 200 फक्त.
नदीष्ट या पुस्तकाविषयी गेले वर्षभर सोशल मिडियात वाचत होतो. 2019 व 2020 या दोन वर्षात तब्बल तीन आवृत्त्या प्रकाशित झालेलं हे पुस्तक लवकरच वाचायची उत्सुकता होती अन् ते हाती आल्यावर लगोलग वाचून पूर्ण केलं.
नदीष्ट हे मुळात केवळ एक आत्मकथन किंवा कादंबरी किंवा ललितलेखन या प्रकारचं नाहीये किंबहुना हे असे सर्वच प्रकार यात थोडेफार समाविष्ट आहेत असं म्हणता येईल.
ही कहाणी आहे एका नदीसोबतच वसणा-या परिसंस्थेची. त्यात माणसं आहेत, प्राणी आहेत, आटत गेलेली किंवा पुरानं उफाणलेली नदी आहे. या पुस्तकात नायकाव्यतिरिक्त भेटणारी माणसंही वेगळी आहेत. त्यांचं त्यांच्या परीघातलं जे जगणं आहे ते फारसं पांढरपेशा समाजाला माहिती नसलेलं असं आहे. त्यांच्याही आयुष्यात नदीला काहीतरी स्थान असतं. ते कसं असतं हे या पुस्तकात पहायला मिळतं.
मुळात यातील नायकाप्रमाणे मीही एक नदीवेडा माणूस. चिपळूणला बालपणी आमच्या घरमालक अशा सुरेशकाकांनी नदीवर सोबत नेलं अन् तिथून माझ्यात नदीवेड भिनलं. भर उन्हात, भर पावसात नदीत तासनतास डुंबत बसलोय. चिपळूणच्या वाशिष्ठीसह अनेक नद्यांत मनसोक्त पोहलोय. मी काही पट्टीचा पोहणारा नव्हे. मात्र नदीत पोहत, उलटं पडून तरंगत आकाश निरखत रहायला मला आवडतं. नदीकाठ, माणसं, गाईगुरं, पक्षी पहात बसायला आवडतं. त्यामुळे लेखक मंगेश बोरगांवकर यांच्याशी मला माझी नाळ जुळल्यासारखी वाटली अन् एकहाती पुस्तक वाचून पूर्ण झालेलं.
मुळात पुस्तकाचा प्रथमपुरुषी नायक हा नदीवेडा आहे. त्याच्या भावजीवनात, रोजच्या जगण्यात नदीला फार वरचं स्थान आहे. रोजचं जेवणखाणं, नोकरी-व्यवसाय करणं, घरच्या जबाबदा-या हे जसं सगळं आपल्यासाठी अटळ, अपरिहार्य असतं तसंच नदीपासून दूर न रहाणं हे या नायकासाठी अपरिहार्य बनलेलं आहे.
गावात असणा-या नदीसोबत त्याचे भावबंध जुळलेत. पहाटेची नदी, दुपारची नदी, संध्याकाळची नदी, रात्रीची नदी कशी वेगवेगळी भासते याबाबत त्याचे खास अनुभव आहेत. प्रत्येक ऋतूत न चुकता नदीवरची त्याची फेरी शक्यतो कधी चुकत नाही. नदीचं विस्तीर्ण पात्र पोहून पैलतीर गाठण्यातला निरागस आनंद, त्यातला पौरुषार्थ नायकाला सदैव भुलावणारा आहे. यातील जी मजा आहे ती पट्टीच्या पोहणा-यालाच समजू शकते. पाण्याचे प्रवाह कसे बदलत असतात, पाण्याचं तपमान कसं बदलत असतं, कोणत्या तीरावर काय असतं अशा अनेक बारीक सारीक गोष्टी रोजच्या सरावानं माहीती होतात. त्याची सवय लागते. नदीसह त्या पर्यावरणाशी एक वेगळे बंध निर्माण होतात.
रोज नदीत पोहायला जाताना गर्दी टाळून जायचं म्हणून नायक वेगवेगळ्या युक्त्या करताना दिसतो. अन् मग जरा आडबाजूला जाता येता त्याला वेगळी माणसं दिसू लागतात.
एखादी सकिनाबी, सगुणासारखा एखादा हिजडा, स्वत:च्याच चुकीपायी परिस्थितीनं प्रचंड पोळलेला भिकारी बनलेला भिकाजी, घाटावर गुरं चरायला नेणारा, मासे पकडणारा अशा लोकांशी नायकाचं काही वेगळंच मैत्र निर्माण होत रहातं.
त्यातही समाजातील या जवळपास सर्वात खालच्या थरातील व्यक्तींसोबत वावरताना त्याला पांढरपेशा भिडस्तपणाचं ओझं जे जाणवत रहातं ते आपल्यालाही अस्वस्थ करतं. ' लोक काय म्हणतील?' ही जाणीव जशी लाखो लोकांना त्रास देते तशीच नायकालाही...!
या सगळ्यातून नदी वहात राहते. नायकाचं जीवन वहात रहाते. ज्यांना आयुष्यानं पदरी प्रचंड दु:ख दिलं ती माणसं ज्या धीरानं ते दु:ख उचलत जगत राहतात ते पाहताना विलक्षण रितं वाटत रहातं.
एखाद्या नदीच्या पात्रात पोहण्याची मलाही फार आवड. पाणी त्यातही नदी वा तलावाचं, मलाही अतिशय प्रिय. त्या पाण्यात निवांत पाठीवर पडून तरंगत राहताना, वर दिसणारं निळंनिळं आभाळ, ढगांचे पुंजके पहाताना मनातले तरंग शांत शांत होत जातात. मला त्या तरंगण्याची नेहमीच ओढ लागलेली असते. कितीही विचार मनात असले तरी पाण्यात उतरल्यावर खूप शांत वाटतं. वाहणारी ती नदी ज्या मायेनं कवेत घेते ती अनुभूती शब्दातीत असते. त्यामुळे लेखकाच्या अनुभवांशी माझी नाळ जुळत रहाते.
आज खूप वेगळ्या प्रकारचं अन् सशक्त लेखन विविध माध्यमातून होत आहे. हे पुस्तक त्याचं उत्तम उदाहरण आहे. ज्यांना नदीविषयी आत्मीयता आहे त्यांनी अवश्य वाचायला हवं असं मला वाटतं.
- सुधांशु नाईक, कोल्हापूर🌿
No comments:
Post a Comment