marathi blog vishwa

Sunday, 15 November 2020

पुस्तक परिचय # द फाॅक्स :- फ्रेडरिक फोर्सिथ

नमस्कार. पुस्तकपरिचय या सिरीजमध्ये आज एका प्रख्यात विदेशी लेखकाच्या उत्कंठावर्धक कादंबरीचा परिचय करुन द्यावासा वाटत आहे. ही कादंबरी आहे,
 द फाॅक्स. त्याविषयी आजचा हा लेख.
- सुधांशु नाईक

विदेशी साहित्य ही खरंच एक प्रचंड मोठी अशी जादूची गुहा आहे. मी मुख्यत: फिक्शन मध्ये रमणारा साधा माणूस आहे. उगीच जड, गूढ, वैचारिक असलं काही वाचायचं मला जमत नाही. 'सेल्फ हेल्प'टाईप पुस्तकंही तुलनेनं कमीच वाचतो. फिक्शन या सेक्शनंध्ये जे दादा लेखक आहेत त्यात आर्थर हिली, सिडने शेल्डन, आयर्विन वॅलेस, राॅबिन कुक, राॅबर्ट लुडलोम, जेफ्री आर्चर, डॅन ब्राऊन आदि सर्व आवडत्या लेखकांसोबत अजून एक लेखक मला आवडतो तो म्हणजे फ्रेडरिक फोर्सिथ. या सर्वांचं लेखन भले फिक्शन असलं तरी वास्तवाच्या इतकं हातात हात घालून जातं की काय खरं व काय खोटं हेच समजत नाही. हीच तर लेखकाची ताकद. त्यातही अनेक लहानलहान तपशील नोंदवत, त्यांचा आधार घेत या मंडळींचं लेखन असं काही फुलत जातं की हातातलं पुस्तक ठेवूच नये असं अनेकदा वाटतं.
फ्रेडरिक फोर्सिथ हा एक फार दादा लेखक आहे. त्यांच्या प्रत्येक शब्दाचं वजन, कोणता शब्द कुठे, कसा व कधी वापरायचा याचं भान भलतंच सुरेख. ब्रिटनच्या एअरफोर्समध्ये पायलट म्हणून काम केलेला, गुप्तहेर म्हणून ब्रिटनसाठी काम केलेला, जगभर भ्रमंती केलेला, राजकीय, शासकीय, गुप्तवार्ता विभाग, युध्दभूमी इ.. इ.. असंख्य गोष्टींचा अभ्यास केलेला हा लेखक जेव्हा काहीतरी समोर देतो तेव्हा ते फार सर्वंकष अनुभव देणारं असतं असं माझं वैयक्तिक मत आहे.

द फाॅक्स ही त्यांची वयाच्या 80 व्या वर्षात लिहिलेली ताजी कादंबरी.  2018 मध्ये आलेली. त्यांच्या गाजलेल्या द डे आॅफ द जॅकल, ओडिसी फाईल्स, अफगाण, अॅव्हेंजर, फिस्ट आॅफ गाॅड आदि कादंब-यांइतकी मला सशक्त वाटली नाही तरीही आजच्या काळातील नवोदित लेखकांपेक्षा कितीतरी पट सुरेख आहे. मुळात द फाॅक्स चा विषय हा आजचा आहे व या लेखकानं अभ्यासाअंती जो थरार निर्माण केलाय तो अनुभवणं फार रोमांचकारी आहे.

मित्रहो, आपण सध्याचं युग हे डिजीटल युग आहे असं मानतो. पण म्हणजे काय हे आपल्याला तसं वरवरच माहिती.
फेसबुक, व्हाटसअप, इंन्स्टा, गुगल, इमेल चा वापर, तसंच काही प्रमाणात आॅनलाईन आर्थिक व्यवहार म्हणजे डिजीटल युग असाच आपला समज. मात्र असं नाहीये. तर आपल्या सर्व आॅनलाईन व्यवहारांवर कुठूनतरी कुणीतरी लक्ष ठेवणे, आपला सगळा डेटा आपल्या नकळत जमवणे/ पहाणे/ वापरणे हेच मुख्यत: या डिजिटल युगाचं काम. आपल्याला अनेकदा वाटतं की फेसबुक/ व्हाटसअप/ इन्स्टा आदि सर्व फुकट आहे. पण तसं नसतं.
 त्याची पुरेपूर किंमत आपल्या नकळत वसूल केली जाते. 
मी ही पोस्ट किंवा अन्य काही फेसबुकवर प्रकाशित करताना, किंवा ते प्रसिध्द झाल्याझाल्या माझे डिटेल्स कुठेतरी अज्ञात ठिकाणी कुणीतरी चेक करेल व ते कुणाच्या उपयोगाचे आहेत का याची जुळणी करुन बिनबोभाट नकळत ही माहिती त्यांच्यापर्यंत पोचवेल..कधी पैसे घेऊन तर कधी तसंच.
मग पुस्तक विक्रेत्यांच्या जाहिराती मला दिसू लागतील वगैरे वगैरे. किंवा मी धोकादायक वाटलो तर माझ्यावर पाळत ठेवली जाईल किंवा प्रसंगी संपवलं जाईल. हे सगळं घडणं शक्य आहे...

हे झालं वैयक्तिक बाबतीत. मात्र हेच जेव्हा जागतिक पातळीवर राजकीय- आर्थिक- सत्तांकाक्षा याबाबत घडतं तेव्हा त्याला वेगळंच गांभीर्य येतं.
तोच आहे या कादंबरीचा विषय.

तर वळूया या कादंबरीकडे..

अमेरिकेत ते 9/11 घडतं व तिथून सुरु होतो हा नेटसॅव्ही प्रवास. त्यानंतर अमेरिकन संगणकीय व्यवस्थेत बरेच बदल घडले.. ब-याच नव्या सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाल्या. मात्र तरीही कुणीतरी शिरुन हेरगिरी केली. तसा निरोपच दिला चक्क संरक्षण खात्याला की तुमचा सर्व डेटा मी हॅक केलाय मात्र त्याचा दुरुपयोग करणार नाही. तुमची सिस्टीम फुलप्रूफ आहे असं समजू नका हे सांगण्यासाठीच हॅक केलंय. तो मेसेज मिळताच प्रचंड गदारोळ उडाला...! 
शोध घेतला गेलाच लगेच. स्पेशल कमांडो फोर्स, गुप्तहेर वगैरे मग त्या व्यक्तीचा खातमा करायला पोचले ब्रिटनमध्ये एका गावात.. एका घरात... त्या काॅम्प्युटरजवळ जिथून सिस्टिम हॅक केलेली. तो काॅम्प्युटरवाला हाता एक ब्रिटिश. त्यातही तो होता केवळ 18 वर्षाचा मुलगा अन् आॅटिस्टिक..!

थक्क होऊन सारे पहात रहातात. त्यांचा विश्वासच बसत नाही की, ज्याला चार पावलं धड चालताही येत नाही तो हे कसं काय करु शकतो?? त्यानंही माहिती चोरुन विकलेली नसते तर फक्त " तुमची सिस्टिम फुलप्रूफ नाही.." हा निरोप द्यायला हॅकिंग केलेलं असतं. हे तो परत सांगतोही..

मग चक्र फिरु लागतात. आणि त्याच मुलाचा वापर करायची योजना तयार होते. तो मुलगा मग शत्रू न बनता ब्रिटन- अमेरिकेचा मित्र बनतो.  रशिया, इराण, चीन, उ. कोरिया इ. देशात घडणा-या गुप्त व अणुबाॅम्ब वगैरे विषयक कामांची माहिती गोळा करायला हे नवं हत्यार या देशांना मिळतं. 
 आणि मग संगणकीय माध्यमातून त्या देशात सुरु असणा-या घातक संशोधनाला उध्वस्त करण्याची मोहीम राबवली जाते. हा सारा थरार मुळातून वाचण्याजोगा आहे. या प्रत्येक देशातले लहानसहान तपशील मांडत फोर्सिथ आपल्याला गुंगवून ठेवतो.
त्या राष्ट्रांनाही कळतं की यांच्याकडे काहीतरी आहे. मग तेही शोधमोहिम सुरु करतात.
त्यांच्या फुलप्रूफ सिस्टिममध्ये केवळ हाच एक मुलगा घुसु शकत असतो हे कळल्यावर ही राष्ट्रे त्याला संपवायचे प्रयत्न करतात. त्याच्यावरील हल्ल्याचे प्रत्येक प्रयत्न असफल ठरतात कारण त्याच्या संरक्षणाला सिध्द असलेला एक 70 वर्षीय ब्रिटीश अधिकारी.  डोळ्यात तेल घालून त्याच्या पाठीशी उभा राहिलेला हा ब्रिटिश अधिकारी कसा या सा-याला तोंड देतो ते मुळात वाचायलाच हवं! 18 वर्षाचा आॅटिस्टिक मुलगा व हा अधिकारी यांच्यात म्हटलं तर फारसा संवादही होऊ शकत नाही पण तरीही ते कसे बचाव करायचा प्रयत्न करतात, शेवटी हा मुलगा वाचतो की मरतो हे सगळं वाचताना आपण थक्क होत रहातो.

ब्रिटन, अमेरिका, इस्त्रायल, रशिया, इराण, उ कोरिया आदि विविध ठिकाणी काहीतरी घडत रहातं अन् फोर्सिथ ते प्रचंड परिणामकारकतेने थंडपणे मांडत रहातो..बॅन्केचे व्यवहार, त्या उच्चस्थानावरील मंडळींचं स्वार्थीपण आदि सगळं वाचताना हातातून कादंबरी ठेववत नाही.. पानापानामागून पानं उलटत रहातात. कादंबरी संपल्यावर इतकंच कळतं... आपल्या हाती काहीच उरलं नाहीये. आपण सगळेच फक्त वापरले जात आहोत..केवळ कुण्याच्यातरी फायद्यासाठी...! 

यापुढील युध्दं, हेरगिरी, हल्ले- प्रतिहल्ले हे सारं असंच घडत रहाणार आहे फक्त वेगळ्या माध्यमातून. ही माध्यमं संगणकीय असतील किंवा अन्य काही. अन् ज्याची या सा-यासाठी सिध्दता आहे तोच पुरुन उरेल. बळी तो कान पिळी ही म्हण पुन्हा पुन्हा सार्थ ठरणार आहे! आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संज्ञा परवलीचा शब्द ठरु लागलीये. ज्याच्याकडे हे तंत्रज्ञान आहे व इतरांवर मात करायची ताकद आहे तो सर्वांना खेळवत रहाणार आहे हे नक्की.

कादंबरीचा शेवटही जरा अकल्पित... पण कादंबरी संपल्यावर एक वेगळा धक्कादायक अनुभव नेहमीप्रमाणे फोर्सिथ देऊन जातो. जो कित्येक दिवस मनावर रेंगाळत रहातो. 
या अशा कादंब-या, त्यांचा तो विस्तृत पट, शेकडो माणसं, वेगवेगळे देश हे सारं हे लेखक ज्या समर्थपणे मांडतात ते पाहून आपल्या मराठीतही असं काही साहित्य अधिकाधिक प्रमाणात  निर्माण व्हावं असं वाटतं.

- सुधांशु नाईक ( 9833299791)
कोल्हापूर. 🌿

1 comment:

  1. जबरदस्त लिहिलंय . तुमची लेखनशैली खूप आवडली.

    ReplyDelete