marathi blog vishwa

Saturday 23 September 2023

गणेशोत्सव आणि आरतीच्या आठवणी...!

#सुधा_म्हणे: गणेशोत्सव आणि आरतीच्या आठवणी...

22 सप्टेंबर 23

गणेशोत्सव सुरू झाला की महाराष्ट्रात आणि देशात अनेक ठिकाणी घरोघरी आनंदाला उधाण तर येते. तरीही या सगळ्यांपेक्षा कोकणात मात्र जरा वेगळे आणि अधिक उत्साही वातावरण असते. तसेही होळी आणि गणपती या दोन सणांसाठी कोंकणी माणूस कुठेही असला तरी शक्यतो घरी धाव घेत असतो. तसं पाहिलं तर प्रत्येक गावातील प्रथा, परंपरा या वेगळ्या असतात. त्या त्या प्रथेप्रमाणे सर्व सण उत्साहानेच साजरे होतात. मात्र या दोन्ही सणांच्या वेळचा उत्साह काही औरच. आमच्या गावी महाशिवरात्र, गोकुळाष्टमी, होळी आणि गणपतीचे दिवस ज्या पद्धतीने साजरे होतात ते कायमच स्मरणात राहणारे आहे.

गणपतीला घरी जाण्याचे वेध सर्व कोंकणी लोकांना खूप आधीपासून लागतात. बस, ट्रेन आदिची आरक्षणे करून कोंकणी माणूस गणेश प्रतिष्ठापना करायच्या आदल्या दिवसापर्यंत पोचायचा अट्टाहास करतोच. आरास पूर्ण होते. घराला प्रसंगी रंगरंगोटी होते. घरा-घरात मोदकांची तयारी सुरू होते. एकदा गणेशाची प्रतिष्ठापना झाली की सगळ्याना वेध लागतात आरतीचे.

आमच्या लहानपणी आम्ही चिपळूणला बुरूमतळीवर केतकरकाकांच्या घरी राहत होतो. तिथे परिसरात संध्याकाळच्या आरतीला सगळ्यानी एकत्र जमायचा रिवाज. आपापल्या घरातील आरती लवकर उरकून कुणा एका घरी मग मोठी आरती असे. त्याचाही क्रम लावला जाई. ज्याच्या घरी शेवटची मोठी आरती तिथे महाप्रसाद असे नियोजन. आरती नंतर महाप्रसाद म्हणून कोणता खाऊ बनवायचा त्याची तयारी सर्व घरातील महिला वर्ग मिळून ठरवत असे, प्रसंगी एकमेकाना मदत करत असे. पुढे आमचे घर झाल्यावर त्या भागातदेखील आम्ही हा रिवाज न चुकता पाळत होतो.

आपापल्या घरातील आरती आवरून सगळे वेळेवर या मोठ्या आरतीला एकत्र येत. निरांजन लावून, उदबत्ती लावून एका संथ लयीतसुखकर्ता दुखहर्ता..” सुरू होत असे. ही गणपतीची आरती असो की त्या नंतर पाठोपाठ येणारीलवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा..” ही शंकराची आरती असो, त्यातील नादमधुर शब्द हळूहळू आपल्या मनातील अन्य विचार दूर करून टाकायचे. ही किमया होती समर्थ रामदासांच्या शब्दांची

कर्पूरगौरा भोळा..” असो की “..शंकर शोभे उमावेल्हाळा..” असो.. किंवाव्याघ्रांबर फणिवरधर सुंदर..” यासारख्या ओळी असोत, त्या शब्दांची किमया मनावर छान परिणाम करून जाई.पण त्याला जी पारंपरिक चाल आहे तीही फार सुरेल असल्याने आपले शरीर त्या सूर लयीशी एकरूप होत जाई. शब्द सुरांच्या आणि हातातील वाजणाऱ्या टाळांच्या साथीने मग हळूहळू आरत्या रंगू लागत. देवीची आरती, दत्ताची आरती झाली की मग त्या त्या दिवशी जो वार आहे त्या अनुषंगाने अन्य आरती घेतली जाई. शनिवार असेल तर मारुतीची आरती म्हणताना त्यातले जोशपूर्ण शब्द एक वेगळाच रंग भरायचे.

मध्येच मगआरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म..” ही किंवायेई ओ विठ्ठले माझे माऊली ये..” ही आरती सुरू होई. त्याची विशिष्ट लय, शेवटच्या ओळीतले ते दीर्घ लांबवलेले सूर हे सगळं सगळं फार मनमोहक आहे. उंच स्वरात दमसास टिकवण्याची जणू अदृश्य स्पर्धा असे.

 “गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला..” हे म्हणताना जणू तो विठ्ठल समोर आल्याचा भास होई. त्यानंतर मग शांत आवाजातआरती ज्ञानराजा..” असे म्हणत ज्ञानोबांची आरती म्हटली जाई. अलगद डोळे कधी भरून येत ते कळतच नसे. तासभर विविध आरत्या रंगवून झाल्या की मगधूप दीप झाल्या आता कर्पूरआरती..” म्हणत कापूर / धूप लावला जाई

ज्ञान कळेना, ध्यान कळेना.. मजला ना कळे काही.. शब्दरूपी गुंफूनी माला, वाहतो पायी..” असे म्हणतान आपले क्षुद्रत्व जाणवत राही. त्यानंतर घालीन लोटांगण वंदीन चरण आणि मग मंत्रपुष्पांजलीचा गजर सुरू होई. “आवाहनं न जानामि न जानामि विसर्जनम्... पूजां चैव न जानामि क्षमस्व परमेश्वर..” असे म्हणून समारोप करताना गळा दाटून येई

तास दीड तास रंगलेला हा आरती सोहळा संपला की महाप्रसाद. विविध स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेत इकडच्या तिकडच्या गप्पा रंगत आणि मंडळी उद्या पुन्हा भेटूया असे सांगून निरोप घेत.

गणपती विसर्जनासाठी देखील छान छोटी मिरवणूक काढली जाई. लेझिम आणि झांज वाजताना त्या तालावर “पायी हळूहळू चाला.. मुखाने गजानन बोला..” अशी भजने रंगत. विसर्जन करण्यापूर्वी पुन्हा आरती होई. या आरतीला मात्र गणेशाच्या वियोगाची किनार असे. आता पुन्हा पुढल्या वर्षापर्यंत वाट पाहत राहायची या विचाराने त्यावेळी मात्र लहान थोर सगळ्यांचे डोळे भरून येत. गणपती उत्सव संपल्यावर देखील कित्येक दिवस संध्याकाळ झाली की पुन्हा एकदा धूप, दीप, कापूर लावून छान मन भरून आरती करावी असे वाटत राही.

रंगलेल्या आरत्यांनी अनेक वर्ष अपार सुख दिले आहे. काही सुखे अशी असतात की कितीही लाभली तरी त्यांची ओढ कमी न होता वाढतच राहते. हे त्यातलेच एक सुख. सतत हवेहवेसे वाटणारे..!

-सुधांशु नाईक(9833299791)




No comments:

Post a Comment