marathi blog vishwa

Thursday 7 September 2023

अगा करुणा करा...

 #सुधा_म्हणे: अगा करुणा करा...

07  सप्टेंबर 23

13 व्या शतकापासून वारकरी पंथात अनेक संत सज्जन मंडळी सामील होत गेली. मात्र ज्ञानोबा गेल्यानंतर ज्ञानेश्वरी मध्ये अनेक पाठभेद निर्माण झाले होते. कित्येक नवीन ओव्या त्यात समाविष्ट झाल्या होत्या. संत एकनाथ यांनी बारकाईने अभ्यासून त्या वेगळ्या केल्या. 16 व्या शतकात संत एकनाथांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. इतकेच नव्हे तर वारकरी संप्रदायला पुन्हा नव्या जोमाने कार्यरत होण्यास मदत केली. आणि त्यांच्या नंतर मग वारकरी संप्रदाय पुन्हा झळाळत राहिला तो संत तुकारामांच्या अभंगामुळे.

तुकोबांचे जीवन, त्यांना आलेली विरक्ती आणि त्यांचे अभंग यावर उदंड लिहून झाले आहे. संसारातून बाहेर पडलेले, आपल्या जिवलग विठ्ठलाला भेटण्यासाठी व्याकुळलेले तुकोबा हे काळजाला भिडणारे फार देखणे असे चित्र आहे. त्यांना ज्याच्या दर्शनाची तीव्र ओढ लागली आहे तो विठोबा देखील काही साधा नाही. तो सतत परीक्षा पाहतो आहे. आणि एकेक दिवस त्याच्या दर्शनासाठी या भक्ताचा जीव कासावीस होऊन गेला आहे. 

द्वैताकडून अद्वैताकडे जाणाऱ्या या प्रवासाची जेंव्हा ओढ लागते तेंव्हा मग एकटे राहणे अवघड होऊन जाते. घर-दार, तहान भूक विसरून तुकोबा त्या विठूभजनी असे काही रंगून गेले की त्यांना तो विरह अगदी असह्य होऊन गेला. त्यांची विरहव्यथा शब्दा-शब्दातून ठिबकू लागली...

अगा करुणाकरा, करीतसे धावा करुणाकरा

या मज सोडवा लवकरी, करुणाकरा..

ऐकोनियां माझी करुणेची वचने

व्हावे नारायणे उतावीळ..

मागे पुढे अवघा दिसे रिता ठाव

ठेवूनि पायी भाव वाट पाहे....

तुका म्हणे आता करी कृपा दान

पाऊले समान डावी डोळा..

त्या समचरण विठ्ठलाच्या दर्शनासाठी, ते तर व्याकुळले आहेत मात्र हे कासावीस होणे, त्याच्या दर्शनासाठी अधीर होऊन जाणे, या संसाराच्या मोहापेक्षा त्याच्यात एकरूप होऊन जायला तळमळत राहणे फार कारुण्यमनोहर आहे.

“मी तर तुझ्यासाठी उतावीळ झालो आहे पण विठ्ठला, आता तू देखील अधिक अंत न पाहता मला दर्शन देण्यासाठी, मला गळामिठीत घेण्यासाठी तूच उतावीळपणे धावत यावे..” असे ते जेव्हा म्हणतात तेंव्हा ती निर्मळ आतुर ओढ आपल्याला वेढून टाकते. आपल्याही अंतरंगात खोलवर उतरत राहते. लतादीदीच्या शांत तरीही सुईच्या अग्रासारख्या टोकदार अचूक स्वरांमधून ही करुणा मग आपल्याला देखील विद्ध करत राहते. यापुढे काहीही बोलावेसे वाटतच नाही..!

-सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)




No comments:

Post a Comment