marathi blog vishwa

Wednesday 13 September 2023

पावलो पंढरी वैकुंठ भुवन...

 #सुधा_म्हणे: पावलो पंढरी वैकुंठ भुवन...

13 सप्टेंबर 23

लोक ईश्वरभक्ती कधी आणि का करतात याचे उत्तर अनेकदा सापडत नाही. कित्येकदा असे घडते की कोणती तरी भीती वाटते म्हणून किंवा त्यातून सोडवणूक व्हावी म्हणून लोक भक्ती करतात. कधी वाटते की संकटे येऊ नयेत म्हणून, किंवा संकट काळी देवाने आपल्या बाजूला उभे राहावे यासाठी गाऱ्हाणे घालत भक्ती करतात. आपल्याला सहन होणे अवघड होऊन जाते असे दुःखद प्रसंग, अडचणी सतत समोर आल्यावर लोक भक्ती करतात. हे सगळे काम्य भक्तीचे विविध प्रकार. 

मात्र काम्य भक्तीच्या पलीकडे नक्कीच काहीतरी असावे ज्याची माणसाला ओढ असते. त्या टप्प्यावर पोहोचल्यावर एखादी व्यक्ती जेंव्हा जीव ओतून प्रेमभावे भक्ती करते त्याची गोष्टच वेगळी असते. त्या आर्ततेला कोणत्याही शब्दात आपण व्यक्त करूच शकत नाही. जेंव्हा जगण्याची सर्व प्रयोजने खुजी वाटू लागतात, इथल्या सगळ्या सुख-दुःखापलीकडे, इथल्या अपेक्षा आणि लालसेच्या पलीकडे जाण्याची तीव्र भावना जेव्हा मनात मूळ धरते तेंव्हा हे घडते असे मला वाटते.

तुकोबा, ज्ञानोबा, चोखोबा, गोरोबा, जनाबाई आदि संताना त्यांच्या आयुष्यात सुरुवातीला फार काही सोसावे लागले मात्र त्यांच्या मनात कधीच समाजाप्रती कटुता उरली नाही. आलेली दुःखे हेच आपले प्राक्तन आहे असे समजून ते विठ्ठलचरणी लीन होत राहिले. त्यांच्या मनात सुखाची आस म्हणजे फक्त विठ्ठलाची ओढ भरून राहिली. त्यामुळे ती विठू माउली भेटल्यावर तुकोबांच्या हर्षोल्हासित चेहेऱ्यावर अपार तृप्ती विलसू लागली आणि ते मुक्त कंठाने म्हणू लागले,

 पावलो पंढरी वैकुंठभवन । धन्य आजि दिन सोनियाचा ॥१॥

पावलो पंढरी आनंदगजरें । वाजतील तुरें शंख भेरी ॥ध्रु.॥

पावलो पंढरी क्षेमआलिंगनीं । संत या सज्जनीं निवविलें ॥२॥

पावलो पंढरी पार नाहीं सुखा । भेटला हा सखा मायबाप ॥३॥

पावलो पंढरी येरझार खुंटली । माउली वोळली प्रेमपान्हा ॥४॥

पावलो पंढरी आपुलें माहेर । नाहीं संवसार तुका म्हणे ॥५॥

त्या पंढरीच्या रायाची भेट होणे यापेक्षा सोन्याचा दिवस तो कोणता ? त्याने गळामिठीत घेताच तनामनातील सारे ताप शांत झाले. कृष्ण भेटल्यानंतर मीरेला जे वाटले तीच तर ही भावना. पांडुरंगाच्या या भेटीमुळे “पुनरपि जननम्.. पुनरपि मरणं.. ची” ही शृंखला कायमची तुटली. सामान्य असा संसार आता उरला नाही. त्यांच्यासाठी सगळेच आता विठ्ठलस्वरूप झाले.

या फेऱ्यातून आता कायमची मुक्ती मिळाली.

 हे जे सुख आज लाभले आहे ते कोणत्या शब्दात सांगावे असे वाटत राहिले. तुकोबांच्या मनातील कल्लोळ शांत झाला. जगण्यातला दुःखाचा भार संपला. देव आणि भक्त यातील द्वैत संपून गेले. ते केवळ  जिवलग अशा त्या विठ्ठलाचे होऊन गेले..!

 -सुधांशु नाईक(nsudha19@gmail.com)


No comments:

Post a Comment