marathi blog vishwa

Tuesday 12 September 2023

जन विजन झाले आम्हा...

#सुधा_म्हणे: जन विजन झाले आम्हा...

12  सप्टेंबर 23

माणसाला जेव्हा अत्यंत हवी असणारी गोष्ट प्राप्त होते तेंव्हा त्याचे सगळे झगडेच जणू संपून जातात. आयुष्यात कायम सगळ्या गोष्टी मिळत नसतातच. मात्र सर्वाधिक गरजेचे असणारे जिव्हाळ्याचे नाते लाभते तेंव्हा बाकी जग जणू विस्मरणात जाते. विठूमाऊलीच्या सहवासाचे सुख लाभल्यावर तुकोबांच्या आयुष्याचेही असेच झाले. विठूमाऊलीसोबत घडणाऱ्या संवादात त्यांना दिवस रात्रीचेही भान उरले नाही. तहान –भूक- झोप सगळे काही मिळाले तरी उत्तम आणि नाही मिळाले तरी उत्तम अशा निर्मम भावाने ते जगू लागले.

विठूमाऊलीचे नित्य दर्शन हवे, सतत समोर राहून संवाद घडावा आणि तनमन विसरून सहज लाभणारे आत्मीय मीलन लाभावे इतकीच मागणी तुकोबा वारंवार करत राहिले. भंडारा- भामचंद्रचे डोंगर असोत, गावातील मंदिर असो, शांत नदीतीर असो किंवा स्वतःचे घर असो.. तुकोबा त्यांच्या तंद्रीत रममाण झालेले असायचे. हा अभंगच पहा ना;

जन विजन जालें आम्हां । विठ्ठलनामा प्रमाणें ॥१॥

पाहें तिकडे बापमाय । विठ्ठल आहे रखुमाई ॥ध्रु.॥

वन पट्टण एकभाव । अवघा ठाव सरता जाला ॥२॥

आठव नाहीं सुखदुःखा । नाचे तुका कौतुकें ॥३॥

भरपूर लोकांच्यात असतानादेखील त्यांना आसपासची गर्दी, गडबड गोंधळ काही जाणवेना. एखाद्या घोर  जंगलात जसे सगळे शांत – स्तब्ध असते तीच शांतता त्यांना ऐन गर्दीतदेखील लाभू लागली. “भर गर्दीत देखील माणूस एकटा असतो” असे म्हणतात. मात्र एकाकी असणे आणि एकटे असणे यात फार मोठा फरक आहे. तुकोबा एकाकी नव्हते. त्यांच्यासाठी अवघी दुनिया म्हणजे जणू प्राणप्रिय विठाई होऊन गेली. एकदा आपले मन त्या विठोबा रखुमाईच्या चरणी अर्पण केल्यावर त्यांच्यासाठी गाव असो की रानातील वास्तव्य सगळे एकसमान होऊन गेले. 
चराचरातील प्रत्येक गोष्टीत विठ्ठल दिसत राहिला. आपल्याला अनेकदा लोकांचे, जगाचे निरीक्षण करताना खूप दोष दिसतात. मात्र जेंव्हा आपण भक्ती अथवा प्रेम भावनेच्या अत्युच्च अवस्थेला पोचतो तेंव्हा आपल्याला अवघे विश्व सुंदर भासू लागते. माणसे असोत वा पशू पक्षी सगळे काही सुरेख सुंदर भासू लागते. आणि मग आसपास असलेला कोलाहल, स्वतःच्या संसारातील सुख दुःखे यातले काही म्हणता काहीही आठवत नाही. तुकोबांचे देखील असेच झाले. त्यांना इतर काहीही जाणवेना. आचार-विचारांवर केवळ विठू माऊलीची सावली भरून उरली. जन्म मृत्यू, श्रीमंती – गरीबी या सगळ्यापार गेल्यावर जे निर्मळ, निरामय सुख मिळते, जो आनंद मिळतो त्या आनंदात ते तन्मय होऊन गेले.
मनात फक्त त्या जिवलग विठूमाऊलीचे विचार आणि ओठावर त्यासाठी प्रेमभावे स्फुरलेले, अंतरंगातून आलेले उत्कट असे अभंग. नाचत गात गात तुकोबा विठाईच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन गेले..! सृष्टीतील पाने, फुले, पक्षी आदि प्रत्येक गोष्ट पाहताना त्यांना फक्त विठ्ठल आठवू लागला. दिसू लागला. आपल्या आराध्यदैवतासोबत असे एकजीव झालेल्या तुकोबांसारख्या अशा कुणालाही पाहणे हीसुद्धा किती प्रसन्न आणि सुखदायी गोष्ट आहे ना ?

-सुधांशु नाईक(nsudha19@gmail.com )



No comments:

Post a Comment