marathi blog vishwa

Saturday 2 September 2023

कवी सुधांशु आणि देव माझा विठू सावळा...

#सुधा_म्हणे : कवी सुधांशु आणि देव माझा विठू सावळा.. 

02 सप्टेंबर 23

विविध संतांच्या रचना या जितक्या प्रासादिक, मनात खोलवर उतरणाऱ्या, रुजणाऱ्या आहेत तशाच शेकडो सुरेल रचना आपल्या इथल्या अनेक कवींनीही केल्या आहेत. भावभोळ्या रचना लिहिण्यामध्ये असलेले एक अग्रगण्य कवी म्हणजे कवी सुधांशु. हणमंत नरहर जोशी उर्फ कवी सुधांशु हे आपल्या लोभस कवितांच्यामुळे लोकप्रिय झाले आणि त्याहून जास्त लोकप्रियता त्यांना मिळाली ती त्यांच्या दत्तभक्तीपर गीतांमुळे. 

औदुंबर या दत्तक्षेत्री जन्मलेला हा माणूस अंतर्बाह्य मृदु मुलायम होता. सुधांशु म्हणजे चंद्रासारखा शीतल होता. सर्वांशी असलेल्या प्रेमळ वर्तणूकीमुळे सर्वांचा आवडता होता. त्यांचे निसर्ग प्रेम, दत्त भक्ती त्यांच्या गीतामध्ये अगदी सहजपणे दिसत राहते. कौमुदी, भाव सुधा, अनाहत असे त्यांचे लेखन वाचताना आपण भान हरपून जातो. आणि तीच गत होते त्यांची भक्तिगीते ऐकताना. आर. एन. पराडकर यांनी गायलेली “दत्त दिगंबर दैवत माझे..” आदि भक्तीगीते आणि “इथेच आणि या बांधावर..” सारखी भावगीते अफाट लोकप्रिय झाली. त्यांची गोडी इतकी की आजही प्रत्येक गुरुवारी आकाशवाणीवर त्यांचे एकतरी गीत ऐकू येतेच. आज ज्या रचनेविषयी मला सांगावेसे वाटते ती मात्र दत्ताविषयीची नव्हे तर विठ्ठलाविषयीची रचना आहे.

पंढरपूरमधल्या त्या सावळ्याचे वेड लागले की जीवनच बदलून जाते. त्याचे साजरे गोजरे रूप इतके लोभसवाणे आहे की किती प्रेम करावे तरी कमीच भासावे. हा विठू खूप साधा आहे. त्याच्या अपेक्षा फार थोड्या. भावुक होऊन त्याला साद द्यावी, जवळ जावे त्याच्या इतके पुरते त्याला. त्याच्या आसपास गोळा झालेली मंडळी भजन कीर्तनी रंगून जातात. मात्र जास्त आनंदाने हाच फुलून येतो, त्यांच्या हव्याहव्याशा सहवासात समाधानाने डोलत राहतो. असा आनंदमेळा सुरू असल्याने मग अवघी पंढरी नगरी जणू वैकुंठ बनून राहते.

देव माझा विठू सावळा, माळ त्याची माझिया गळा

विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी

भीमेच्या काठी डुले, भक्तीचा मळा..

साजिरे रूप सुंदर, कटी झळके पीतांबर

कंठात तुळशीचे हार, कस्तुरी टिळा..

भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो

रंगून जाई भक्तांचा पाहुनी लळा..

आपल्याला हव्या असणाऱ्या या तृप्त आनंदी वातावरणाची सगळ्यांना फार ओढ असते. ते तसे जगणे आता लाभेल का ठाऊक नाही मात्र सुमन कल्याणपूर यांच्या भावविभोर आवाजात हे गीत ऐकताना तो समाधानी विठ्ठल आपल्या नजरेसमोर सगुण साकार होऊन जातो आणि अवघा देह सुखिया झाला असे नक्कीच वाटत राहते.

-सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)



4 comments:

  1. भावना नातू.2 September 2023 at 11:04

    अतिशय सुंदर लेखन. हे भावविभोर गीत सुमनताईंनी फार सुंदर गायले आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद भावना ताई. सुमन कल्याणपूर यांच्या भावमधुर आवाजात हे गाणं ऐकणं अतीव आनंददायी आहेच. 👍🏼😊

      Delete
  2. PRASAD KRISHNARAO NATOO2 September 2023 at 12:41

    खुप सुरेख शब्दांकन

    ReplyDelete