#सुधा_म्हणे: गणेशोत्सव आणि वातावरणातील पावित्र्य..
30 सप्टेंबर 23
पावसाळा
सुरू होत असतानाच गणपती येण्याचे वेध लागलेले असतात. कित्येक महिने आधीच गणेश
मूर्ती तयार करण्यास सुरुवात झालेली असते. विशिष्ट माती आणून मूर्ती तयार
करण्यासाठी खटपट सुरू होते. बहुतांश सर्व सार्वजनिक गणेश मूर्ती या पीओपी किंवा
अन्य साहित्यातून बनवल्या जात असल्या तरी शाडूच्या /
मातीच्या गणेशमूर्तीचे महत्व सर्वात जास्त असतेच. मुळात गणपती उत्सवात “पार्थिव”
गणेशमूर्ती आणणे हेच अभिप्रेत आहे. गणपती मातीपासून बनवला जायला हवा. लहान मुलांना
आजकाल शेकडो इंग्रजी शाळेत अॅक्टिविटी करताना “ क्ले पॅकेज” दिली जातात. त्याच
धर्तीवर मुलांना आपण गणपतीच्या काळात मातीचे गणपती बनवायला, त्यांना उत्तम रंग
द्यायला नक्कीच शिकवू शकतो ना? त्यामुळे मुलांची निरीक्षण शक्ती वाढेल, त्यांना
तशी मूर्ती करण्यातील आनंद अनुभवता येईल.
गणपतीला विविध पत्री, दूर्वा, फुले अर्पण करण्यासाठी लहान
गावात अजूनही आसपासच्या बागेत, रानात जाऊन फुले, दूर्वा गोळा केल्या जातात. मातीशी असणारे नाते अधिक वृद्धिंगत होत राहते. त्याचबरोबर
गणपती विसर्जनानंतर ही माती पुन्हा मातीत मिसळून जाणे हेही पर्यावरणासाठी आवश्यक
नव्हे का ?
गणपतीच्या काळात अवघे वातावरण मोठ्या साऊंड सिस्टिमच्या आवाजात दणाणून टाकले जाते. खरंच याची गरज आहे का हे पाहायला हवे. वातावरणात, अवकाशात सुंदर सूर पसरवत राहण्यासाठी विविध वाद्यांचा सुयोग्य उपयोग करायला हवा. गाणी, वाद्य संगीत यांच्या सुरांनी लोकांच्या चित्तवृत्ती उल्हसित होणे अधिक गरजेचे असते. विशिष्ट डेसीबल्स पेक्षा अधिक आवाज जास्त वेळ ऐकणे लोकांच्या तब्येतीसाठी हितकारक नसते मग अतिशय मोठ्या आवाजाचा अट्टहास का? हे आवाज सुखकारक वाटावे इतक्याच मर्यादेत असावेत हे भान आपण नक्कीच सांभाळायला हवे. प्रत्येक गोष्टीसाठी कायदेशीर बडगा उगारणे हेच जर गरजेचे होणार असेल तर ते आपल्या माणूसपणासाठी नक्कीच योग्य नव्हे.
वातावरणातील महत्वाचा घटक म्हणजे पाणी. गावोगावी असणारे पाण्याचे स्त्रोत अधिकाधिक दूषित होत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात तरुण मंडळानी एकत्र येऊन नदी, विहिरी यांच्या स्वच्छतेची मोहीम राबवायला हवी. अनेक ठिकाणी सरकारी योजनांमध्ये त्रुटी राहिलेल्या असतात. सांडपाणी प्रक्रिया केंद्रे बंद पडलेली असतात. गटारे तुंबलेली असतात. कित्येक ठिकाणी सांडपाणी थेट नदीत सोडलेले असते. या सगळ्याविरुद्ध गणेश मंडळाच्या माध्यमातून एकत्र झालेली तरुणाई या सगळ्याविरुद्ध जर एकवटली तर यंत्रणा सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण होऊ शकतो. नदी, नाले, तलाव यामध्ये गणेश विसर्जन केल्याने प्रदूषण कमी होण्यासाठी जरी खूप मोठा हातभार लागणार नसला तरी खारीचा वाटा तर नक्कीच असेल. तसेच गणपती विसर्जन झाल्यानंतर पुढील 2-4 दिवसांत तिथे स्वच्छता मोहीम देखील राबवायला हवी. त्यामुळे आपला परिसर, नदी, तलाव हे आपल्यासाठीच चांगल्या अवस्थेत उपलब्ध असतील. ईश्वराने निर्माण केलेल्या या सृष्टीचे, या वातावरणाचे पावित्र्य ईश्वरी उत्सवाच्या नावाखाली बिघडू न देणे हे आपल्याच हाती आहे असे मला वाटते.
- सुधांशु नाईक (9833299791)