marathi blog vishwa

Wednesday, 6 September 2023

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा...

 #सुधा_म्हणे: अमृताहुनी गोड नाम तुझे देवा..

06 सप्टेंबर 23

माणिक वर्मा यांच्या आवाजातील या अभंगाने महाराष्ट्रातील किमान 3-4 पिढ्याना भुरळ घातली आहे. गंमत म्हणजे परदेशातील नोकरीवर असताना जेंव्हा सोबत भारतातील इतर राज्यातील सहकारी काम करत होते त्यावेळी एकदा मूळचा गोरखरपूरचा असणाऱ्या माझ्या एक सहकारी मॅनेजरने हा अख्खा अभंग मला पाठ म्हणून दाखवला होता. पूर्वी कधीतरी पुणे- नाशिक परिसरात काम करताना रोज रेडिओवर हे लागत असे आणि काळजाला भिडत राही असे त्याने सांगितल्यावर मला नामदेवांच्या या लोभस भाषेचे, माणिकबाईंच्या तितक्याच मधाळ आवाजाचे कौतुक वाटत राहिले होते.

अमृताहुनि गोड नाम तुझें देवा । मन माझें केशवा कां वा नेघे ॥१॥

सांग पंढरिराया काय करूं यासी । कां रूप ध्यानासि न ये तुझें ॥२॥

कीर्तनीं बैसतां निद्रें नागविलें । मन हें भुललें विषयसुखा ॥३॥

हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ति । न ये माझ्या चित्तीं नामा म्हणे ॥४॥

नामदेव या अभंगात जे आर्तपणे सांगत राहतात ती तर आपल्या सर्वांच्या मनातील भावना. देवाचे नाव अति गोड असे अमृतासमान असूनही आपण नित्य नामस्मरणात रमत नाही. 3-3 तास सहज सिनेमा पाहणारी, रात्र रात्र जागून मॅच पाहणारी आपण सामान्य माणसे कीर्तनात बसलो तर पेंगु लागतो. उच्च प्रतीच्या आध्यात्मिक अनुभूतीऐवजी विषयसुखात रममाण होऊन जातो. विविध संत, सज्जन सतत ईश्वरभक्तीसाठी आपल्याला शिकवत असतात पण या भौतिक सुखात खोलवर गुंतून गेलेले मन अजिबात तिकडे वळत नाहीये हे सांगताना नामदेव व्याकुळ होऊन जातात. 

अरे माझ्या विठ्ठला, सतत तुझी ओढ असली तरी मन भटकत राहते. तुझीच भक्ती करू पाहतो पण मन अजिबात एकाग्र होत नाही, कुठे कुठे भटकत राहते, विविध तात्कालिक सुखे मला मोहवत राहत आहेत. माझ्या जिवलगा विठूराया, असे वाटते की तुझ्याविना अन्य कोणतेच विचार मनी ना येवोत. तुझ्याविना अन्य कुणाचा सहवासही नको. पण हे घडत नाहीये. तुझ्या भक्तीत अजूनही मी कमी पडतोय म्हणूनच तर तुझा सहवास मिळत नाहीये का? म्हणूनच तुझी कृपा होत नाहीये का? असे कळवळून सांगत राहतात.

मनातील तो विलक्षण झगडा हे मग फक्त त्यांचे सांगणे उरत नाही तर ते आपल्याच जगण्याचे चित्र जणू समोर मांडत आहेत असे वाटते. आपल्याला आरसा दाखवत आहेत असे वाटते. सगळे काही उमजून देखील आपण अजूनही स्वतःचे उत्थापन करू शकत नाही ही जाणीव मन पोखरत राहते. त्याच्यापर्यंत पोचायला  सगळ्या बेड्या तोडून जायचे तर असते पण जमत नाही हेच खरे. ज्याला ते जमले ते मग पूर्णत्वाला पोचतात. एकरूप होऊन जातात, आपले पाय मातीचेच राहतात आणि मनातील तीव्र आस देखील आपल्याला तशीच गुदमरून टाकत राहते. .!

-सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)




No comments:

Post a Comment