marathi blog vishwa

Saturday, 9 September 2023

भेटीलागी जिवा...

#सुधा_म्हणे: भेटीलागी जिवा...

09  सप्टेंबर 23

तुकोबाना दिव्य ज्ञान झाले आणि त्यांच्या मुखातून भक्तीभावनेने ओथंबलेल्या रचना निर्माण होऊ लागल्या. त्यांच्या घरी पूर्वापार वारीची परंपरा होतीच. त्यामुळे सतत पंढरीची ओढ त्यांना लागलेली असे. सोबत अनेकांना घेऊन तुकोबा अतीव उत्कटतेने पंढरीला जात. घरात असोत वा प्रवासात त्यांच्या चिंतनातून निर्माण होत होते शेकडो अभंग. चार सहा ओळीत तुकोबा असे काही दिव्य सांगून जात की त्याभोवती असंख्य सुहृद निर्माण झाले. लोकाना भक्तिमार्गावर नेऊ पाहणाऱ्या त्यांच्या या  अभंगाना हजारो लोकानी उराशी धरले. ज्ञानोबानी सुरू केलेल्या या वारकरी परंपरेचे तुकोबा कळस ठरले.


मिळणारी लोकप्रियता, होणारा जयजयकार याचा मोह त्यांना आता उरला नव्हता. आता मात्र केवळ आणि केवळ ईश्वराच्या, त्या जिवलग विठोबाच्या भेटीचीच ओढ उरली होती. सगळ्या आशा, अपेक्षा, वेदना, अपमान, सुख,दुःख या सगळ्यापार गेलेले तुकोबा मग आर्तपणे म्हणतात,

भेटीलागीं जीवा लागलीसे आस ।

पाहे रात्रंदिवस वाट तुझी ।।१।।

पूर्णिमेचा चंद्रमा चकोराजीवन ।

तैसें माझें मन वाट पाहे ।।२।।

दिवाळीच्या मुळा लेंकीं आसावली ।

पाहातसे वाटुली पंढरीची ।।३।।

भुकेलिवा बाळ अति शोक करी ।

वाट पाहे उरि माउलीची ।।४।।

तुका म्हणे मज लागलीसे भूक ।

धांवूनि श्रीमुख दांवी देवा ।।५।।

 

रोजच्या जगण्यातील किती सहज दिसणारी ही उदाहरणे. मात्र तुकोबांच्या कारुण्यमय शब्दांचे कोंदण लाभल्यावर ते शब्द थेट मनात खोलवर भिडत जातात. चंद्रासाठी आतुरलेला चकोर, दिवाळीत आपला बंधु भेटेल, तिच्यासाठी या सासरी येईल म्हणून आस लावून बसलेली ती किंवा भुकेजलेले बाळ आईचे स्तन्य प्यायला जसा आक्रोश करते तसे आक्रंदन तुकोबांनी शब्दातून उभे केले आहे.

या अभंगासाठी श्रीनिवास खळेकाकानी जी रचना केली आहे त्यातील आर्त कोमल स्वर लतादीदीच्या सुरात ऐकणे ही अनुभूति सांगायला आपल्याकडे शब्दच उरत नाहीत.

-सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)



No comments:

Post a Comment