marathi blog vishwa

Friday, 22 September 2023

आनंददायी गजानन...

 #सुधा_म्हणे: आनंददायी गजानन...

22 सप्टेंबर 23

घरोघरी गणपती येण्यापूर्वी आरास करण्यासाठी जागरणे होत असतात. गणेश आगमन झाले की रोजची पूजा, नैवेद्य यात कसा वेळ जातो हे कळत नाही. कोकणात तर घरे पाहुण्यांनी भरून जातात. त्या निमित्ताने बाजारपेठा फुलून येतात. आसपासच्या गावातील मित्रमंडळीच्या घरी आवर्जून जावेसे वाटते. घरोघरी जाऊन गणपतीचे दर्शन घ्यायला कुणी आमंत्रण देण्याची गरज नसते. त्या निमित्ताने सगळे एकत्र होतात. अथर्वशीर्षाची आवर्तने केली जातात. सत्यनारायण पूजा होतात. गौरीच्या आगमनानंतर स्त्रियांचे हळदीकुंकू समारंभ रंगतात. वर्षभरात न भेटलेली मंडळी एकमेकाना भेटतात. एकमेकांकडील प्रसाद, मोदक, खास केलेला एखादा पदार्थ यांची देवाण घेवाण होते. कुणाच्या घरी कोणती आरास केली आहे त्याचे कौतुक होते. नियमित भेटणारे कुणी दिसले नाही की त्याची चौकशी होते. ज्यांचा मृत्यू झालाय त्यांच्या आठवणी निघतात. आरतीच्या वेळी हमखास सगळ्यानी एकत्र जमावे अशी प्रेमळ आज्ञा दिली जाते. 

गणपतीला “ त्वमानंदमसयस्त्वं ब्रह्ममय:। त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि ।। असे म्हटले जाते. म्हणजेच गणपती हा आनंद देणारा आहे. ब्रह्मस्वरूप आहे, सच्चिदानंद असून अद्वितीय आहे. आपल्या परिसरातील भूगोल, पर्यावरण याचा विचार केला तर या काळात शेतीची कामे बऱ्यापैकी झालेली असतात. शेतात मुख्यत: भात किंवा खरीपाचे अन्य पीक तयार होत असते. येणाऱ्या काळात कोणतेही संकट न येता हे सारे पीक भरभरून यावे, पुढल्या काही महिन्यात सर्वत्र सुख-समाधान असावे यासाठी सुद्धा गणरायाचे आशीर्वाद मागितले जातात. मुख्यत: कामे उरकली असल्याने लोकाना देखील परस्परांकडे जाणे सुलभ होते. सुख-दुःखाच्या गोष्टी होतात. रोज रात्री गणपतीची आरती झाल्यावर एखाद्या घरी छान मैफल रंगते. गायन, वादन, भजन, कोकणातील खास असे जाखडी नृत्य / खेळे हे सारे गावोगावी रंगते. माणसे त्यात भान विसरून रमतात. पुढील कामांसाठी, कष्टासाठी पुन्हा सज्ज होऊन जातात. त्यांच्या मनाला उभारी मिळण्यासाठी आवश्यक असे आनंदी,प्रसन्न असे वातावरण गणपती उत्सवामुळे मिळते असे सांगितले तर वावगे ठरणार नाही.

गावागावात विविध सार्वजनिक गणपती असायचे. हल्ली त्यांचा जरा जास्तच अतिरेक होत असला तरी पूर्वी या सार्वजनिक गणपतीच्या मंडपात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत. अनेक दिग्गजांचे गायन, वादन, भाषण, विविध वाद्यवृंदांचे कार्यक्रम यामुळे गावोगावी गणेशोत्सव हा अगदी हवीहवीशी गोष्ट वाटायची. गणपती आले असे म्हणे पर्यन्त गणपती विसर्जनाचा दिवस जवळ येत राहायचा. आपापले दुःख, दैन्य, एकटेपण,अपयश हे सारे काही काळ विसरायला लावणारा, लोडाला टेकून मोदक फस्त करणारा तो प्रसन्न गजानन म्हणूनच आनंददायी जिवलग वाटला नसता तरच नवल होते.

-सुधांशु नाईक(nsudha19@gmail.com )



No comments:

Post a Comment