marathi blog vishwa

Thursday, 21 September 2023

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा....

 #सुधा_म्हणे: गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा...

21 सप्टेंबर 23

एकेकाळी पारतंत्र्यात असलेल्या महाराष्ट्रात “शक्तीने राज्य चालते..” असे सांगत समर्थ रामदासांनी लोकाना शक्तीची साधना करण्याचा आग्रह केला. हनुमंतासारखे, पराक्रमी रामासारखे आराध्य दैवत समोर ठेऊन बलोपासना करायला प्रवृत्त केले. कीर्तन, प्रवचन, वैयक्तिक भेटीगाठी यामधून हजारो लोकांना पुन्हा आत्मविश्वास दिला. नाशिक ते सातारा –कोल्हापूर या संपूर्ण पट्ट्यात अनेक ठिकाणी हनुमंताची मंदिरे उभी करून तिथे व्यायामशाळा उभ्या करण्यासाठी लोकाना प्रोत्साहन दिले. समाज प्रबोधनासाठी गावोगावी हिंडणाऱ्या, शेकडो लोकाना भेटणाऱ्या समर्थांनी मुक्काम मात्र एकांत स्थळी केले. घळी, जंगले, वनातील मंदिरे इथे वास्तव्य केले.

चाफळ सारख्या ठिकाणी देवाचा उत्सव असताना देखील ते “दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो..” असे म्हणतात. दासबोधासारखा अनमोल ग्रंथ, विविध आरत्या, अभंग, श्लोक अशा प्रकारे उदंड साहित्य निर्माण केलेल्या समर्थांनी गावोगावी शिष्य गोळा केले. संपूर्ण भारतात सुमारे 1100 मठांची निर्मिती करून उत्तम संघटन कौशल्याचे उदाहरण सर्वांसमोर ठेवले. या सगळ्या संघटन कार्यात त्यांचे मुख्य शस्त्र होते मनाचे श्लोक. घरोघरी माधुकरी म्हणजे भिक्षा मागूनच रामदासी शिष्याने आपला उदरनिर्वाह करावा असा त्यांचा दंडक होता. ही भिक्षा मागत असताना शिष्याने जो श्लोक म्हणावा त्यासाठी त्यांनी अद्वितीय अशा “मनाच्या श्लोकांची” निर्मिती केली. लोकांच्या जगण्यातील, वर्तणूकीतील साध्या साध्या गोष्टींवर भाष्य करणारे हे मनाचे श्लोक अतिशय लोकप्रिय झाले. त्यातील भावना, आर्तता आणि उपदेश लोकाना सहज समजत राहिला.

या मनाच्या श्लोकांची सुरुवात करताना अर्थातच त्यांनी गणेशाला वंदन केले आहे. ते म्हणतात,

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा

मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा

नमू शारदा मूळ चत्वार वाचा

गमू पंथ आनंत या राघवाचा

सर्वगुण संपन्न असा तो गुणेश, मूलाधारचक्राचा अधिपती असा तो गणपती, सर्व शिवगण किंवा शिवशंभूच्या सैन्याचा सेनापती असा तो विघ्नहर्ता गणनायक म्हणूनच हजारो वर्षे सर्वाना वंदनीय ठरला. बाल गणेश, नृत्य गणेश, संगीतज्ञ गणेश, सेनापती गणेश, रिद्धी-सिद्धीचा गणेश अशी गणेशाची किती रुपे सांगावी. “कोटी कोटी रुपे तुझी..”असेच म्हणावे लागते.

समर्थ सुद्धा “मनाचे श्लोक” या आपल्या अद्वितीय रचनेच्या सुरुवातीला सर्वगुणसंपन्न गणपतीला, त्या गणाधीशाला वंदन करताना निर्गुणाचा आरंभ म्हणतात. त्याच्या कोटी कोटी सगुण रूपातच गुंतून राहण्यापेक्षा त्याच्या निर्गुण निराकार रूपाकडे आपले लक्ष वेधतात असे मला वाटते.

मित्रहो, समर्थांनी आपल्या विविध रचनांमधून ईश्वरी शक्तीचे गुणगान केले. देवाची भक्ती करत राहताना त्यापासून आपण ऊर्जा घ्यावी, आदर्श घ्यावा, दुर्गुण त्यागावे आणि उत्तम गुण अंगी बाळगावे असे या मनाच्या श्लोकातून सांगत राहतात.

देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी

मना सज्जना हेची क्रिया धरावी

मना चंदनाचे परी त्वा झिजावे

परी अंतरी सज्जना निववावे

अशा साध्या शब्दातून लोकाना जगण्याचे उत्तम मार्ग दाखवत राहिले.

गणपतीच्या, रामाच्या, शंकराच्या, हनुमंताच्या विशाल बुद्धी आणि शक्तीची जोड आपल्याही आयुष्याला लाभावी असे मागणे मागत राहतात. खंडोबा किंवा मल्हारीच्या आरती मध्ये तर अशा शक्तिशाली ईश्वराची स्तुति करताना “रामी रामदास जिवलग भेटला..” असे म्हणतात. गावोगावी हिंडून लोकसंग्रह करणाऱ्या समर्थांना उत्तम गुण वाढवत लोकानी एकत्र यावे असे वाटते. “देव मस्तकी धरावा.. अवघा हलकल्लोळ करावा” असे त्यांना तळमळून सांगावेसे वाटते. हा हलकल्लोळ पराक्रमाचा आहे, सदगुणांचा आहे याची जाणीव आपण ठेवून वागलो तरी पुरेसे आहे असे मला वाटते.

(विशेष नोंद: सोबतचे छायाचित्र हे हळेबीडू येथील विशालदेही गणेशाचे आहे. इतक्या भव्य आणि देखण्या मूर्तीला शिल्पकारांनी फार नाजूकपणे दगडातील दागिने घडवत सजवले होते. ज्या मूर्ख आणि विध्वंसक लोकाना या मूर्तीची तोडफोड करावीशी वाटली त्यांच्याविषयी अत्यंत कीव आणि संताप वाटतो.)

-सुधांशु नाईक(nsudha19@gmail.com )



No comments:

Post a Comment