#सुधा_म्हणे: ॐकार प्रधान रूप गणेशाचे..
18 सप्टेंबर 23
दरवर्षी श्रावण संपत आला की आपल्या सर्वाना
वेध लागतात ते गणपतीचे. घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची सर्वत्र लगबग सुरू
होते. अवघे वातावरण प्रसन्न होऊन जाते. लहानापासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांचे लग्न गणपतीकडे
लागून राहते. विविध मूर्तीशाळांमध्ये तयार होणाऱ्या मूर्तीवर शेवटचा हात फिरत असतो.
त्या रेखीव मूर्तीचे डोळे असे काही रंगवले जातात की जणू प्रेमळ नजरेने गजानन आपल्याकडे
पाहत आहे असेच वाटून जाते. “बाप्पा मोरया” च्या गजरात ती लंबोदर मायाळू अशी गणेशमूर्ती
घरी येऊन विराजमान होते. एक हवाहवासा जिवलग घरी आल्याचे समाधान आपल्याच चेहेऱ्यावर
विलसू लागते.
आपल्या आयुष्यात कोणतीच अडचण येऊ नये म्हणून कोणत्याही कार्यात सर्वप्रथम विघ्नहर्त्या गणेशाची पूजा करावी असा एक संकेत आहे. तो विघ्नहर्ता आहे, दीनांचा कैवारी आहे, सुखवृद्धी करणारा आहे. त्याचबरोबर 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असा हा गणपती. त्यामुळे त्याच्या पासून प्रेरणा घेत अनेक कलावंत देखील आपल्या सादरीकरणापूर्वी गणेशवंदन करतात. सर्वांना आनंद देणारा, सुख देणारा असा गणेश म्हणूनच अनेकांचा आवडता देव. प्राचीन काळातील यज्ञयाग असो, विविध उपासना असोत, “गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कविनामुपमश्रवस्तम्” असे म्हणत कायम गणेशाला अग्रपूजेचा मान दिला जातो.
साहित्याचा विचार केला तर वेदकाळापासून अनेक ग्रंथांच्या सुरुवातीला गणेश वंदन केले जाते. विविध स्तोत्रांची सुरुवातच “श्रीगणेशाय नम:” अशी केली जाते. वेदकालीन गणपती अथर्वशीर्षामध्ये “ त्वं ब्रह्मा.. त्वं विष्णु: त्वं रुद्र: त्वं इन्द्र त्वं अग्नि: त्वं वायु: त्वं सूर्य: त्वं चंद्रमास्त्वं..” असे म्हणताना विश्वात सर्व काही गणेश आहे असे मानले जाते. ज्याना वेदाध्ययन करण्याचा अधिकार तत्कालीन समाजव्यवस्थेने दिला नव्हता ते तुकोबा देखील व्यासांचा दाखला देत अगदी हेच सांगून जातात. तुकोबांचे शब्द इतके साधे सोपे की अडाणी माणसालादेखील सहज समजून जावेत.
ॐकार प्रधान रूप गणेशाचे I
हे तिन्ही देवांचे जन्मस्थान II
अकार तो ब्रह्म, उकार तो
विष्णु I
मकार महेश जाणीयेला II
ऐसे तिन्ही देव जेथूनी उत्पन्न I
तो हा गजानन मायबाप II
तुका म्हणे ऐसे आहे वेदवाणी I
पहावे पुराणी व्यासाचिया II
सुमन कल्याणपूर यांच्या सुरेल आवाजातील ही गणेशवंदना मनाला भिडणारीच. तुकोबांच्या सुरेख शब्दांना संगीत दिले होते कमलाकर भागवत यांनी. आज घरोघरी गणपती येत राहतील आणि उद्या यथाशक्ति यथामति पूजा झाल्यावर गणरायाची प्राणप्रतिष्ठा होईल त्यावेळी नक्कीच हे गाणे आपल्या मनात गुंजत राहील. आपापल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी गणेशाने सर्वाना उदंड आशीर्वाद द्यावेत ही प्रार्थना.
-सुधांशु नाईक(nsudha19@gmail.com )
No comments:
Post a Comment