#सुधा_म्हणे: उत्सव हे कलागुणांसाठी पर्वणी व्हावेत..
26 सप्टेंबर 23
श्री गणरायाला आपण कलांचा अधिपती मानतो त्यामुळे गणेशोत्सवा सारख्या सार्वजनिक कार्यक्रमात विविध कलागुणांना वाव मिळेल असे कार्यक्रम अधिकाधिक प्रमाणात सादर व्हायला हवेत. जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही कलागुण असतातच. कित्येकदा आपल्याला त्याची ओळख होत नाही तर कित्येकदा आपल्याला सुयोग्य व्यासपीठ मिळत नाही. पुण्या-मुंबईसारख्या शहरात तर विविध कार्यक्रम शक्य असतात, होतही असतात मात्र त्या धर्तीवर गावोगावी अशी सुरुवात व्हायला हवी.
पूर्वी विविध सार्वजनिक गणेशोत्सव असलेल्या ठिकाणी काही खास थीम घेऊन मूर्ती किंवा शेजारी देखावे बनवले जात. कित्येक गावांतून व्याख्याने, कथाकथन, एकांकिका, शास्त्रीय किंवा सुगम संगीताच्या मैफली, नृत्यविष्कार, असे किती काही घडत असे. त्यासाठी स्थानिक कलावंत मेहनत घेत. आजही हे सगळे उपक्रम आपण आपापल्या गावी करू शकतो. प्रा. शिवाजीराव भोसले, निनाद बेडेकर, प्र. के घाणेकर, किरण पुरंदरे आदि ज्येष्ठ व्याख्याते/अभ्यासक आपापल्या आवडत्या विषयांवर असे काही बोलून जातात की माणूस तहान भूक विसरून जाई. माधव गाडगीळ असोत किंवा मारुती चितमपल्ली, त्यांच्याकडून जंगलांचे, पर्यावरणाचे अनुभव ऐकत बसणे ही पर्वणीच असते. हे असे सारे कार्यक्रम पुन्हा गावोगावी सुरू व्हायला हवेत. प्राणी, पक्षी, झाडे, पाने, फुले, कीटक यांची दुनियाच वेगळी. ती समजून घेता येईल.
पं. भीमसेन जोशी यांच्यापासून ते हल्लीच्या पिढीतील सावनी शेंडे, संजीव अभ्यंकर यांच्यापर्यंत अनेक गायक –गायिकांनी गणेशोत्सवात मैफली रंगवल्या आहेत. सुचेता भिडे-चापेकर, शर्वरी जमेनीस आदिनी या उत्सवातून लोकांसमोर उत्तम शास्त्रीय नृत्याविष्कार पेश केले आहेत. कित्येक उत्तमोत्तम चित्रकार, शिल्पकार, फोटोग्राफर्स यांची प्रदर्शने आयोजित करता येतील. मुख्य म्हणजे असे कार्यक्रम यापुढे केवळ मोठ्या शहरांपुरते न राहता गावागावात व्हायला हवेत. इतकेच नव्हे तर प्रसंगी खर्च कमी करण्यासाठी या कलाकारांच्या ऑनलाइन मैफिली देखील आपण आयोजित करू शकतो.
प्रत्येकवेळी खूप दिग्गज कलाकार बोलवायला हवेत असे नाही. आपल्या गावात गुणी कलाकार असतातच. त्यांना जर आपण स्टेज देऊ शकलो तर कित्येक युवा कलाकारांना आपले गुण दाखवणे शक्य होईल. आपल्या मंडळाच्या समोरील मंडपात उत्तम रांगोळी स्पर्धा घेणे, श्लोक,स्तोत्र स्पर्धा,चित्र – शिल्प – गायन- नृत्य आदि स्पर्धा घेणे आपल्याला सहज शक्य आहे. आपल्याकडे विविध भाषांमधून दर्जेदार साहित्य प्रकाशित होत असते. आपली मराठी भाषा किंवा या अन्य भारतीय भाषांमधील उत्तमोत्तम साहित्यिक उताऱ्यांचे अभिवाचन करण्याचे कार्यक्रम आपण नक्कीच सादर करू शकतो.
सध्याच्या काळात आपल्या देशातील संस्कृत, पाली, अर्ध मागधी आदि भाषा तर परदेशातील
लोक देखील शिकत आहेत. त्याचबरोबर सध्या वापरात असलेल्या पंजाबी,
बंगाली, असामी, उडिया,
तमिळ, मल्याळम आदि अन्य भाषा शिकायची संधी मिळावी
म्हणून अशा उत्सवतून या भाषेची तोंडओळख होईल असे छोटे रंजनात्मक कार्यक्रम अवश्य घेऊ
शकतो. सतत जर्मन, जपानी, फ्रेंच आदि परकीय भाषाच शिकल्या पाहिजेत असे नाही. आपल्या
भाषा नव्या पिढीपर्यन्त आपणच नक्की नेऊ शकतो असे मला वाटते.
गायन-वादन-नृत्य-चित्र-शिल्प-काव्य-साहित्य अशा विविध कलांच्या सहाय्याने आपले उत्सव
अधिकाधिक लोकप्रिय करणे आपल्याला सहज शक्य आहे. इतर कुणीतरी सुरुवात
करावी असे न म्हणता आपणच ते करायला हवे, बरोबर ना?
-सुधांशु नाईक
(9833299791)
No comments:
Post a Comment