#सुधा_म्हणे: केंव्हा भेटसि केशवा...
08 सप्टेंबर 23
संत तुकोबांचे अवघे आयुष्यच वेगळे. अत्यंत इमानेइतबारे आपला
धंदा करणाऱ्या तुकोबाना त्याकाळी आलेल्या दुष्काळाने त्रस्त केले. मोठा भाऊ
विरक्ती आल्याने निघून गेला. पहिली पत्नी आणि मुलगा संतू यांचे निधन झाले.
गुरेढोरे पण मेली. खायला अन्न नाही अशी अवस्था. त्यात त्यांच्याकडे गावातील
महाजनकी होती. घरात सावकारी होती. पण ज्या लोकानी कर्जे घेतली होती त्यांना ती
फेडता येणे अशक्य. उदास झालेले, तुकोबा डोंगरावर गेले आणि त्यांना तिथे प्रचिती
आली. आयुष्याचे फोलपण समजले. जे जे जगत आलो, जे जे उपभोगले ते ते किती क्षणभंगुर
आहे याची परखड जाणीव झाली. आणि आपत्तीने पोळलेला त्यांचा जीव परमेश्वर भेटीसाठी
व्याकुळ होऊन गेला. त्या केशवाच्या, त्या विठ्ठलाच्या दर्शनाची अपार ओढ ते अतिशय
परिणामकारक शब्दात व्यक्त करताना म्हणतात,
कन्या सासुर्यासि जाये ।
मागें परतोनी पाहे ॥१॥
तैसें जालें माझ्या जिवा ।
केव्हां भेटसी केशवा ॥ध्रु.॥
चुकलिया माये ।
बाळ हुरू हुरू पाहे ॥२॥
जीवना वेगळी मासोळी ।
तैसा तुका म्हणे तळमळी ॥३॥
आपली ही व्याकुळता शब्दातून समर्थपणे व्यक्त करताना तुकोबा रोजच्या जगण्यातील सुंदर उदाहरणे देतात. माहेराहून सासरी निघालेल्या मुलीला जसे प्रत्येक पाऊल जड झालेले असते, माहेराशिवाय, तिथल्या जिवलग अशा आपल्या माणसांशिवाय राहणे तिच्यासाठी किती अवघड गोष्ट. मात्र नियतीचा खेळ, ही जगरहाटीच अशी की उरावर प्रचंड ओझे घेऊन हे सगळे करावे लागते. आपल्या इच्छा बाजूला ठेवून राहावे लागते. तिच्या मनातील ती प्रचंड खळबळ आपल्या भावनेशी जोडत जेंव्हा तुकोबा लिहून जातात तेंव्हा ते बोल, ते आर्त सर्वसामान्य स्त्री-पुरुषांच्या काळजाला भिडले नसते तरच नवल.
दुसरे उदाहरण तर मातेपासून दुरावलेल्या बाळाचे. त्याचे ते तडफडणे, तिला भेटायला कळवळत राहणे किती निरागस. कोणत्याही बाळाचे असे तळमळणे पाहून कोणत्याही वत्सल मातेचेच नव्हे तर कोणत्याही सहृदयी व्यक्तीचे हृदय द्रवतेच. मात्र इथे मीही असाच तळमळत असूनही त्या परीक्षा पाहणाऱ्या विठ्ठलाचे मन मात्र अजून द्रवत नाही. पाण्यातून बाहेर काढलेल्या मासोळीची तडफड जितकी जीवघेणी असते तसेच असते जिवलगाच्या भेटीसाठीचे तडफडणे. जसे राधेचे, मीरेचे कृष्णासाठी तळमळणे आहे त्याच जातीची आहे तुकोबांची ही विरहवेदना. तुकोबांच्या विठ्ठलभेटीचे हे आर्त कारुण्यरसाचे अवीट उदाहरण बनून जाते. काळजात उतरणाऱ्या लतादीदीच्या स्वरात भिजून येताना आपल्याही डोळ्यांवाटे अलगद पाझरत राहते.
-सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)
छान लेखन.
ReplyDelete