marathi blog vishwa

Tuesday, 19 September 2023

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची...

 #सुधा_म्हणे: सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची...

19 सप्टेंबर 23

श्री गणराय घरी येऊन विराजमान झाले की अवघ्या घराची कळाच बदलून जाते. तुमचे घर लहानसे दोन खोल्यांचे असो की मोठे ऐसपैस असो, विशिष्ट जागी विराजमान झालेली गणेशाची ती तुंदीलतनु स्मितवदनी मूर्ती घरात भरभरून चैतन्य घेऊन येते. लंबोदर असला तरी गणपती चपळ आहे, पराक्रमी आहे, एकीकडे साहित्य आणि संगीतज्ञ असलेला गणपती प्रसंगी कठोर दुष्टनिर्दालक आहे. खादाड आणि निवांत लोडाला टेकून बसलेला दिसत असला तरी ज्ञान-विज्ञान-कला यांच्यावर त्याचे प्रभुत्व आहे. म्हणूनच त्याची स्तुति करताना हजारो वर्षांपूर्वी ऋषीनी “त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि..” असे म्हटले आहे. 

अशी कोणतीच गोष्ट नाही की जी गणपतीला शक्य नाही. म्हणूनच त्याच्या दर्शनाने आपल्या चित्तवृत्ती शांतवत रहातात. आपण सोसलेले त्रास, दुःखे या सगळ्याचा त्याच्या संगतीत जणू विसर पडतो. तो राहणार असतो मोजकेच असे काही दिवस मात्र तरीही त्याच्या अस्तित्वाने अवघे घर जणू आनंदाने भरून जाते. इतकेच नव्हे तर त्याच्या नुसत्या येण्याच्या चाहुलीनेदेखील अंगी उत्साह संचारतो. किती आणि काय करू असे होऊन जाते.

म्हणूनच बाप्पा गणेश येण्यापूर्वीच सर्वत्र त्याच्या स्वागताची तयारी सुरू होते. आरास करणे, नैवेद्यासाठी विविध पदार्थ करायचे असतात त्याची तयारी करणे यामध्ये कसा वेळ जातो ते कळत नाही. लहान मुलांपासून ज्येष्ठ व्यक्तिपर्यंत सर्वाना गणपती आपला वाटतो हेच त्याचे वेगळेपण. त्याचे ते गोंडस रूप मनात आनंदलहरी निर्माण करते.

समाजातील सर्व थरातील लोक आपापल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करू शकतात ही किती सुंदर गोष्ट आहे. तो गणपती कुणा विशिष्ट लोकांचा, विशिष्ट वर्गाचा नव्हे तर सर्वांचा जिवलग आहे ही जाणीवच एक आनंदमय वातावरण निर्माण करते. म्हणूनच मग घरोघरी आरतीची सुरुवात करताना ओठावर हेच शब्द येतात;

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची|
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची|

समर्थ रामदासांनी रचलेली ही आरती म्हटल्याशिवाय घरोघरी गणपती आलेत असे वाटतच नाही. इतकेच नव्हे तर वर्षभर जिथे जिथे आरतीची वेळ असते तिथे तिथे सर्वप्रथम “सुखकर्ता दुखहर्ता..” म्हणणे अपरिहार्य आहे. समर्थ रामदास हे मुळात शब्दप्रभू. त्यामुळे त्यांना दिसलेला गणेश कसा आहे याचे ते अतिशय प्रसन्न अशा शब्दात वर्णन करतात. आरती लिहिताना कोणत्याही जड शब्दांच्या ऐवजी सर्वांच्या तोंडी सहज रुळतील अशा “दर्शनमात्रे मनकामना पुरती..” सारख्या सहजसोप्या नादमधुर शब्दांचा समर्पक उपयोग करतात. लंबोदर, वक्रतुंड आदि गणेश नामे सहजतेने आरतीमध्ये गुंफताना “रुणझुणती नुपुरे चरणी..” असे म्हणत आपल्या रचनेला गेयता देतात.

समाजाचे प्रबोधन करायचे असेल, लोकाना नवीन काही शिकवायचे असेल तर थेट व्यासपीठावर बसून उपदेशांचे डोस द्यायचे नसतात तर आधी लोकांच्या मिसळायचे असते, त्यांना आपल्या वागणुकीने आपलेसे करायचे असते. त्यांना उमगेल त्यांच्यासाठी ज्या गोष्टी सुखाच्या असतात ते उमगले पाहिजे, त्यांच्या दुःखाच्या क्षणी आपल्याला त्यांना आधार देता यायला हवा आदि सगळ्या गोष्टी समर्थांना पुरेपूर ठाऊक होत्या. त्यामुळे जेंव्हा ते समाज प्रबोधनासाठी सर्वत्र बाहेर पडले तेंव्हा कीर्तन, प्रवचन याद्वारे जनसंपर्क साधताना, लोकांच्या मनात रुजण्यासाठी अशा उत्तमोत्तम आरत्या त्यांनी लिहिल्या. गेली सुमारे चारशे वर्षे ही आरती समाजाच्या ओठावर आहे यातच त्या शब्दांचे, त्या भक्तीभावनेचे अमरत्व आहे असे मला वाटते.

विशेष नोंद: सोबतचे गणपतीचे चित्र हे प्रतिभाशाली चित्रकार अशी मान्यता पावलेले, कोल्हापूरमधील थोर चित्रकार आबालाल रेहमान यांनी १९१७ मध्ये रेखाटलेले आहे.)

-सुधांशु नाईक(nsudha19@gmail.com )





No comments:

Post a Comment