marathi blog vishwa

Sunday, 10 September 2023

प्राचीन विहिरींचे अद्भुत स्थापत्य..!

 #सुधा_म्हणे: प्राचीन विहिरींचे अद्भुत स्थापत्य..!

10 सप्टेंबर 23

पाण्याचे दुर्भिक्ष असल्याची जाणीव असल्यानेच वडोदरा, कर्णावती उर्फ अहमदाबाद परिसरात शेकडो वर्षापूर्वी भूजलाचा नेटका वापर करता यावा यासाठी विविध भव्य वाव म्हणजे बारव किंवा भल्या मोठ्या विहिरी (stepwells) यांची निर्मिती करण्यात आली होती. “राणी की वाव” सारख्या सुप्रसिद्ध ठिकाणाला हजारो जण भेट देतात मात्र देशभर आपल्या आसपास असणाऱ्या अन्य बारव दुर्लक्षित राहतात. म्हणूनच वडोदऱ्याच्या परिसरातील देखण्या बारव बघायचे ठरवले आणि भल्या सकाळी थेट पोचलो बोरसद येथे..!

बोरसदची सात मजली वाव किंवा बारव : या गावात ऐन मध्यभागी ही सात मजली भव्य बारव निर्माण केली गेली. तिथे देवनागरी भाषेत लिहिलेला शिलालेख देखील एका टप्प्यावर पाहायला मिळतो. त्यानुसार विक्रम संवत, 1553 च्या श्रावण महिन्यात (इ.स. 1497 मध्ये) स्तंभतीर्थ येथील वासू सोमा आणि त्याच्या मुलांनी ही भव्य बारव बांधली. आपल्याकडे गणित, सिविल इंजिनिअरिंग हे किती प्रगत होते हे अशा बांधकामातून ठसठशीतपणे समोर येते.


योग्य मोजमापे, लोड बेअरिंग कसे होणार, सांधे कसे आणि कुठे जोडायचे, कॉलम कुठे असले पाहिजेत, बीमचा आकार केवढा हवा पाणी पातळी कशी नियंत्रित ठेवायची अशा शेकडो लहान मोठ्या गोष्टींचा इथे बारकाईने विचार करण्यात आलेला होता हे जाणवते.


जमिनीवरून पाहताना याची भव्यता चटकन उमगत नाही मात्र एक एक टप्पा उतरत आपण जसे खाली खाली जाऊ लागतो तसे तसे त्याचे भव्यपण पाहून आपण आश्चर्यचकित होऊन जातो. विटा आणि घडीव दगड यांच्या नेमक्या संयोगातून या भल्या मोठ्या बारवचे बांधकाम करण्यात आले आहे.


आजही या विहीरीचे पाणी शुद्ध आहे आणि त्यात चक्क लहान लहान शेकडो मासे सुळसुळत असतात. एकमेकातून जोडलेल्या दगडी खांबांची घडण आज पाच-सहाशे वर्षानंतर देखील भक्कम आहे. भारतीय पुरातत्व विभाग आणि स्थानिकांनी या ठिकाणची त्यातल्या त्यात बऱ्यापैकी निगा राखली आहे ही गोष्ट सुखावणारी आहे. भिंतीवरील आणि दगडी खांबांवरील लहानशी पण नाजुक सजावट इथल्या स्थापत्यशिल्पींच्या कलात्मक मानसिकतेच्या खुणा दाखवत राहतात.


इथली बारव पाहून झाल्यावर बोरसद ते वडोदरा रस्त्यावरील हिंगलोट या ठिकाणी निघालो. वाटेत मही नदीचे विस्तीर्ण पात्र डोळ्याना सुखावते. पाण्यात उतरण्याचा मोह टाळता येत नाही. मुख्य शहरापासून 30-40 किमीच्या अंतरावर असलेले हे रस्ते, नदीकिनारे त्यांच्या आसपास विहरणारे विविध प्रकारचे पक्षी हे तर मनाला भुरळ घालणारे एक वेगळेच विश्व..!

हिंगलोट ची बारव : हिंगलोटला पोचल्यावर बारव नेमकी कुठे आहे ते शोधत फिरलो. एका ठिकाणी छोट्या रस्त्याच्या कडेला सापडली. मात्र तिची फारच दुरवस्था झाली आहे.


 संपूर्ण विटांचे बांधकाम आणि देखण्या कमानी असलेल्या या वास्तूच्या संवर्धनासाठी स्थानिक तरुणांनी कित्येकदा प्रयत्न केले मात्र त्यांना इतरांची फारशी साथ मिळाली नसल्याचे जाणवले. या बारवचे संवर्धन होण्यासाठी अधिक लक्ष देण्याची नक्कीच गरज आहे.

सेवासीची विद्याधर वाव किंवा बारव : एका दिवसात पाहिलेल्या तिन्ही बारव मधील ही सर्वोत्तम म्हणावी लागेल. 5-6 मजली संपूर्ण बांधकाम फक्त घडीव दगडातून बनवले गेले आहे. भूमितीय रचना किती देखण्या असू शकतात याचे हे खूप सुंदर उदाहरण आहे. इथेही प्राचीन शिलालेख आहे त्यानुसार विक्रम संवत 1549 मध्ये (म्हणजेच इ. स. 1496 मध्ये) राजा हरीदास यांनी या भागातील त्याकाळात आदरणीय व्यक्तिमत्व असलेल्या विद्याधर यांच्या नावे या बारवची निर्मिती केली असे दिसते.


विहीरीसाठी वापरलेले मोठे मोठे दगड कसे आणले असतील, त्यांची सांधेजोड कशी केली असेल, पुरेसा प्रकाश आणि खेळती हवा असावी यासाठी केलेली विचारपूर्वक रचना आपल्याला स्तिमीत करते.



सेवासी ते सिंगरोट या रहदारीच्या मार्गावर अगदी रस्त्याकडेला असलेल्या या बारवसमोर घुमटाकार अशी भव्य प्रवेश कमान आहे.


चारी बाजूने व्यवस्थित भिंती बांधून त्याला संरक्षण देण्यात आले आहे. या विहीरीत खाली उतरत जाताना सध्या एका ठिकाणी भिंतीवरील कलाकुसरीच्या आधारे मंदिर सदृश रचना करून देवीचे मंदिर म्हणून वापर केला जात आहे. मात्र मंदिर म्हणून याला अधिक महत्व देण्यापेक्षा जलव्यवस्थापनातील एक अद्भुत बांधकाम या दृष्टीने त्याला अधिक महत्व दिले जावे आणि यापुढील अधिक काळजीपूर्वक जपले जावे असे वाटते. 


“उदक चालवावे युक्ती..” असे समर्थ रामदासांनी लिहून ठेवले आहे. ही गोष्ट आपल्या भरतखंडातील लोकाना हजारो वर्षे ठाऊक होती. जिथे पाण्याची उपलब्धता कमी आहे, जवळपास नदी नाहीये, पाऊस कमी असतो त्या त्या ठिकाणी भूजल जपणे आणि त्याच्या नीटस वापरासाठी उत्तम जलव्यवस्थापन निर्माण झाले. महाराष्ट्रातील तेर तर गुजरात मधील लोथल, धोलाविरा सारख्या प्राचीन शहरांच्या ठिकाणी झालेल्या उत्खननातून या गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या आहेत. सध्या महाराष्ट्रात मुख्यत: मराठवाडा आणि विदर्भात अनेकदा पावसाच्या लहरीपणाचा फटका बसतो आणि पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मात्र कित्येक शतकांपूर्वी इथे अशाच परिस्थितीला सामोरे जात तत्कालीन समाजव्यवस्थेने विविध प्रकारच्या बारव-बाव-पुष्करणी-तलाव- विहिरी यांची निर्मिती केली जी आजही बहुतांश ठिकाणी सुस्थितीत आहे. 

दुर्दैवाने गेल्या 70-80 वर्षात "घरात नळाने येणाऱ्या पाण्याच्या व्यवस्थेचे” आपण गुलाम बनल्याने जलव्यवस्थापनाचे हे अन्य देखणे प्रकार सध्या अतिशय दुर्लक्षित झाले आहेत. कित्येक ठिकाणी तर आपणच विहिरी, तलाव बुजवून त्यावर इमारती उभ्या केल्या. आजही देशभर असलेल्या असंख्य ठिकाणच्या प्राचीन विहिरी किंवा बारव पाहणे ही आपल्यासाठी अतिशय औत्सुक्याची गोष्ट असायला हवी. माझे मित्र Rohan kale, अमर रेड्डी यांनी गेली कित्येक वर्षे सर्वत्र फिरून stepwells google location mapping केले आहे. रोहनच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बारव संवर्धन मोहिमा सुरू झाल्या आहेत. पाऊस, नदी, धरणे यांच्याइतकेच या विहिरींचे महत्व आहे. आपण या विहिरी जपायला हव्यात असे वाटते. पर्यटन म्हणून जाण्यापेक्षा आपल्या पूर्वजांनी कमीतकमी साधन सामुग्री असताना हे सारे कसे घडवले याकडे आपण अधिक विचारपूर्वक पाहायला हवे. आपल्या पुढील पिढ्याना या गोष्टी आवर्जून दाखवायला हव्यात. त्यांच्या मनात याविषयी प्रेम, आपुलकी निर्माण होईल हे पाहायला हवे असे कळकळीने सांगावेसे वाटते.

-सुधांशु नाईक(9833299791)

2 comments:

  1. Atishay sundar n yatharth varnan. Lekhan shaili aavadali.

    ReplyDelete