marathi blog vishwa

Monday, 11 September 2023

दाटे कंठ, डोळीया पाझर...तुम्हांविण रस गोड नव्हे...

 #सुधा_म्हणे: दाटे कंठ, डोळीया पाझर... तुम्हांविण रस गोड नव्हे..!

11 सप्टेंबर 23 

माणूस जेंव्हा आयुष्यात अपार विपत्ती, कष्ट भोगतो तेंव्हा कित्येकदा जगण्याविषयी मनात कडवटपणा भरून राहतो. हे सगळे भोग, या सगळ्या आपदा, ही दुःख माझ्याच वाट्याला का असे वाटून कुढत राहतो, खंत करत राहतो. एखाद्या क्षणी मग तो सोबत असल्याची जाणीव होते. सगळे कष्ट, दुःखे संपून गेली असे वाटून जाते. तरीही मन जुने दिवस विसरू शकत नाही. इथे तुकोबांचे वेगळेपण दिसते. छान धंदा सुरू होता, घरी सुबत्ता होती मात्र दुष्काळाने पूर्ण वाताहत केली. ऐहिक आयुष्य नकोसे वाटत होते. सगळ्याचाच  उबग आलेला होता आणि अशा टप्प्यावर तुकोबाना त्यांची विठूमाऊली भेटली..!

विठ्ठलाची भेट झाल्यावर तुकोबा मागे वळून बघणे सोडून देतात. त्यांचे आयुष्यच विठ्ठलमय होऊन जाते. आयुष्यात अनेक दुःखे भोगल्यावर लाभलेला हा क्षण तुकोबा मग उत्कटतेने जगू पाहतात. त्या जिवलगाच्यासाठी तहानभूक विसरून जातात. इतकेच नव्हे तर यापूर्वीचे सारे जगणे, पाप पुण्य या सगळ्याचाच आता विसर पडू दे असे सांगताना म्हणतात,

दाटे कंठ लागे डोळियां पाझर । गुणाची अपार वृष्टी वरी ॥१॥

तेणें सुखें छंदें घेईन सोंहळा ।होऊनि निराळा पापपुण्यां ॥२॥

तुझ्या मोहें पडो मागील विसर ।आलापें सुस्वर करिन कंठ ॥३॥

तुका म्हणे येथें पाहिजे सौरस ।तुम्हांविण रस गोड नव्हे ॥४॥

ज्याची आपण अतिशय वाट पाहतो, तो विठ्ठल इतका मायाळू कनवाळू आहे की त्याच्या दर्शनाला आतुर होऊन कधी कंठ दाटून येतो, डोळे कधी पाझरु लागतात हेही कळत नाही.

“सुंदर ते ध्यान..” “लक्ष्मीवल्लभा.. दीनानाथा” किंवा गाथेतील सुरुवातीला असलेला “सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती..” अशा सुरेख अभंगामधून ते विठूमाऊलीची लोभस वर्णने करत राहतात. तसे करताना स्वतः अंतर्बाह्य सुखावत रहातात.

आपल्या विठ्ठलासाठी किती काय काय करू असे होऊन जाते त्यांना. सौरस म्हणजे इच्छा किंवा आसक्ती. अध्यात्माच्या वाटेवर चालताना, इच्छा त्यागावी, आसक्ती सोडावी असे मानले जाते तर इथे तुकोबा मात्र हे सारे मागून घेतात. आपल्या या जिवलग विठ्ठलाविना त्यांना काहीच गोड वाटत नाही. पापपुण्याच्या पार जाऊन त्याच्यात पूर्ण बुडून जाण्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी, त्याच्या गळामिठीसाठी, हा सोहळा अनुभवण्यास त्यांचे मन अधीर अधीर होऊन जाते. भक्ती- प्रीतीची ही अवस्थाच किती मनोरम असते ना ? तत्कालीन रूढी परंपरा याचे चटके तुकोबाना देखील सोसावे लागले. मात्र सगळ्याविरुद्ध कोणतेही आकांडतांडव न करता ते आपली वाट चालत राहिले. आपल्या इष्टदैवताची सतत आळवणी करत राहिले. त्याच्या अवचित होणाऱ्या दर्शनाने तर ते सुखावलेच पण असे सुखावतानाच, पुन्हा पुन्हा दर्शन मिळावे, त्याच्यात कायमचे एकरूप होता यावे ही आसक्ती बाळगत राहिले. तुझ्याशिवाय आता काहीच गोड लागत नाही त्यामुळे सदैव माझ्यासोबत रहा अशी आर्त साद पुन्हा पुन्हा घालत राहिले..!

-सुधांशु नाईक(nsudha19@gmail.com)




No comments:

Post a Comment