marathi blog vishwa

Thursday, 14 September 2023

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती...

#सुधा_म्हणे: जेथे जातो तेथे तू माझा सांगाती..

14 सप्टेंबर 23

विठ्ठलस्मरणी रंगून गेलेल्या तुकोबांना एक वेगळाच आत्मविश्वास लाभला. सावकारीच्या कीर्द खतावण्या तर त्यांनी नष्ट करून टाकल्या. ज्यांची कर्जे उरली होती ती माफ करून टाकली. सामान्य लोकाना हे सगळे मूर्खपणाचे वाटणे साहजिक होते. आपण आपला उद्योग व्यवसाय नीट करावा, तिथे अकारण भावनाशील होऊन चालत नाही असे जाणते लोक म्हणतात. आपला संसार, आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणे हे तर कर्तव्य असते असे मानले जाते. 

आपण अनेकदा म्हणतो, की हे सगळे मी केले, मी घडवून आणले पण प्रत्यक्षात सगळ्या गोष्टीत खरंच आपले फार काही कर्तृत्व त्यात असते का? यशाचे श्रेय जेंव्हा आपण स्वतःकडे घेऊ पाहतो त्यावेळी अपयश किंवा दुःख पदरात पडले की मात्र इतराना बोल लावतो. नशिबाला नावे ठेवतो. सुख दुःख एकाच न्यायाने आपण अनुभवले पाहिजे हे विसरतो. “सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ..” हे तर आठवतच नाही. जे स्थिरबुद्धी असतात, किंवा ज्याना आपल्या विचारातील चूक कळून येते ते तेवढे शहाणे होतात. काही जणांना ही समज जन्मजात येते तर काहीजणाना एखादी घटना घडून गेल्यावर. ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली. कुणी कधी जन्म घ्यावा, कुणाचे पालन पोषण कसे व्हावे, कुणाचा मृत्यू कसा असावा हे तर सगळे ईश्वर ठरवतो. प्रत्येकाला हे उमगतेच असे नाही.

आपले आयुष्य हे आपले नव्हे, हे तर सारे विठ्ठलाचे आहे. हे उमगल्यावर तुकोबांनी आपले जीवन जणू भंडाऱ्यासारखे उधळून दिले. त्या जिवलग विठ्ठलाची भक्ती आणि डोळे उघडल्याने जे काही ज्ञान लाभले आहे ते सर्वाना सांगून त्यांना शहाणे करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करणे..हेच त्यांनी आपल्या आयुष्याचे जणू ध्येय बनवले. केवळ स्वतःसाठी स्वार्थाने जगायचे नाकारले. 

तत्कालीन रूढी, रीतीरिवाज यांच्या बेड्या असल्यामुळे हे सारे दिसते तितके सोपे नक्कीच नव्हते. “वाण्याच्या तुक्या”ने धर्म बुडवल्याची हाकाटी जोरदार होत राहिली. तुकोबाना अनेक प्रकारे शारीरिक, मानसिक छळ सोसावे लागले. मात्र जेंव्हा तो आपल्या सोबत असतो, तेंव्हा कोणतेही त्रास सोसायचे बळ अंगी येते. ज्यातून सर्वाधिक आनंद लाभतो आहे त्याची किंमत खरच अनमोल असते. त्यामुळेच विठ्ठालाच्या सहवासात रमलेले, आत्मानंदात मग्न झालेले, सगळा भार विठ्ठलावर टाकून निःसंग झालेले तुकोबा मग विश्वासाने गात राहिले,

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती,

चालविसी हाती धरुनिया

चालो वाटे आम्ही तुझाची आधार

चालविसी भार सवे माझा….

बोलो जाता बरळ करीसी ते नीट

नेली लाज धीट केलो देवा

तुका म्हणे आता खेळतो कौतूके

जाले तुझे सुख अंतर्बाही…………..

जे काही स्फुरले ते ते तुकोबा लोकाना सांगत राहिले. आपल्या तोंडून उमटलेले बोल हे आपले नाहीत याची पक्की जाणीव असल्याने त्यांना कोणत्याही अहंकाराचा वारा स्पर्श करू शकला नाही. हाती गवसलेले हे अभंगाचे देणे तुकोबानी उत्तम वापरले आणि अंतर्बाह्य सुखी होऊन गेले. प्रत्येक व्यक्तीला ईश्वराकडून असे कोणते तरी देणे लाभत असते ज्यामुळे आयुष्य जगायला एक सुखाचा मार्ग गवसतो. तुकोबांना विठ्ठल भेटला आणि तुकोबा त्याचे होऊन गेले. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर अणूसमान असलेला तुका विठ्ठलाच्या स्पर्शाने आकाशाएवढा होऊन गेला...!

-सुधांशु नाईक(nsudha19@gmail.com)




No comments:

Post a Comment