#सुधा_म्हणे: गणेशोत्सव आणि शिक्षणविषयक उपक्रम...
29 सप्टेंबर 23
गणपतीला आपण विदयेची देवता मानतो. मात्र गणेशोत्सवात खूपच कमी प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबवलेले दिसतात. एकतर बहुसंख्य शाळांना/ कॉलेजला गणपतीत सुट्टी असते आणि मुलेही सुट्टीचा आनंद घेत असतात. त्यामुळे बहुतेकदा त्यांच्याकडे आपले दुर्लक्ष होत असते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने खरेतर कितीतरी उपक्रम करणे शक्य आहे.
गणपतीमध्ये फुले,पाने यांचे फार महत्व असते. विविध पत्री आणून त्यांचा पूजेत वापर होत असतो. या दरम्यान पाऊस होऊन गेलेला असल्याने रानात, डोंगरात अनेक प्रकारच्या वनस्पती उगवलेल्या असतात. मुलांना घेऊन अशावेळी डोंगरात, रानात जायला हवे. विविध चांगल्या वाईट वनस्पती, फुले हे सारे समजून द्यायला हवे. आपण फक्त मुलांना इंजिनियर, डॉक्टर किंवा आय टी इंजिनियर बनवण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यासोबत त्यांना आपले पर्यावरणदेखील समजाऊन दिले पाहिजे असे मला वाटते.
आपल्या गावी नदी, तलाव, ओढे
असतात. जवळपास एखाद्या गावी एखाद्या नदीचा उगम असतो. नदी कशी उगम पावते, तिचा
विस्तार कसा होतो, तीच्या आसपास जैवसाखळी कशी निर्माण होते, कोणते प्राणी, पक्षी,
कीटक नदीच्या, या जंगलांच्या सहवासात वाढतात हे सारे मुलांना शिकवायला हवे.
त्यातही निसर्गात हिंडून येणे शक्यतो सर्व मुलांना अवडतेच. त्यांना ही आवड आपणच
लावायला नको का ?
आपल्या गावात अनेक गरीब लोकांची वस्ती असते. तात्पुरती किंवा कायमचे झोपडे असणारी कित्येक माणसे असतात. वीटभट्टीवरील कामगार, बांबूच्या टोपल्या विणणारे कारागीर, कुंभार, भांडीवाले, लोहार आदि कित्येकजण आपल्याकडील पिढीजात उद्योगात कार्यरत असतात. त्यांच्याकडे जाऊन त्यांचे काम कसे असते, त्यांना त्यांच्या कामातून अधिकाधिक प्राप्ती कशी होईल याबाबत मार्गदर्शन करायला गणेश मंडलांनी पुढाकार घ्यायला हवा. यामुळे आपली मुले आणि या पालांवर किंवा झोपडीत राहणारी माणसे यांच्यात एक सहकार्यांचा बंध तयार होईल असे मला वाटते.
आपल्या आसपास असणाऱ्या गरीब
मुलांना, पुस्तके – वह्या, शाळेची बॅग, युनिफॉर्म आदि वस्तूंचे वाटप करणे यासारखी
कामे तर गणेशोत्सव मंडळे आवर्जून करू शकतात असे मला वाटते.
शेजारच्या गरीब घरात किंवा
झोपडपट्टीत जाऊन मुलांना कॉम्प्युटर शिकवणे, गणित-सायन्स सारख्या विषयाचे क्लास
घेणे असे उपक्रम गणेश मंडळाचे कार्यकर्ते नक्कीच करू शकतात. त्यांनी तशी योजना
जाहीर केली तर समाजातील इतर लोकसुद्धा सहकार्याचा हात नक्कीच पुढे करतील. समाजातील
दुफळी कमी होऊन अधिकाधिक एकात्मता वाढीस लागावी यासाठी हे आवश्यक आहे ना? तुम्हाला
काय वाटते ?
-सुधांशु नाईक (9833299791)
No comments:
Post a Comment