#सुधा_म्हणे: हाचि नेम आता न फिरे माघारी...
15 सप्टेंबर 23
पंढरीच्या भेटीनंतर तुकोबांचे जीवन पालटून
गेले. या जगाचे नीतिनियम, रूढी, परंपरा, समाजव्यवस्थेच्या काचणाऱ्या बेड्या, जीवघेण्या
चौकटी या सगळ्याच्या ते पार पलीकडे निघून गेले. आजवर त्यांनी ऐहिक जीवनाचा लाभ घेतला
होता. इथली सुखे जशी भोगली तशीच इथली दुःखे, अपमान सोसले. भरल्या घरात झालेले जन्माचे
सोहळे अनुभवले तसेच मृत्यूचे तांडवदेखील पहिले. ज्या क्षणी त्यांचे जीवन विठूमाऊलीच्या
कुशीत सामावले त्यावेळी त्याचे झाले. लौकिकार्थाने ते कित्येक दिवस लोकांच्यात
वावरत होते, वारीला जात होते. जमेल तसे आपल्या घरी दारी सर्वांशी भेटत बोलत होते
मात्र अंतर्यामी ते केवळ आता विठूरायाचे उरले होते. इथल्या या ऐहिक जगण्याची त्यांची
ओढ पूर्ण संपून गेली. त्या सावळयाने जबरदस्तीने मला त्याचे बनवून टाकले आहे. त्याच्याविना
आता राहवत नाही असे त्यांच्या तोंडी असलेले उद्गार हेच जणू सांगत आहेत. देव-भक्त हे
द्वैत संपवून टाकणारे असे हे अद्भुत नाते.
आणि मग त्यांच्या मनाचा मग निश्चय झाला या
इहलोकापासून दूर जायचे. आईबाप, बंधु बहीण, पत्नी –पुत्र सगळे सगळे आता केवळ
विठ्ठलमय. सदैव पांडुरंगाच्या सोबत राहण्याइतके सुख दुसऱ्या कशातूनच लाभू शकत नाही.
आता कोणतेही दुसरे सुख नकोच. त्याच्या लोकी असण्याची ती अनुभूती न्यारी. तिथे कुणी
दुस्वास करणारे नाही. कुणी संतापणारे नाही. कुणी मोहात पाडणारे नाही. ते जगच
वेगळे. लोभ, मोह, दंभ, मत्सर, काम आणि क्रोधाच्या पलीकडे असलेले. तिथली प्रगाढ
शांतता, तिथली स्थिरता, तिथे राज्य करणाऱ्या त्या विठ्ठलाचे शांत साजिरे रूप,
चेहेऱ्यावर विलसणारे ते मंद स्मित हे सारेच इतके भुलावणारे आहे की तिथे जाण्याची
ओढ वाटली नसती तरच नवल. “जागून ज्याची वाट पहिली ते सुख आले दारी..” अशीच तर ही
अवस्था..!
त्याच्यासोबत जाणे आता अगदी नजरेच्या टप्प्यात आले. इथून आता पुढेच जात राहायचे. मागच्या जन्माचे सगळे बंध आता सुटले. त्या महान विठ्ठलाची साथ मिळाली मग आता कसले दुःख.. असे सांगताना शांतचित्त तुकोबा समाधानाने सांगू लागतात,
हाचि नेम आतां न फिरें माघारी । बैसलें
शेजारीं गोविंदाचे ॥१॥
घररिघी जालें पट्टराणी बळें । वरिलें सांवळें
परब्रम्ह ॥२॥
बळियाचा अंगसंग जाला आतां । नाहीं भय चिंता
तुका म्हणे ॥३॥
सगळ्या भय, चिंता दूर झाल्या. इथल्या जगाचे सारे पाश सैल झाले. मन त्या जिवलग विठठलापाशी जायला आतुर झाले. त्यांच्या निश्चयी मनाने ठरवले की आता पुन्हा माघारी येणे नाही..!हे सारे आपल्या मन:पटलावर पाहताना आपलाच गळा भरून येतो,शब्द सुचेनासे होतात आणि डोळे कधी ओलावतात हे खरच कळत नाही..!
( सोबतचे सुरेख चित्र रोहन हळदणेकर यांनी रेखाटलेलं. नेटवरून साभार.🙏🏻)
-सुधांशु नाईक(nsudha19@gmail.com)
सुरेख शब्दांकन
ReplyDeleteधन्यवाद सर !
Delete