marathi blog vishwa

Saturday, 16 September 2023

याचसाठी केला होता अट्टहास...

#सुधा_म्हणे: याचसाठी केला होता अट्टहास..

16 सप्टेंबर 23

आयुष्यभर आपण एखाद्या गोष्टीची अत्यंत अधीरतेने वाट पाहतो. ती गोष्ट साध्य व्हावी यासाठी सदैव खटपट करतो. कित्येक कष्ट, दुःख सगळे काही सहन करतो. अत्यंत चिकाटीने आपल्या ध्येय, उद्दिष्टांशी बांधील राहतो. येन केन प्रकारेण सगळे काही घडून यावे म्हणून आयुष्य पणाला लावतो. ज्यावेळी आपल्याला हवे तसे घडते तेंव्हा एक समाधान अंतर्बाह्य भरून राहते. अवघ्या कष्टांचे सार्थक झाल्यावर कृतकृत्य वाटते. तुकोबानी विठ्ठलाचे प्रेम लाभावे यासाठी जीव पणाला लावला. तहान भूक आदि देह जाणिवांशी त्यांनी जणू युद्ध पुकारले. विठू माऊलीच्या कृपेसाठी, दर्शनासाठी त्यांचे तन मन आर्तपणे साद घालत राहिले. जोवर ती दिसत नव्हती, लाभत नव्हती तोवर त्यांचे मन अत्यंत अस्वस्थ होऊन गेले. आणि ज्या क्षणी तिची गाठभेट झाली तेंव्हा सगळे संदेह निमाले. त्यांच्या चित्तवृत्ती निश्चिंत झाल्या. 

तिच्या पायी विसावा लाभला. तुकोबा खूप परिणामकारक शब्दात हा सगळा अनुभव सांगताना लिहितात,

याजसाठी केला होता अट्‍टहास ।

शेवटचा दिस गोड व्हावा ॥१॥

आता निश्चितीनें पावलों विसांवा ।
खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥२॥

कवतुक वाटे जालिया वेचाचें ।
नांव मंगळाचे तेणें गुणें ॥३॥

तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी ।
आतां दिवस चारी खेळीमेळी ॥४॥

हेचि येळ देवा नका मागें घेऊं ।
तुह्मांविण जाऊं शरण कोणा ॥१॥

“तुका म्हणे मुक्ती परिणीली नोवरी..” किती वेगळा आहे हा विचार..! लग्न कुणासोबत तर चौऱ्यांशी लक्ष योनीच्या दीर्घ प्रवासातून सोडवणाऱ्या त्या मुक्तीसोबत. तिच्याशी आता संग झाला. लग्न लागले. सगळे विश्व आनंदमय झाले. तुका त्या विठूमाऊलीचा झाला. इथला उरला नाही. हे सांगताना त्यांच्या शब्दा-शब्दांतून एक तृप्ती भरून उरली आहे असे जाणवते. आधी जाणवणारी अस्वस्थता आता उरली नाही हे जाणवते. कारुण्याने भरलेले, आर्त साद देणारे तुकोबा शांत झाले. मनाची आंदोलने उरली नाहीत. आनंदांचे डोही आनंद तरंग अशी ही अवस्था. तीही कधी तर आयुष्याचे शेवटचे क्षण अनुभवताना..! मृत्यूची तर भीती उरलीच नाहीये कारण या शेवटच्या क्षणी त्यांची विठूमाऊली सोबत आहे. तरीही ते तिला म्हणतात, विठूमाऊली तू यावेळी माघार घेऊ नको, तुझ्याविण मला दुसरे कुणी नाही. सगळ्या इच्छा, वासना, तृष्णा शांत झाल्या. 

आता एकच मागणे उरले की तुझ्या सान्निध्यात असताना हा शेवटचा दिस गोड होऊ दे. तुकोबा आपल्याच तंद्रीत नाचत राहतात.. गात राहतात. आकाशाएवढे होत जातात..!

-सुधांशु नाईक(nsudha19@gmail.com)



No comments:

Post a Comment