marathi blog vishwa

Friday, 25 August 2023

दळिता कांडिता तुज गाईन अनंता...

 #सुधा_म्हणे: दळिता कांडिता तुज गाईन अनंता..

25 ऑगस्ट 23

नामदेवांच्या घरी राबणारी एक साधी बाई म्हणजे जनाबाई असे सर्वसामान्यांना त्याकाळी वाटत असे. तिची विठ्ठलासोबतची सख्यभक्ती सर्वाना थोडीच उमजणार होती ? त्यांनी तर तिला वेडी ठरवले होते.

आपण दिवसभर कित्येक कामे करत असतो. प्रत्येकवेळी त्यात आपला अहम आडवा येतो. हे मी करतोय, ते मीच करू शकतो, मी असा, मी तसा इत्यादि.. आणि मग अहंकार आणि प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनामध्ये आपण गुरफटून जातो. जनाबाईंच्या जगण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या आयुष्यातून हा अहंकार कायमच दूर होता. आपल्या नशिबी असलेले ते जगणे, त्यातली सुखे दुःखे सगळे काही त्या विठ्ठलाचे असे मनाशी ठाम ठरलेले होते. त्यानुसार त्यांचे राहणे, वागणे असे. 

धान्य निवडणे, दळणे, घराची स्वच्छता, परिसराची स्वच्छता, शेण गोळा करून गोवऱ्या तयार करणे अशी त्या बाईसाठी जी जी कामे होती ते सारे करताना मुखी विठ्ठलाचे नाव असायचे. आई बाप, बंधु सगळे काही त्या सख्या पांडुरंगामध्ये सामावून गेले होते. दुसरे कुणी त्यांना आता नकोच होते. केवढी ही एकरूपता..! म्हणूनच जेंव्हा जनाबाई असे म्हणतात,

दळिता कांडिता । तुज गाईन अनंता ॥१॥
न विसंबे क्षणभरी । तुझे नाम ग मुरारी ॥२॥
नित्य हाचि कारभार । मुखी हरि निरंतर ॥३॥
मायबाप बंधुबहिणी । तू बा सखा चक्रपाणी ॥४॥
लक्ष लागले चरणासी । म्हणे नामयाची दासी ॥५॥

एक अशी कथा सांगितली जाते की जनाबाईंची वाढती लोकप्रियता एकदा संत कबीर यांच्या कानी पडली. ते शोध घेत पंढरपुरी पोचले. वेशीजवळ त्यांनी पाहिले की दोन बायका कडाडून भांडत आहेत. शेणाच्या गोवऱ्यातील ढिगामधल्या आपल्या वाट्याच्या गोवऱ्या किती यावर त्यांचे भांडण सुरू होते. त्यांनी त्यांच्याकडे जनाबाईची चौकशी केली. तेंव्हा त्यातील एक बाई म्हणाली, “मीच जनाबाई.. बोला महाराज काय काम तुमचे? इथे ही बाई उगीच माझ्याशी भांडते आहे, मी तिच्या गोवऱ्या चोरल्या म्हणते आहे, आणि माझ्याच गोवऱ्या तिने घेतल्या आहेत. त्याचा निवाडा करा आता तुम्ही.” कबिराना क्षणभर वाटले की मी बहुदा चुकीची माहिती ऐकली हिच्याविषयी. ही तर एक सर्वसामान्य भांडकुदळ स्त्री दिसते आहे. मग ते म्हणाले, “ शेणाच्या गोवऱ्या या शेणाच्या. तुम्ही दोघीनी किती बनवल्या हे मी कसे सांगणार ?”

मग पटकन जनाबाई उद्गारल्या, “महाराज, जरा त्या गोवऱ्या कानाला लावून पहा. ज्यामधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज ऐकू येईल त्या माझ्या..!” आणि क्षणात कबिरांच्या लक्षात आले की त्यांचे विचार किती चुकीचे होते. या बाईचे अवघे आयुष्यच विठ्ठलमय होऊन गेले आहे. जळी स्थळी, काष्ठी, खाता पिता, जेवता झोपता तिला आपला सखा दिसतो आहे. जनाबाई पूर्णपणे केवळ विठ्ठलरूप होऊन गेली आहे. ज्यावेळी जगण्याच्या प्रत्येक क्षणी आपल्याला समोर आपले प्रेयस दिसत राहते ते खरे प्रेम. एखाद्याला पूर्ण समर्पित होण्याचे असे उदाहरण दुर्मिळच. अशा समर्पणासमोर आपण फक्त नतमस्तक होऊन जातो.

-सुधांशु नाईक(nsudha19@gmail.com)



No comments:

Post a Comment