marathi blog vishwa

Thursday, 24 August 2023

जनी म्हणे बा गोपाळा...

 #सुधा_म्हणे: जनी म्हणे बा गोपाळा.. करी दुबळीचा सोहळा..

24 ऑगस्ट 23

महाराष्ट्रातील यादवांची राजसत्ता 13/14 व्या शतकात उद्ध्वस्त झाली आणि इथले समाजजीवन एका भयानक वादळात आक्रंदत राहिले. देव, देश, धर्म सगळीकडेच भयाण परिस्थिती. कुणाकडे पाहून जगायचे, कसे जगायचे किती सोसायचे अशी अवस्था काही प्रमाणात सुसह्य केली ती संतांनी.

अशा संतांमध्ये सर्व जाती-जमातीतले, सर्व स्तरातील लोक होते. त्यातच एक होत्या जनाबाई. “मी पाणी भरायला निघाले, विठोबा सोबत आला.., मी गोवऱ्या थापायला निघाले, विठोबाने मदत करायला सुरुवात केली..” असे आपल्या रोजच्या सगळ्याच कृतीमध्ये जनाबाईला विठोबा दिसत असे. जेंव्हा आपण एखाद्या व्यक्तीसोबत एकरूप होतो तेंव्हा रोजच्या जगण्यातील प्रत्येक क्षण त्याच्यासोबत घालवावा असे वाटते. जनाबाईंचे अभंग याच सख्यभक्तीचे उत्तम उदाहरण बनून जातात. विटेवर उभा असलेला समचरण असा विठ्ठल जनाबाईचा सखा झाला. दास्यभक्ती, सख्यभक्तीचे सुरेख दर्शन म्हणजे जनाबाईंचे अभंग.

आई मेली बाप मेला । मज सांभाळीं विठ्‌ठला ॥१॥

हरीरे मज कोणी नाहीं । माझी खात असे डोई ॥२॥
विठ्‌ठल म्हणे रुक्मिणी । माझे जनीला नाहीं कोणी ॥३॥
हातीं घेउनी तेलफणी । केंस विंचरुन घाली वेणी ॥४॥
वेणी घालुन दिधली गांठ । जनी म्हणे चोळ बा पाठ ॥५॥
जनी म्हणे बा गोपाळा । करी दुबळीचा सोहळा ॥६॥

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे त्यांचे मूळ गाव. त्यांच्या वडिलांनी लहानपणी नामदेव शिंपी यांच्याकडे कामे करण्यासाठी तिची पाठवणी केली आणि नामदेवांच्या घरील विठ्ठलभक्ती जनाबाईंच्या तनामनात उतरली. सकाळी उठल्यापासून घरी-दारी राबणाऱ्या जनाबाईंच्या ओठी अखंड विठ्ठलनाम होते. आपल्याला विठ्ठलाशिवाय कुणी नाही या भावनेने त्या जगल्या. विठ्ठल त्यांच्यासाठी सर्वकाही होता. लहानमोठी कामे करणे असो की स्वतःची वेणी घालणे असो, केलेली प्रत्येक कृती त्या विठ्ठलाला समर्पित करत होत्या. तो सहचर आहे या भावनेने, वात्सल्याने आपल्या रचनेतून सांगत राहिल्या. जेंव्हा हवासा सहचर सोबत असतो तेंव्हा आयुष्यातील दिवस शांत सुंदर होऊन जातो. म्हणूनच त्यांच्या अभंगाला एकत्र सहजीवन असताना लाभणाऱ्या त्या शांतीचा स्पर्श आहे असे मला वाटते. सगळे त्रास सोसायची ताकद हे सहजीवन देते. 

जनाबाईंचे सहजीवन विठ्ठलासोबत आहे. आपल्या घरासाठी, संसारासाठी राबणाऱ्या स्त्रीला केवळ प्रेमाचा सहवास हवा असतो, आपल्या कामात अल्प का असेना सहभाग देणारा साथीदार हवा असतो. विठ्ठलासारखा दिव्य सखा लाभल्यावर जनाबाईंचे आयुष्य धन्य होऊन गेले. अवघे दुबळेपण सरले नसते तरच नवल होते.

-सुधांशु नाईक(nsudha19@gmail.com)



No comments:

Post a Comment