#सुधा_म्हणे: चोखा म्हणे ऐसी कनवाळू माऊली…
30 ऑगस्ट 23
आयुष्यात जेंव्हा आपण खूप काही
सोसतो तेंव्हा एकतर स्वभावात एक कडवटपणा येतो किंवा आपण पूर्णत: समाजाशी फटकून
वागतो. कधी स्वतःला एका कोषात बंद करून घेतो किंवा सतत जमदग्नीचा अवतार धारण करून
लोकांवर चिडचिड करत बसतो. अशी वागणारी माणसे मग त्यांच्या अशा वर्तणूकीचे समर्थन
देत बसतात. अन्य कुणाच्या चुकीमुळे त्यांना काहीतरी सोसावे लागले हे जितके खरे
असते तितकेच त्यांच्या आयुष्यात चांगले वाईट क्षण येणे हे त्यांचे प्राक्तनदेखील
असते. असे समजून घेऊन जे स्तुति-निंदा-मान-अपमान शांतपणे सोसतात तेच खरे संत. गीतेमध्ये
12व्या अध्यायात स्थिरबुद्धी व्यक्तीची लक्षणे सांगताना श्रीकृष्णाच्या तोंडी एक
श्लोक आहे;
“समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः।
शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गाविवर्जितः॥
तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित्।
अनिकेतः
स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः॥
ज्याना हे सर्व तोंडपाठ असते त्यातील फारच थोड्या व्यक्तींनी हे अंगी बाणवलेले असते. तथापि वेद, संस्कृत ग्रंथ या संगळ्यापासून ज्याना वंचित ठेवले गेले त्या चोखोबासारख्या संतांच्या रक्तात हे तत्वज्ञान आधीच उतरले होते.
आयुष्यात अत्यंत मानहानी, कष्ट, वंचना असे सगळे सहन करावे लागून देखील चोखोबा शांत, सात्विक राहिले. प्रसंगी अत्यंत चिडण्याचा त्यांना हक्क होता इतका त्रास त्यांनी आणि कुटुंबियानी सोसला. तरीही ते आणि त्यांचे कुटुंब देवभक्तीमध्ये रमून जाताना सगळा त्रास विसरले. त्यांची एखादी रचना अशी समोर येते की चोखोबांचे प्रेमळ दर्शन होत रहाते. या रचनेत किती मायेने ते लिहीत आहेत;
भाविकांच्या लोभा होऊनी आर्तभूत
। उभाचि तिष्ठत पंढरीये ॥१॥
काय करों प्रेम न कळे या देवा ।
गुंतोनिया भावा राहे सुखें ॥२॥
वर्ण अभिमान न धरी कांही चाड ।
भक्तिसुख गोड तयालागीं ॥३॥
चोखा म्हणे ऐसी कनवाळु माउली ।
कृपेची साउली दीनां करी ॥४॥
पंढरीला लोक दर्शनाच्या ओढीने
जातात हे तर सर्वाना ठाऊक. इथं मात्र भक्तांच्या भेटीसाठी लोभावलेला विठ्ठल तिष्ठत
उभा आहे ही कल्पनाच किती सुंदर..! जर भक्त नसते तर देवाला कोण विचारणार अशीच
अवस्था झाली असती. वर्ण – जाती भेद न मानता भक्तीसुखाला आसावलेला हा विठ्ठल फार
सुंदर दिसतो त्यांच्या नजरेला..! लोकांच्या भाबड्या भक्तीमध्ये गुंतलेला, सर्वांवर
कृपाछत्र धरणारी ही विठूमाऊली इतकी कनवाळू आहे असे फार मायेने ते सांगत राहतात. ज्यावेळी
सतत दुःख, अवहेलना सोसावी लागते आहे, मनात खदखद आहे, त्यावेळीही ते देवाला बोल लावत
नाहीत.
“विठ्ठल खूप कनवाळू आहे, भावाचा
भुकेला आहे.. समतत्व मानणारा आहे..” हे सारे ऐकायला फार गोड आहे. मात्र सुखात राहणाऱ्या
इतर कुणीही असे सांगणे वेगळे आणि ज्या व्यक्तीला दिवसातील बहुतांश वेळ लोकांच्या
कडून त्रास सोसावा लागे त्यांनी सांगणे वेगळे. उदंड काही सोसूनदेखील आपल्या चित्ती
समाधान बाळगणारे, सर्वांप्रती प्रेमभावना बाळगणारे चोखोबा म्हणूनच अपार वंदनीय
होऊन जातात.
उत्तमम
ReplyDelete