marathi blog vishwa

Sunday 13 August 2023

एक सुरेख अनुभव देणारं कायावरोहण!

#सुधा_म्हणे :एक सुरेख अनुभव देणारं कायावरोहण! 
मंदिरे आपल्याला सर्वत्र दिसतात पण एखादं स्थान अचानक आपल्याला माहिती होतं, वाटेत सापडतं आणि अतीव आनंद देऊन जातं.
वडोदराला आल्यापासून आसपासच्या परिसरात मित्रांसोबत दर सुट्टीच्या दिवशी भटकंती सुरु आहेच. नर्मदेकाठी, कमी गर्दीची विविध ठिकाणं शोधून भटकून येत असताना आज अचानक वाटेत हे "कायावरोहण" नावाचं छोटं गाव लागलं. येथील  विस्तीर्ण असा मंदिर परिसर पाहताक्षणीच आपल्याला मोहवतो. प्राचीन मंदिर पूर्ण भग्न झाल्यामुळे नवीन मंदिर काही दशकांपूर्वी निर्माण करण्यात आले.
भगवान शंकरांचा 28 वा अवतार आणि 2ऱ्या शतकातील पाशुपत संप्रदायाचे संस्थापक म्हणून लकुलीश यांना मानले जाते. त्यांचा जन्म या कायवरोहण गावी झाला आणि इथल्या ब्रहमेश्वराच्या मंदिरातील शिवलिंगात ते विलीन झाले असे भाविक मानतात. इथं प्राचीन मंदिर होते.  काळाच्या ओघात, गझनीच्या महंमदाच्या आक्रमणात 1000 ते 1100 या काळात इथल्या अनेक मंदिरांचा विध्वन्स झाला त्यात हेही होते. आता मात्र मंदिराचा जीर्णोद्धार सुबकपणे करण्यात आला आहे. 
मंदिरावरील शिल्पाकृती प्राचीन शिल्पकलेचा वारसा पुढे नेणाऱ्या आहेत. देवशाखा, पुत्रवल्लभा अशी देखणी शिल्पे मंदिराच्या भिंतीवर आहेत. त्यातील शिव पार्वतीचं एक शिल्प तर इतकं जिवंत भासते, ते देखणं आहे की आपली नजर खिळून रहाते.
इथल्या परिसरात इतकी शिव मंदिरे होती की कुठेही जरा जास्त खोदकाम केले की एखादं शिवलिंग सापडतेच. ASI ( archeological survey of India ) नें आसपास सापडलेल्या भग्न मूर्ती, शिवलिंग यांचं छोटेसे संग्रहालय मंदिरापासून सुमारे 1 किमी अंतरावर उभे केले आहे. तेही अवश्य पाहावे असे. शैव आणि शाक्त पंथीय साधकांसाठी चौसष्ट योगिनी महत्वाच्या मानल्या जातात.
त्यापैकी ब्राह्मी, चामुंडा, वाराही, कौमारी आदिच्या भग्न मूर्ती इथं पाहायला मिळतात. परशुरामाची प्राचीन भग्न मूर्ती देखील इथं पाहायला मिळते.
हे सगळं दिवसभराच्या भटकंतीनंतर संध्याकाळी इतकं सहज समोर आलं की आम्ही थक्क होऊन गेलो.! सोबतची काही क्षणचित्रे तुम्हांला याची लहानशी झलक देतील असे वाटते.
आजकाल मंडळी  फिरत फिरत सरदार सरोवर, स्टॅचू ऑफ युनिटी वगैरे पाहायला मोठया संख्येने येतात. मुख्य वाटेपासून जवळपास अशी अनेक ठिकाणं देखील त्यांनी अवश्य पाहावीत असं आवर्जून सुचवावेसे वाटते.
- सुधांशु नाईक (9833299791)🌿
( इथं कसं जायचं - भरूच ते वडोदरा मार्गांवर वडोदराच्या 20 किमी आधी पोर नावाचे गाव लागते. तिथून आतमध्ये 9 किमी वर कायवरोहण आहे. इथूनच पुढे 15-20 किमीवर "दिवेर नि मढी" येथील नर्मदेचं विस्तीर्ण पात्र पाहण्यासारखे आहे. )

No comments:

Post a Comment