#सुधा_म्हणे: विमोह त्यागुनी कर्मफलांचा..
23 ऑगस्ट 23
कृष्ण. बाळलीलामध्ये
रमलेला किंवा राधेसोबत प्रेमरंगी रंगलेला किंवा मग थेट भगवान, ईश्वराचा अवतार
म्हणून भक्तिरसाने भिजलेला असाच आजवर जास्त चित्रित केला गेला आहे. गीतेमधील कृष्ण
सांगताना देखील आपण त्याला ईश्वर म्हणून दाखवतो. कृष्णाचे कर्तव्यकठोर, स्ट्राटेजिस्ट
आणि मोटिवेशनल स्पीकर असे रूप मात्र खूप कमी लोकानी आपल्या साहित्यातून चित्रित
केले आहे. कर्तव्य करताना कृष्णदेखील कायम कर्तव्यकठोर असाच वागला आहे. एकीकडे
राधेच्या, गोपीच्या, रुक्मिणी-सत्यभामेच्या प्रेमात हळुवार झालेला कृष्ण प्रसंगी
कर्तव्य पूर्ण करण्यासाठी इतका कठोर बनतो की तोच हा आहे का असा प्रश्न पडावा.
त्यातही तो नुसते उपदेश सांगत बसत नाही तर “आधी केले आणि मग सांगितले..” असे
वागणारा आहे.
कृष्णाने स्वतः जिथे काहीतरी प्रत्यक्ष घडवून दाखवले अशी पराक्रमाची कित्येक उदाहरणे आहेतच. कंस, नरकासुर, कालयवन, पूतना, कालियामर्दन, शिशुपाल वध आदि ठिकाणी तो leading by example या मॅनेजमेंटच्या तत्वाप्रमाणे वागून एक आदर्श इतरांसमोर ठेवतो. मात्र म्हणून प्रत्येक वेळी सगळ्या लढाया तो स्वतः लढत नाही. जिथे राजकारणाची गरज आहे, अन्य कुणामार्फत कार्य घडवून आणायचे आहे तिथे त्यानुसार मदत घेतो. कौरव पांडव युद्ध तर केवळ कृष्ण आणि द्रौपदीमुळेच घडले असं सांगितले तर चूक ठरणार नाही. दुर्योधनाला, दुःशासनाला मारणे ही खरेतर कृष्णासाठी क्षुल्लक गोष्ट होती. पण त्याने तसे केलेले नाही.
शिष्टाईसाठी गेलेला कृष्ण अत्यंत धूर्तपणे हे युद्ध घडेल अशा पद्धतीने काम करतो. एकदा युद्ध नक्की झाल्यावर स्वतः तटस्थ राहून केवळ सारथ्य करायचे ठरवतो. हे सगळे युद्ध पांडवांकडून घडवून घेतो. आणि म्हणूनच कवीश्वर यांच्या गीतातील कृष्ण जेव्हा;
विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था,
कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था..
असे म्हणतो तेंव्हा त्यातील प्रत्येक शब्दाला शस्त्रांची
धार आलेली असते.
मनोहर कवीश्वर यांनी लिहिलेले हे गीत म्हणजे कर्तृत्ववान
आणि उत्तम मार्गदर्शक असलेल्या कृष्णाच्या आयुष्याचे जणू सार आहे. हे संपूर्ण गीत
उत्तम आहेच मात्र या पुढील ओळी मला सर्वात जास्त भावतात. रंगहीन मी या
विश्वाच्या, रंगाने रंगलो
कौरवांत मी पांडवांत मी, अणुरेणूत भरलो
मीच घडवितो मीच मोडितो, उमज आता परमार्था..
“न धरी शस्त्र करी मी, सांगेन गोष्टी युक्तीच्या चार..” असे
वारंवार बजावणारा कृष्ण विचारांचा एकदम पक्का आहे. ही तुझी लढाई आहे, तुलाच लढायची
आहे असे सांगतानाच आपण सगळ्यात असूनही संगळ्याच्या पलीकडे असल्याचे दर्शवत राहतो.
त्याच्यासाठी हे विश्वच रंगहीन आहे. प्रेम, वात्सल्य, मित्रता, स्नेह, शत्रुत्व
अशा सगळ्या रंगात रंगून गेलेल्या कृष्णाचे हेच खरे रूप. आपले आयुष्य कसे असायला
हवे याचा तो वास्तूपाठच देतो.
आपल्याला असे भासते की कृष्ण त्या गोकुळातील मित्रांच्यात रमलाय, यशोदेच्या – कुंतीच्या वात्सल्यात आनंदलाय, राधेच्या प्रेमात रंगलाय, पांडवांचा सखा आणि हितचिंतक बनलाय, द्रौपदीच्या स्नेहधाग्यात गुंतलाय, विदुराच्या सात्विक भक्तीत बांधला गेलाय.. पण तरीही तो कायम सगळ्यापार उभा आहे असे मला जाणवते. सगळ्या गोष्टी भोगणारा तरीही कशातही अडकून न पडलेला कृष्ण. इतकेच नव्हे तर एक मोठे यादवकुल त्याने निर्माण केले. पण प्रभासतीर्थी जेंव्हा सगळे मद्यधुंद होऊन आपापसात मारामारी करून एकमेकांचा जीव घेत होते तेंव्हा तो शांतपणे त्यातून बाजूला होता. आपल्याच कुळाचा विनाश तटस्थपणे पाहत राहणारा एक स्थितप्रज्ञ !
घरात आणलेली एखादी वस्तू जुनी झाल्यावर सुद्धा लोकाना त्यागता येत नाही. नैवेद्याच्या लहानशा वाटीपासून घर- गाडी सारख्या मोठ्या वस्तूमध्ये मन गुंतवून बसलेली आपण माणसे. नात्याच्या अनेक गुंतागुंती माहिती असूनही विविध नात्यांच्यात स्वतःला आनंदाने गुंतवून घेणारी आपण माणसे. त्यामुळेच कृष्णाचे हे सगळ्यात असूनही सगळ्यातून अलिप्त असणे उमगायला अवघड आहे. चिकट अशा फणसाच्या गऱ्यात सहजपणे आठळी बसलेली असते. सगळ्यात असूनही त्या फणसाच्या आठळीच्या अंगाला काहीच चिकटलेले नसते. कृष्ण असाच आहे. आजचा क्षण मुक्तपणे साजरा करणारा, आणि प्रसंगी सगळ्यातून क्षणात बाहेर पडून जगाकडे पाठ फिरवून कठोरपणे दूर एकाकी राहणारा..!
कर्तव्य कठोर आयुष्य जगणारा कृष्ण जेंव्हा “मीच घडवितो, मीच मोडितो..” असे म्हणत ओठाशी
बासरी धरून वेगळीच धून वाजवत आकाशापेक्षा मोठा होत जातो, तेंव्हा त्याचं ते रूप पाहून आपण थक्क होऊन
जातो. त्याची वेगवेगळी रुपे आपल्याला खुणावतात. आवडत राहतात. तो मात्र सगळ्यात
असूनही तिथून केव्हाच दूर निघून गेलेला असतो.
-सुधांशु नाईक(nsudha19@gmail.com)
No comments:
Post a Comment