marathi blog vishwa

Monday, 28 August 2023

चोखा म्हणे मज नवल वाटते...

 #सुधा_म्हणे:चोखा म्हणे मज नवल वाटते...

28 ऑगस्ट 23

समाजातील भेदाभेद यामुळे आपल्याकडे लाखों लोकानी दुःख, दारिद्र्य, वंचना अपमान भोगले. चोखोबा त्यातलेच एक होते. अत्यंत विचारशील, तत्वनिष्ठ असलेल्या चोखोबांच्या जातीमुळे सर्वत्र त्यांना विटाळ मानले गेले. जातीने महार असलेले चोखोबा, त्यांची पत्नी सोयराबाई, मुलगा कर्ममेळा आणि मेहुणा बंका महार या सगळ्यांच्या भक्ती रचना उपलब्ध आहेत. ज्यावेळी ज्ञानेश्वरांनी पंढरपूरमध्ये सर्व जाती जमातीच्या लोकाना सामावून घेत एक प्रकारची आध्यात्मिक समरसता निर्माण करायचा यशस्वी प्रयत्न केला तेंव्हा त्यात नामदेव,जनाबाई, यांच्यासोबत चोखोबा देखील होतेच. 

नामदेवांच्याकडून त्यांना गुरुपदेश मिळाला असे मानले जाते. असे असले तरी त्यांच्या यातना, कष्ट अपार होते. समाजात शूद्र, अतिशूद्र म्हणून हिणवले जाई. तथाकथित उच्च-नीच विचारांच्या बेड्या सतत काचत राहत. एकीकडे म्हणायचे की सगळी ईश्वराची लेकरे आणि दुसरीकडे मात्र जात-धर्म, पंथ, वंश आदि गोष्टींसाठी भेदभाव करत राहायचे. माणसे माणसाशी माणसासारखे वागत नाहीत याची अनेक उदाहरणे आपण आसपास कायम पहात आलो. चोखोबा त्यातील एक ठसठशीत उदाहरण होते. 

त्यांना जे सोसावे लागत होते त्याविरुद्ध आवाज उठवणे देखील अशक्य अशी त्यात काळातील ती भयाण परिस्थिती. मात्र अत्यंत संयमित भाषेत जेंव्हा ते म्हणतात,

पंचही भूतांचा एकचि विटाळ । अवघाचि मेळ जगीं नांदे ॥१॥

तेथें तो सोंवळा वोंवळा तो कोण । विटाळाचें कारण देह मूळ ॥२॥

आदिअंती अवघा विटाळ संचला । सोंवळा तो झाला कोण न कळे ॥३॥

चोखा म्हणे मज नवल वाटतें । विटाळा परतें आहे कोण ॥४॥

तेंव्हा खाडकन कुणीतरी एक चपराक लगावली आहे असे भासते. माणसे माणसाशी वागताना किती प्रकारचे भेद पाळतात. स्त्री पुरुषात भेद केला जातोच. पण स्त्री-स्त्री मध्ये देखील निपुत्रिक, विटाळशी, विधवा अशा स्त्रियांना आजदेखील अनेक ठिकाणी अपमानास्पद वागवले जाते मग 800 वर्षांपूर्वी काय अवस्था असेल याचा विचारदेखील करवत नाही. 

सगळ्यांचा जन्मच मुळी विटाळामधून होतो, सगळ्यांची शरीरे एकसारखी मग हा भेदाभेद का? असे पोटतिडिकेने विचारलेल्या प्रश्नामुळे आपलाच जीव घुसमटून जातो. एका सज्जन माणसाला जे भोगावे लागले त्याची खंत वाटत राहते.

-सुधांशु नाईक( nsudha19@gmail.com)



1 comment: