marathi blog vishwa

Saturday, 12 August 2023

प्रभू मेरे अवगुण चित ना धरो..

 #सुधा_म्हणे:  प्रभू मेरे अवगुण चित ना धरो..

12   ऑगस्ट 23

संत सूरदास हे एक वेगळेच व्यक्तिमत्व. आणि त्यांचे दोहे याची ख्याती फार मोठी. सूरसागर, सूर स्वरावली, साहित्य लहरी या त्यांच्या ग्रंथातील अनेक पदे, दोहे आजही उत्तर भारतात सर्वत्र गायले जातात. कृष्ण आणि राधेच्या प्रेमाबंधाविषयी त्यांची पदे आहेतच पण त्यापेक्षा त्यांनी बालकृष्णाविषयी लिहिलेल्या रचना जास्त लोकप्रिय झाल्या. “मैय्या मोरी मै नही माखन खायो..” हे तर अनेकांनी गायले, लोकप्रिय केले. तसेच “अब मै नाच्यो बहुत गोपाल..” या पदाचा आधार घेत गदिमा-बाबूजी यांनी निर्माण केलेली “नाच नाचूनी अति मी दमले..थकले रे नंदलाला” हे गीत देखील अतिशय गाजले.

15 व्या शतकात मथुरा- आग्रा परिसरातील एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले सूरदास जन्मत: अंध होते. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या सूरदास यांच्याकडे कुटुंबात तसे दुर्लक्षच झालेले. एकदिवस ते घराबाहेर पडले आणि गावोगाव हिंडू लागले. वैष्णव पंथाच्या वल्लभ आचार्य यांच्याशी भेट झाल्यावर त्यांचे जीवन बदलले. सात्विक भक्ती रचना लिहिलेल्या सूरदास यांना उदंड आयुष्य लाभले आणि त्यांनी हजारो रचनांच्या माध्यमातून 14-15 व्या शतकातील त्या अस्थिर परिस्थितीत लोकाना मन शांत ठेवायला भक्तीमार्गाची वेगळी ओळख करून दिली असं नक्कीच सांगता येईल.   

जे आपल्या उघड्या डोळ्यांना दिसत नाही ते त्यांच्या अंतर्दृष्टीला दिसायचे. कृष्णाची इतकी विविध रुपे त्यांनी आपल्या काव्यातून समोर आणली की प्रत्येक पद मोहक वाटत राहते. साधे सोपे शब्द असलेली त्यांची भावविभोर रचना म्हणूनच समाजातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचली. शेकडो वर्षे नवनवीन पिढ्याच्या ओठावर सहज रुळत राहिली.

ईश्वरदर्शनाची आस लागली की काही काही सुचत नाही हेच खरे. मनापासून त्याला कितीही साद दिली तरी तो परीक्षा पाहत राहतो. मग वाटते, आपल्यात असलेल्या दुर्गुणामुळे तर तो प्रसन्न होत नाहीये की काय ? सामान्य लोकाना जे वाटते तेच सूरदास सोप्या शब्दांत मांडताना म्हणतात,   

प्रभु मेरे अवगुण चित ना धरो |

समदर्शी प्रभु नाम तिहारो, चाहो तो पार करो ||

एक लोहा पूजा मे राखत, एक घर बधिक परो |
सो दुविधा पारस नहीं देखत, कंचन करत खरो ||

 घरात बाजूला पाडलेली एखादी लोखंडी वस्तू असो की देव्हाऱ्यात पूजेत असलेली पळी,भांडी आदि लोखंडी वस्तू, जर ही वस्तू परिसाच्या संपर्कात आली तर परिस त्यावेळी “हे घरातले आहे, हे बाहेरचे आहे, हे चांगले आहे, हे वाईट आहे” असा विचार करत नाही. परीसामुळे थेट त्या वस्तूचे सोने होते तसेच कृष्णा तू देखील परिस आहेस. तुझ्या स्पर्शाने आमच्या आयुष्याचेदेखील सोने व्हायला हवे असं ज्या सहजतेने सूरदास सांगतात त्यावेळी त्यांचे हे उदाहरण चटकन मनाला भिडते.

एक नदिया एक नाल कहावत, मैलो नीर भरो |
जब मिलिके दोऊ एक बरन भये, सुरसरी नाम परो ||

एक माया एक ब्रह्म कहावत, सुर श्याम झगरो |
अबकी बेर मोही पार उतारो, नहि पन जात तरो ||

 सूरदास पुढे म्हणतात, नदी असो वा छोटा नाला, पाणी सगळीकडे वाहतेच. मैलोमेल जाताना पुढे अवघे एकरूप होऊन जाते. मग कृष्णा  तुझ्या कृपेसाठी मग गुणी, अवगुणी असे भेद कशाला ? आमचे सगळे अवगुण तर तुझ्या स्पर्शाने नष्ट होऊन जायला हवेत. आमचे आयुष्य तुझ्यात सामावून जाऊ दे. हा आपपर भाव वितळून जाओ. या माया- ब्रह्म आदि गोष्टीत आम्हाला गुंतवण्यापेक्षा आम्हाला या सगळ्यापार घेऊन जाणे हे तर तुलाच सहज साध्य आहे. सुरदासांच्या अंतरदृष्टीला नीरक्षीर विवेकाप्रमाणे हे सर्व काही सुष्पष्ट दिसते.  तशी नजर आपल्याला मिळावी यासारखे सुख नाही असे मला वाटते.

- सुधांशु नाईक, (9833299791 nsudha19@gmail.com )



No comments:

Post a Comment