#सुधा_म्हणे: हरी भजनावीण काळ घालवू नको रे..
15 ऑगस्ट
23
महाराष्ट्र ही संतांची भूमी. किती संतांनी इथल्या लोकांची मनात सद्विचारांचे बीज रोविले. त्यांना विवेकाने वागायला शिकवले. संत सोहिरोबा आंबिले किंवा सोहिरोबानाथ हे त्यापैकीच एक संत. गोव्यातील पाळये हे त्यांचे मूळ गाव. एकेकाळी त्यांचे वडील सावंतवाडी संस्थानच्या बांदा या गावी आले आणि तिथेच राहिले. 18 व्या शतकात झालेला सोहिरोबा यांचा जन्मदेखील इथलाच. पुढे ते स्वतः देखील संस्थानच्या नोकरीत होते. काही काळ त्यांनी कुलकर्णी पदाची कामे केली. त्यांचा कायम परमार्थाकडे ओढा होता. विविध ग्रंथांचे, अध्ययन, त्यावर मराठीतून लेखन असं त्यांनी केले. त्यांच्या विचारांवर, लेखनावर ज्ञानेश्वरांचा प्रभाव होता. असं म्हटले जाते की एक दिवस ते संस्थानच्या कारभारासाठी जात असताना कुणा एका सिद्ध पुरुषाने त्यांच्या मस्तकी आशीर्वादाचा हात ठेवला आणि तिथून त्यांचे आयुष्य बदलले. 1774 मध्ये ते भारत भ्रमण करण्यास निघाले. त्यातून ग्वाल्हेर, उज्जैन आदि ठिकाणी राहिले. उज्जैन ला त्यांचा मठ होता आणि कित्येक शिष्य देखील. त्यांनी उत्तम ग्रंथदेखील लिहिले. पदे लिहिली. मात्र एकदिवस तिथूनही ते बाहेर पडले आणि जणू या पंचमहाभूतात विलीन होऊन गेले.
“हरी भजनाविण काळ घालवू नको रे..” ही त्यांची मला आवडणारी रचना. आयुष्यात आपण अनेकदा विविध गोष्टीची अनाठायी भीती बाळगतो, मात्र जेव्हा ती गोष्ट करायला पाऊल उचलतो, तेंव्हा लक्षात येते अरे हे तर सोपे आहे. उगीचच आपण घाबरत होतो. परमार्थ, विरक्तीचा मार्ग देखील असलाच. इतरांच्याकडे पाहून, कुणाचे अनुभव ऐकून आपण मनाशी उगीचच तर्क लढवत बसतो. अति विचार करत बसतो. त्यामुळे स्वतःच्या विचारांच्या गर्दीत आपणच हरवून, गोंधळून जातो. असं करण्यापेक्षा कृती करावी, हरिभाजनात रमावे, संत सज्जनांची संगत धरावी आणि मनात असलेली ज्ञानज्योत विझू न देता कायम तेवती ठेवत राहावी ही गोष्ट ते किती साध्या शब्दात सांगून जातात.
हरिभजनाविण काळ घालवू नको रे ॥१॥
दोरीच्या सापा भिवुनी भवा । भेटी नाही जिवा-शिवा ।
अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे ॥२॥
विवेकाची ठरेल ओल । ऐसे की बोलावे बोल ।
आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे ॥३॥
संत संगतीने उमज । आणुनि मनी पुरते समज ।
अनुभवावीण मान हालवू नको रे ॥४॥
सोहिरा म्हणे ज्ञानज्योती । तेथ कैचि दिवस-राती ।
तयावीण नेत्रपाती हालवू नको रे ॥५॥
आपल्या आयुष्यात योग्य व्यक्तीची, त्यातही संतविचाराच्या व्यक्तीची संगत ही केव्हाही उत्तम असते. त्यामुळे आपल्या मनातले हीण हळूहळू नष्ट होते. स्वार्थ, मत्सर, लोभ, क्रोध या भावना लोप पाऊ लागतात. मात्र त्यासाठी योग्य व्यक्तीची सोबत असणे फार गरजेचे. आपण एकतर खूप काही वाचतो आणि कित्येकदा प्रत्येकाचे विचार योग्य वाटतात. त्यामुळे मनात सगळा कोलाहल निर्माण होतो. नेमकं योग्य अयोग्य काय हे उमगावे असे वाटत असेल तर चिंतन महत्वाचे आणि आपल्या विचारांना मर्ढेकर म्हणतात तसे “शास्त्रकाट्याची कसोटी”असायला हवी. चुकत गेलो तरी चालेल पण कृती हवी. मग त्या चुकाच आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. असा तावून सुलाखून निघालेला लखलखीत अनुभव हवा. मनातील ज्ञानज्योत अधिक तेजाने तळपू लागते कारण आपले बोलणे, वागणे हे प्रचितीने भरलेले असते. मग आपल्या आयुष्याचे सार्थक झाल्याची जाणीव होते. एका छोट्याशा गावात राहून ज्ञानार्जन केलेल्या, त्यानंतर देशात हिंडलेल्या सोहिरोबा यांचे शब्द म्हणूनच मनाला खूप भिडून जातात.
त्यांची ही
रचना पं. जितेंद्र अभिषेकी आणि संगीतकार दशरथ पुजारी या दोघानाही भावली. त्यानुसार
त्यांनी संगीत देत या रचनेचे सोने केले. अभिषेकीबुवांच्या लोभस स्वरात ही रचना कितीही
वेळा ऐकली तरी मनाला भिडत राहते.
- सुधांशु नाईक(nsudha19@gmail.com )
अप्रतिम निरुपण, संत सोहिरोबा खूप छान माहिती. एक खूप छान पर्वणीच आम्हाला.पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांचा स्वरसाज.मग काय अमृतच.🙏🙏
ReplyDelete