#सुधा_म्हणे: विश्वाचे आर्त…
21 ऑगस्ट 23
निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही चार भावंडे आणि त्यांचे जगणे ही मराठी माणसासाठी अलौकिक अशी गोष्ट. आज हे चौघेदेखील आपल्यासाठी देवस्वरूप बनले असले तरी त्यांना एकेकाळी अपार दुःख भोगावे लागले. परंपरा, रूढी, रीती रिवाज, चाकोरी यांच्यामुळे त्यांना तत्कालीन समाजाने त्रास दिला. दैवी सामर्थ्य असूनदेखील त्यांनी त्या परंपरांचा मान राखत शुद्धीपत्र मिळवून आळंदीमधील ब्रहवृंदाला दिले. एकेकाळी ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांच्याविषयी अजिबात कटुता त्यांनी बाळगली नाही. ज्या आळंदीमध्ये भर दुपारी या चिमुकल्याना अनवाणी पायाने भिक्षा मागावी लागली तिथेच पुन्हा परतून आल्यावर त्यांनी कुणाचाही द्वेष केला नाही, बदल्याची भावना उरी बाळगली नाही. आणि स्वतःही केवळ आळंदीमध्ये बसून राहिले नाहीत. भागवत धर्माची, विठ्ठलभक्तीची पताका फडकवताना, ईश्वरभक्तीचा संदेश देत ते नामदेवाना सोबत घेऊन पार पंजाबपर्यन्त जाऊन आले. त्यांच्यासाठी हा माझ्या गावचा, हा राज्याचा असा भेद उरलाच नव्हता.
संतांचे हृदयच असे विशाल असते. सर्वांप्रती तिथे असते केवळ माया. ज्ञानेश्वरांच्या जगण्यातच विश्वाप्रती लोभस जिव्हाळा दिसतो. धर्म, जात,प्रांत, लिंग आदि भेदांच्या पलीकडे गेलेले ते एक महायोगी होते. म्हणूनच आपल्या देहापलीकडे जात ते जेंव्हा विश्वाचा विचार करतात तेंव्हा ते केवळ पोकळ असे शब्द उरत नाहीत. या विश्वातील सर्वांचे भले व्हावे ही जाणीव मनात प्रकटणे हेच योगी असल्याचे लक्षण आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लोकांच्या कल्याणासाठी त्यांचे मन प्रत्येक क्षण गुंतलेले असते आणि असेच मन मग म्हणू शकते,
विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले ।
अवघेचि जालें देह ब्रम्ह ॥१॥
आवडीचें वालभ माझेनि कोंदाटलें ।
नवल देखिलें नभाकार गे माये ॥२॥
हृदयीं नटावला ब्रम्हाकारें ॥३॥
ईश्वरी प्रेमाचा,
निरपेक्ष प्रेमाचा अनुभव आला की मनातील क्रोध, द्वेष, मत्सर आदि हीण भावना लोप
पावतात. उत्कट प्रेमाची अनुभूती लाभली की सगळे काही सुंदर भासू लागते. त्याचा सहवास
मिळाला की मग इतर सगळ्या गोष्टीमधील आसक्ती मावळून जाते. प्रेम या शब्दाला ज्ञानोबा
इथे वालभ असा समानार्थी शब्द वापरतात. आवडत्या गोष्टीवरच्या प्रेमाने एकदा हृदय भारून
गेले की अवघ्या विश्वातील प्रत्येक गोष्ट अलौकिक अशा तेजाने भारल्यासारखी, आकाशासारखी
भव्य आणि आनंददायी वाटते. कोणतीच गोष्ट वाईट, क्षुद्र भासत नाही. सगळे जगणेच मग त्याच्याशी
एकरूप झालेले! सुखाच्या अतीव लाटांवर उचंबळत राहणारे होऊन जाते.
त्याचे सख्य मिळणे
ही दुर्लभ गोष्ट साध्य झाली की मग जन्म सार्थक झाला असे वाटते. तृप्तीच्या या क्षणी
मन निर्मळ, निराकार होऊन जाते. अन्य काही नकोसे वाटू लागते. जगण्याचे प्रयोजन संपले
की उरते फक्त मुक्तीची ओढ. शांत शांत आयुष्य सर्वांच्या सुखाची प्रार्थना करत दिव्याची
ज्योत सावकाश शांतवावी तसे संपून जाते. ती
ब्रह्माकार झालेली मुक्ती, ते जगणे मग वंदनीय होऊन जाते.
खूप छान लेख.
ReplyDelete