marathi blog vishwa

Thursday 10 August 2023

म्हारा ओळगिया घर आया जी...

 #सुधा_म्हणेम्हारा ओळगिया घर आया जी...

10 ऑगस्ट 23

मीरा. कृष्णाच्या भेटीची आस मनात ठेऊन अवघे आयुष्य तिने व्यतीत केलं. लहानपणापासून एकच ध्यास माझा गोविंद मला भेटायला हवा. वाऱ्याच्या शांत झुळकीसारखा तो आयुष्यात यावा, प्रत्यक्ष भेटावा आणि मग अवघे तनमन शांत शांत होऊन जावे. त्याच्याशी एकरूप झाल्यावर आयुष्याचे सार्थक व्हावे. त्याच्यासोबत आयुष्यातील छोट्या छोट्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि मग कृष्णरूप होऊन जावं. या जीवन मरणाच्या या चक्रातून कायमची मुक्ती मिळावी. कृष्णाच्या सहवासाची ओढ इतकी अपार की तिने पती, सासर, राजवैभव सगळ्याचा सहज त्याग केला. ज्या नाजुक सुकुमार देहावर तलम वस्त्रे हवीत तिथं साधी सुती भगवी कफनी आनंदाने परिधान केली आणि मीरा घरदार सोडून सहज गात निघाली.

मीरा कृष्णदर्शनासाठी व्याकुळ होऊन त्याला शोधत राहिली. आणि तो दिसताच त्याची होऊन गेली. 

15 व्या शतकातील ते दिवस कसे होते हे आपल्याला माहिती आहेच. पण मीरेचे जगणंच इतकं पवित्र आणि सहजसुंदर होतं की त्यामुळे कुणाला तिच्याकडे वाईट नजरेने बघायचं बहुदा धाडसच झालं नाही. एका लोककथेनुसार जेव्हा एकदा कुणाला तिचा मोह अनावर झाला तेंव्हा मीरा वस्त्रत्याग करत सरळ त्यांना सामोरी गेली. ती केव्हाच त्या देहापलिकडे जाऊन पोचली होती. “हा देहच मुळी कृष्णाचा आहे, माझा नव्हे.. घ्या.. तुम्हाला काय लुटायच ते लुटून घ्या.” तिने असं म्हणताच समोरच्याच्या मनातील सर्व वासना संपून गेल्या आणि त्याने मीरेचे पाय धरले..!

मीरा पुढे पुढे जात राहिली. अपार ओढीने कृष्णाला साद देत राहिली. आणि एकदिवस विरहिणीच्या घरी अवचित तिचा जिवलग यावा तसा भेटीसाठी आसुसलेल्या या मीरेला अखेर कृष्ण भेटला. तिचा जिवलग मुरलीवाला तो मोहन भेटला. मीरा आनंदविभोर झाली. मीरा या भेटीचे वर्णन किती सुरेख शब्दात करते,

म्हारा ओलगिया घर आया जी।
तन की ताप मिटी सुख पाया, हिलमिल मंगल गाया जी।।
घन की धुनि सुनि, मोर मगन भया, यूं मेरे आनंद छाया जी।

इथं पुन्हा मीरा “मनाला मन मिळाले वगैरे ढोबळपणे बोलत नाही” तर स्पष्ट आणि सहज म्हणते की माझा परदेसी प्रीतम घरी आला. गर्जणारे मेघ ऐकून जसं मोराला आनंद होतो तसा आनंद माझ्या तनामनाला वेढून राहिला. शरीरातील विरहाग्नी शांत झाला. सुख लाभले.

चंद कूं निरखि कमोदणि फूलैं हरषि भया मेरे काया जी।
रग राग सीतल भई मेरी सजनी हरि मेरे महल सिधायाजी।।

चंद्राला पाहून कमोदिनी फुलते तसं माझं शरीर फुलून आलं. रोम रोम शांत शीतल झाले, माझा हरी माझ्या घरी आला. माझा झाला. माझ्या मनबसियाला मी कडकडून भेटले. त्याची झाले.

मीरा बिरहणि सीतल हो जी दुख दंद दूर नसाया जी।।

मीरा म्हणते, आजवर भोगलेली दुःख, मनातील द्वन्द्व सगळं सगळं नाहीसे झाले. आता भरून उरला केवळ आनंद. एक तृप्ती आणि त्यातून लाभलेली मुक्ती.

कुमार गंधर्व आपल्या मैफिलीत हे मीरा भजन गायचे. त्यांच्या सुरात ते ऐकताना ती तृप्त, मुक्त मीरा जणू समोर उभी राहते आणि निर्मळ असा आनंद आपल्याही मनभर पसरत राहतो..!

-    सुधांशु नाईक (9833299791)




3 comments:

  1. अप्रतिम लिहिलंय, मीरेच्या आणि कृष्णाच्या नात्याबद्दल फार वाचलं नाहीत मी, आवडलंय वाचायला, सुरेख

    ReplyDelete
  2. अनन्य भक्तीचे प्रतीक

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर आणि मुलायम, मनमोहक शब्दात श्री हरीची मीरा साकारली आहे.. वाचताना देखील.. मीरा आणि मुरारी यामधील अद्वैत दर्शन होते.. 👍🌹

    ReplyDelete